गेल्या आठवड्यात घडलेल्या दोन घटनांनी मी कमालीचा अस्वस्थ झालो होतो. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची नक्कल करून ती सोशल मीडियावर टाकणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्या प्रियांका शर्मा यांना झालेली अटक ही पहिली घटना होती. दुसरी घटना ही भाजपच्या भोपाळ येथील लोकसभेच्या उमेदवार प्रज्ञासिंग ठाकूर यांनी केलेले वक्तव्य. ‘‘महात्मा गांधींची हत्या करणारे नथुराम गोडसे हे देशभक्त होते आणि देशभक्त राहतील.’’ या त्यांच्या वक्तव्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली. गोडसेला जे दहशतवादी म्हणतात त्यांनी आत्मचिंतन करायला हवे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. अशा लोकांना निवडणुकीच्या निकालातून चोख प्रत्युत्तर मिळेल, असेही त्या म्हणाल्या!
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची नक्कल करणाºया व्यक्तीविषयी प. बंगालच्या सरकारने एवढी संवेदनशीलता का दाखवावी? प्रियांका शर्मा यांचा गुन्हा काय होता? त्यांनी अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या भल्यामोठ्या छायाचित्रावर ममता बॅनर्जी यांचा चेहरा चिकटवला. या ‘गंभीर’ गुन्ह्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ‘६६ए’ आणि ‘६७ए’चा भंग केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात येऊन आय.पी.सी.च्या कलम ५०० अन्वये बदनामी करण्याचा गुन्हाही नोंदविण्यात आला!
स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात व्यंगचित्रकारांची फार मोठी परंपराच निर्माण झाली आहे. के. शंकर पिल्लई, आर. के. लक्ष्मण, अबू अब्राहम, ओ. व्ही. विजयन, सुधीर तेलंग आणि बाळ ठाकरेसुद्धा त्यात सामील आहेत. त्यांनी सत्तेत असणाºया सत्ताधाऱ्यांची व्यंगचित्रे काढताना कधीच मागेपुढे बघितले नाही. इतकेच नाहीतर, ते ज्यांची व्यंगचित्रे काढायचे त्या व्यक्ती त्यांच्या व्यंगचित्रांचे स्वागतच करायच्या. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार तेलंग यांच्या व्यंगचित्रांच्या तडाख्यातून पं. नेहरूही सुटले नव्हते आणि पंडितजींनीही त्या व्यंगचित्रांचा आनंद मनमुराद लुटला होता. अटलबिहारी वाजपेयी हे त्यांची व्यंगचित्रे बघून खळाळून हसायचे. सुधीर तेलंग या व्यंगचित्रकाराने काढलेले एक व्यंगचित्र तर त्यांनी फ्रेम करून ठेवले होते. तेलंग हे एक महान व्यंगचित्रकार होते ज्यांनी आपणा सर्वांचा फार लवकर निरोप घेतला!सर्वोच्च न्यायालयाने प्रियांका शर्मा यांची ताबडतोब सुटका करण्याचे आदेश दिले हे फार चांगले झाले. पण विद्वान न्यायमूर्तींनी त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल माफीनामा लिहून देण्यास का सांगावे हे मात्र अनाकलनीय आहे.
प्रज्ञासिंग ठाकूर यांनी गोडसेचे उदात्तीकरण करणे हेही अनेक कारणांनी अस्वस्थ करणारे होते. वाचाळपणा करण्याचा त्यांचा हा पहिलाच प्रसंग नाही. बाबरी मशिदीचा विध्वंस करण्यात आपण आघाडीवर होतो हेही त्यांनी अत्यंत फुशारकीने सांगितले होते. अशा तºहेने कायदा हातात घेण्याची त्यांची वृत्ती आणि त्याविषयी अभिमान बाळगण्याची त्यांची प्रवृत्ती हीसुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीची द्योतक म्हणावी लागेल.साध्वीच्या वक्तव्याचा भाजपने जाहीरपणे निषेध करून त्यांना माफी मागायला लावली त्याप्रमाणे साध्वींनी माफी मागितलीसुद्धा. पण या प्रकरणाची आणखी एक गंभीर बाजू आहे. भाजप आणि रा. स्व. संघ यांच्या विचारांची अभिव्यक्ती साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी किती प्रमाणात केली होती, हा प्रश्न विचारावासा वाटतो. कारण केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्यासह आणखी दोघा भाजप नेत्यांनी साध्वींच्या विचारांशी सहमती दर्शविणारी मते सोशल मीडियावरून व्यक्त केली होती.
यापूर्वी २०१५ साली साक्षी महाराजांनीदेखील गोडसे यांचे स्मारक उभारण्यात यावे अशा तºहेचे वक्तव्य संसदेत करून वादळ उठविले होते. शांततेचे दूत अशी ओळख असलेल्या महात्मा गांधींची हत्या करणारी व्यक्ती देशभक्त असल्याचा विचार व्यक्त करणाºया प्रज्ञासिंग ठाकूर या काही एकमेव नेत्या नाहीत. गोडसे देशभक्त असल्याची भावना असणाºया अनेकांच्या भावना वाचाळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रज्ञासिंगने व्यक्त केल्या असे म्हणायचे का? या निवडणुकीत समजा प्रज्ञासिंग ठाकूर विजयी झाल्या तर भाजपची भूमिका काय राहील? गोडसे हा दहशतवादी होता असे विचार असणाºयांना या निवडणुकीत चोख उत्तर दिले जाईल, असे प्रज्ञासिंग ठाकूर या म्हणाल्या होत्या तेव्हा त्यांचा विजय हा गोडसे देशभक्त होता या त्यांच्या विचारांचा विजय समजायचा का? त्यांच्या भावनांशी सहमत असणाºया पक्षातील अन्य नेत्यांना त्यांच्या विजयानंतर असेच वाटेल का? त्यांच्या विजयामुळे अनेकांना गोडसे यांचे उदात्तीकरण करण्यास चेव येईल का?भाजपने प्रज्ञासिंगच्या वक्तव्याचा निषेध केला तो कितपत प्रामाणिकपणे केला होता? पक्ष त्यांच्या विरोधात कारवाई करील का? त्यांच्या भूमिकेशी सहमत असणाºयांना भाजपने नोटिसा बजावल्या आहेत. आपल्या देशाच्या निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव जरी असला तरी त्यात काही चुकीच्या गोष्टींनी प्रवेश केला आहे. त्यांचे परीक्षण करून त्या गोष्टी दूर करण्याची गरज आहे. ममता बॅनर्जींचे व्यंगचित्र काढणाºया प्रियांका शर्मा यांना तुरुंगात टाकणे ही एक विकृतीच होती; तसेच प्रज्ञासिंग ठाकूर यांचे वक्तव्य हीसुद्धा लोकशाहीविषयी काळजी वाटायला लावणारी आणखी एक घटना होती, असेच म्हणावे लागेल!