एखाद्याचे कौतुक करायचे असेल तर वा - छान ! असे म्हटले की काम भागते. तेवढे कष्ट करण्याचीही ज्यांची तयारी नाही त्यांनी छान हा एक शब्द जरी मनापासून उच्चारला खूप झाले. हा शब्द उच्चारायला पैसे पडत नाहीत किंवा त्यासाठी डोंगर चढण्यासारखे कष्टही करावे लागत नाहीत. तरीही माणसं कौतुक करायच्या वेळी हात आखडता का घेतात हे कळत नाही.कौतुकाचे दोन शब्द ही अलंकारिक भाषा झाली. दोन म्हणजे दोनच शब्द बोलले पाहिजेत असे नाही. चांगल्या कामाबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी आणि ज्याने ते काम करण्यासाठी परिश्रम घेतले त्याला लगेच दाद द्यावी, हा त्यामागील प्रांजळ हेतू असतो. त्यामुळे छान म्हटले काय, वा - छान, म्हटले काय किंवा एक छोटे भाषण केले काय, ते मनापासून केलेले असले म्हणजे झाले. शब्दसंख्येच्या चौकटीत त्या भावनांचा गळा घोटण्याचा करंटेपणा कशाला करायचा? एखादा माणूस चांगले काम करतो ते कुणीतरी आपले कौतुक करणार आहे म्हणून नाही हे आधी लक्षात घेतले पाहिजे. चांगले काम करणे हा त्याच्या स्वभावाचा भाग असतो. कोणी कौतुक करो न करो, आभार मानो न मानो - अशी माणसे भल्या बुऱ्याचा विचार न करता आपले काम शांतपणे करत रहातात. एखाद्याने त्यांचे मनापासून कौतुक केले तर तेवढ्याच निर्मळपणे ते त्याचा स्वीकारही करतात.शबरीचे उदाहरण सर्वांना माहीत आहे. रामाला द्यायची बोरे आंबट निघू नयेत, गोड असावीत म्हणून तिने प्रत्येक बोर चाखून पाहिले. रामाचेही मोठेपण असे की त्याने बोरे उष्टी आहेत म्हणून ती नाकारली नाहीत उलट आनंदाने त्यांचा स्वीकार केला. शबरीच्या मनातील सेवेची आणि रामाच्या मनातील कृतज्ञतेची भावना प्रत्येकाने जाणून घेतली तर माणसा-माणसात नातेसंबंधांचे निर्मळ पूल निर्माण होण्यास कितीसा वेळ लागेल?घरकाम करणारी मावशी, पेपर टाकणारा मुलगा, औषधांसाठी लगबग करणारी नर्स, आजारी असतानाही उठून नवऱ्याला चहा करून देणारी बायको, आले कोथिंबिरीसोबत स्वखुशीने कढीपत्ता मोफत देणारा भाजीवाला मामा अशी अनेक माणसे आपल्या अवतीभवती वावरत असतात. आपले जगणे सुसह्य व्हावे म्हणून कळत नकळत झटत असतात. त्यांचे कौतुक कधीच करायचे नाही का आपण? छान काम करताय तुम्ही, देव तुमचे भले करो... एवढे जरी म्हटले तरी काय जादू होते त्याचा अनुभव घेऊन पहा. हे ऐकल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद उमलतो, त्याचे मूल्य किती, हे सांगणारे चलन बाजारात उपलब्ध नाही.प्रल्हाद जाधव
कौतुकाचे दोन शब्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2017 12:44 AM