रशियातल्या बंडाच्या कहाणीतले उलटेसुलटे पेच

By विजय दर्डा | Published: July 3, 2023 07:51 AM2023-07-03T07:51:05+5:302023-07-03T07:51:14+5:30

रशियात पुतीन यांचा स्वयंपाकी म्हणवल्या जाणाऱ्या येवगेनी यांनी हा असा अचानक बंडाचा पवित्रा का घेतला, याची उकल सोपी नाही!

Twists and turns in the story of the revolution in Russia | रशियातल्या बंडाच्या कहाणीतले उलटेसुलटे पेच

रशियातल्या बंडाच्या कहाणीतले उलटेसुलटे पेच

googlenewsNext

- डॉ. विजय दर्डा 

जे सैन्य रशियाच्या बाजुने कित्येक वर्षांपासून शत्रूशी लढत आले, त्याच्या रायफली आणि रणगाडे अचानक मॉस्कोच्या दिशेने का वळले? रशियाची लढाऊ हेलिकॉप्टर्स आणि विमाने त्यांनी का पाडली? आधी बंडखोरांना पुतीन यांची धमकी आणि पाठोपाठ सर्वांना माफ करण्याची घोषणा यासारख्या घटनाक्रमात प्रश्न अधिक आहेत, उत्तरे कमी.

थरकाप उडवणाऱ्या या कहाणीत अनेक कोडी लागले दिसतात. कुणाला वाटते, हा खेळ अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने केला, तर कुणाला वाटते हा सगळा खेळ पुतीन यांनीच तर नाही रचला? ढोबळमानाने पाहू जाता यातून पुतीन यांचा काही फायदा होताना दिसत नाही. पण, पुतीन यांच्या बुद्धीवर काय भरोसा ठेवावा? ते काहीही करु शकतात.

या बंडखोर वैगनर गटाचे प्रमुख येवगेनी प्रिगोझीन हे पुतीन यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. क्रेमलिनच्या मुदपाकखान्याचे काम त्यांच्याकडे होते. रशियन सैन्याकडून पुतीन जे काम सरळ करून घेऊ शकत नव्हते, त्यासाठी दुसऱ्या पर्यायाची गरज होती, हे लक्षात घेऊन रशियन लष्करी गुप्तचर संस्थेचे एक ज्येष्ठ अधिकारी दिमित्री युतीकन आणि उद्योगपती येवगेनी प्रिगोझिन यांनी एकत्र येऊन या खासगी सैन्याची उभारणी केली; ज्यात रशियन एलिट फोर्सचे निवृत्त अधिकारी तर होतेच शिवाय कारागृहात बंद असलेल्या क्रूर गुन्हेगारांचीही भरती केली गेली. चेचेन्यामध्ये दिमित्री यांचा रेडिओ कॉल सिग्नल वॅगनर होता, म्हणून त्यांनी या गटाचे नाव वॅगनर ठेवले, युक्रेनमध्ये रशिया समर्थक फुटीरतावाद्यांची साथ देत असताना हा गट पहिल्यांदा लोकांच्या समोर आला. रशियाने त्या वेळी मौन बाळगले होते; परंतु युक्रेनवरील हल्ल्यानंतर वैगनर गट उघडपणे समोर आला. त्याचे प्रमुख येवगेनी प्रिगोझीन उघडपणे बोलू लागले. 

ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाच्या ताज्या गुप्तचर अहवालानुसार वैगनर गटातील सैनिकांची संख्या ५० हजारांच्या आसपास आहे. १८०० किलोमीटर सीमेवर चाललेल्या युक्रेन युद्धात वॅगनर गटाने रशियाला खूपच भरभक्कम साथ दिली परंतु येवगेनी अचानक बंडखोर झाले. त्यांनी आपल्या सैनिकांच्या मृत्यूसाठी रशियन संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू आणि लष्करप्रमुख जनरल वेलरी गेरासीमोव यांना धडा शिकवण्याची घोषणा केली. त्यानंतर काही तासांतच त्यांचे सैनिक मॉस्कोच्या दिशेने कूच करताना दिसले. मॉस्कोत आणीबाणी लावली गेली. प्रतिकारासाठी रशियन सैन्यही बाहेर आले. वॅगनर गटावर हल्ले झाले परंतु त्यांनी रशियाची काही हेलिकॉप्टर्स आणि विमाने पाडली.

