पुतिन यांच्याशी पंगा घेणाऱ्या जिगरबाज दोघी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 09:20 AM2022-04-21T09:20:01+5:302022-04-21T09:20:30+5:30

फिनलंडच्या पंतप्रधान सना मरीन आणि स्वीडनच्या पंतप्रधान मागदालेना ॲण्डरसन यांनी (‘महिला’ असूनही) पुतिन यांना विरोध केल्यानं आपला ‘अपमान’ झाल्याची पुतिन यांची भावना आहे.

Two women in the world who oppose Putin | पुतिन यांच्याशी पंगा घेणाऱ्या जिगरबाज दोघी

पुतिन यांच्याशी पंगा घेणाऱ्या जिगरबाज दोघी

Next

जो कोणी आपल्या मार्गात येईल त्याला शिंगावर घेण्याचं, धमक्या देण्याचं, त्यांच्यावर हल्ला करण्याचं आणि प्रसंगी त्यांच्याविरुद्ध अणुबॉम्बचा वापर करण्याची धमकी देण्याचं धोरण रशिया आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी ठरवलेलं दिसतं. युक्रेनवरील हल्ल्यानंतर तर रशिया आणि अर्थातच हडेलहप्पी पुतिन अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यांचे शेजारी देश फिनलंड आणि स्वीडन यांनाही पुतिन यांनी सर्वनाशाची धमकी दिली आहे. कारण काय? - तर युक्रेनवरील हल्ल्यानंतर या दोन्ही देशांनी उघडपणे ‘नाटो’मध्ये सामील होण्याची दर्शविलेली इच्छा आणि पुतिन यांनाच शिंगावर घेण्याची दाखवलेली हिंमत! 

...पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही देशांच्या पंतप्रधान महिला आहेत आणि त्यांनी पुतिन यांच्या धमक्यांना कोणतीच भीक घातलेली नाही. पुतिन यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या भूमिकांचा त्यांनी पुनरुच्चार केल्यानं तर पुतिन यांचा अगदी तिळपापड झाला आहे.

फिनलंडच्या पंतप्रधान सना मरीन आणि स्वीडनच्या पंतप्रधान मागदालेना ॲण्डरसन यांनी (‘महिला’ असूनही) पुतिन यांना विरोध केल्यानं आपला ‘अपमान’ झाल्याची पुतिन यांची भावना आहे. त्यात या दोन्हीही महिला त्यांच्या सौंदर्यामुळेही प्रसिद्ध आहेत. या दोन्ही देशांचं आणि त्यांच्या महिला पंतप्रधानांचं काय करू आणि काय नको, असं पुतिन यांना झालं आहे.

यात पहिल्या क्रमांकावर आहेत, त्या फिनलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान सना मरीन. त्या केवळ फिनलंडच्याच नाही, तर सर्वात तरुणपणी पंतप्रधान झालेल्या जगातल्या पहिला महिला!  वयाच्या ३४व्या वर्षीच त्या फिनलंडच्या पंतप्रधान झाल्या. पुतिन यांनी कितीही डरकाळ्या फोडल्या तरी अलीकडच्या काळात सना मरीन यांनी प्रत्येकवेळी पुतिन यांना धीटपणे ‘अरेला कारे’ केल्यानं जगभरात सना यांची प्रतिमा उंचावली आहे.

सना मरीन या आज पंतप्रधान असल्या तरी त्यांचा प्रवास सुरूवातीपासूनच आव्हानांनी भरलेला आहे. एक विचारी नेत्या म्हणून त्या ओळखल्या जात असल्या तरी प्रत्येकवेळी त्यांच्या मनाला जे वाटेल, ते त्यांनी कोणाचीही भीडभाड न ठेवता बिनधास्तपणे केलं आहे. अर्थातच त्यामागे आहे, ते त्यांचं खडतर बालपण. लहानपणापासूनच त्यांना आयुष्याशी झुंजत पुढे जावं लागलं.

फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १९८५मध्ये सना यांचा जन्म झाला. त्या अतिशय लहान असतानाच त्यांचे आई-वडील विभक्त झाले. त्यांच्या वडिलांना दारूचं व्यसन होतं. आई-वडील विभक्त झाल्यानंतर सना यांची आई आणि त्यांची समललैंगिक जोडीदार एकत्र राहू लागले. त्यांच्यासोबतच सना यांचं पुढचं बालपण गेलं. जगण्यासाठी त्यांना बेकरीमध्ये आणि कॅशियर म्हणूनही काम करावं लागलं. २००६मध्ये त्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टीच्या युवा शाखेच्या सदस्य झाल्या. २००८मध्ये सिटी कौन्सिलची निवडणूक त्यांनी लढवली, पण त्यात त्यांना अपयश आलं. २०१२मध्ये सना यांनी टॅम्पिअर विश्वविद्यालयातून ‘प्रशासकीय विज्ञान’ या विषयात पदवी घेतली. त्याचवर्षी टॅम्पिअर येथील नगरपालिकेत मात्र त्या निवडून आल्या. २०१३ ते २०१७ या काळात त्या सिटी काैन्सिलच्या अध्यक्ष होत्या. २०१५मध्ये पहिल्यांदा त्या खासदार म्हणून निवडून आल्या आणि देशातील राजकारणाच्या मुख्य प्रवाहात सामील झाल्या. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचे अंति रिनी हे पंतप्रधान असताना २०१९मध्ये त्यांच्या सरकारमध्ये सना मरीन यांना परिवहन मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर काही काळातच झालेला टपाल कर्मचाऱ्यांचा संप रिनी यांना नीट हाताळता न आल्यानं त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि पक्षानं पंतप्रधान म्हणून सना मरीन यांची निवड केली.

सना मरीन यांनी २०२०मध्ये  एका मासिकासाठी केलेल्या काहीशा बोल्ड फोटोशूटमुळे फिनलंडमध्ये  वादळ उठलं होतं. सना मरीन यांनी फुटबॉल खेळाडू मार्क्स रेइकोनेन याच्याशी २०२०मध्ये विवाह केला. त्यांना चार वर्षांची मुलगी आहे. सना मरीन केवळ देशातच नव्हे, जगातही प्रसिद्ध आहेत. २०२०मध्येच ‘फोर्ब्ज’नं सना यांना जगातील सर्वाधिक शंभर ‘शक्तिशाली’ महिलांच्या यादीत समाविष्ट केलं होतं. या यादीत त्यांचा ८५वा क्रमांक होता. एवढंच नाही, ‘टाईम’ मासिकानंही जगातील सर्वाधिक शंभर प्रभावशाली महिलांमध्ये सना यांचा समावेश केला होता.

आणखी एक हिंमतवान महिला...
सना मरीन यांच्याप्रमाणेच आणखी एक हिंमतवान महिला आहे ती म्हणजे स्वीडनच्या पंतप्रधान मागदालेना ॲण्डरसन.  वयाच्या १६व्या वर्षापासूनच त्यांनी आपल्या राजकारणाला सुरूवात केली. या वयापासूनच सोशल डेमोक्रॅटिक पार्टीसाठी विविध लहान-मोठ्या पदांच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. त्यांच्या शालेय काळात उत्कृष्ट जलतरणपटू म्हणूनही त्यांनी नाव कमावलं होतं. सना मरीन यांच्याप्रमाणेच त्यांनीही पुतिन यांच्या आडमुठ्या धोरणाला नेहमीच डोळे वटारले. त्यामुळे पुतिन यांचा मागदालेना आणि स्वीडन यांच्यावरही मोठा राग आहे, पण मागदालेना यांनी पुतिन यांना सुनावताना मागे-पुढे पाहिलेले नाही.

Web Title: Two women in the world who oppose Putin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.