पुतीन यांनी या बंडाची संभावना पाठीत खंजीर खुपसणे अशी केली आणि कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशारा दिला. सारे जग हैराण असताना अचानक सगळे चित्र बदलले. येवगेनी सध्या बेलारूसमध्ये आहेत. रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई आणि लष्करप्रमुख जनरल व्हॅलरी गैरासिमोव्ह यांना हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे. पुतीन यांच्याशी आपले काही वैर नाही असेही म्हटले आहे.

समोर दिसते ते हे चित्र, तेवढेच फक्त सत्य आहे का? खरी गोष्ट पडद्यामागेच आहे. दोन प्रकारे या घटनांची संगती लावता येते. पहिले म्हणजे वॅगनर गटाने मैदानातून माघार घेण्याने रशियाचे नुकसान अटळ म्हणून रशियाविरोधी शक्तींना हेच हवे होते. मग अशाच एखाद्या खेळीत येवगेनी फसले की काय? की पुतीन सत्तेवरून हटले तर त्यांना संधी मिळू शकते, अशी लालूच त्यांना दाखवली गेली? येवगेनी यांना रशियाविरोधी शक्तींनी कदाचित असे सांगितले असेल की तुम्ही बंड करा आम्ही साथ देऊ आणि नंतर ते उलटले; असेही झाले असेल! कूटनीतीत काहीही घडू शकते.

पुतीन इतक्या लवकर वॅगनर गटाच्या तुकडीवर हवाई हल्ला करतील याचा अंदाज त्यांना आला नसेल असेही असू शकते. रशियाविरोधी गुप्तचर संस्थांनी येवगेनी यांच्या सैन्याला हटवण्यासाठी ही चाल खेळली असण्याचीही शक्यता आहे. या संपूर्ण घटनाक्रमाकडे पुतीन यांचीच चाल म्हणून पाहणाऱ्यांचा तर्कही सुसंगतच आहे: युक्रेन आघाडीवर पुतीन यांना अपेक्षेइतके यश मिळालेले नाही. एक आठवड्यापेक्षाही कमी काळात त्यांना युक्रेनवर ताबा मिळवायचा होता, आता १६ महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. संरक्षणमंत्री सर्गेई शोइगू आणि लष्करप्रमुख जनरल व्हॅलरी गेरासिमोव्ह यांच्या रणनीतीच्या अपयशाचीही चर्चा चालू आहे. यांच्यापैकी एखाद्याला किंवा दोघांनाही हटवण्यासाठी पुतीन यांनीच हा सगळा डाव रचला असेल का?

पुतीन यांची अशीही इच्छा असू शकते की वॅगनर ग्रुप त्यांच्यासाठीच लढेल पण उघडपणे नाही. आफ्रिका आणि दुसऱ्या देशात हा गट रशियासाठी लढत होताच. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे येवगेनी रशियन चौकटीच्या बाहेर जाऊ लागले होते. भविष्यात ते पुतीन यांच्यासाठी धोका न होवोत म्हणून त्यांना बाजूला करण्याची योजना आखली गेली. सैनिकांना नव्या करारावर सह्या कराव्या लागतील, असे रशियन सैन्याने म्हटले आहे. परंतु येवगेनी यांनी त्याला नकार दिला आहे. रशियन सैन्याबरोबर न जाण्याचे त्यांनी ठरवले आहे. वैगनर गटात मोठ्या प्रमाणावर भरती सुरु झाल्याच्या बातम्या आहेत.याचा साधा अर्थ असा की या सर्व घडामोडीत खूप काही पेच आहेत; अनेक घटना पडद्याच्या मागे आहेत.. सगळे काही जाणून घेण्यासाठी आपल्याला तूर्त आणखी वाट पाहावी लागेल.

(लेखक लोकमत मीडिया समुहाचे चेअरमन आहेत)

Web Title: Twists and turns in the story of the revolution in Russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.