मुंबईत घाटकोपरला भरवस्तीत चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत पायलटसह पाच जणांचा मृत्यू झाला; त्याचवेळी विमानतळाला लागून असलेल्या दाटीवाटीच्या वस्तीवर आलेले अस्मानी संकट थोडक्यात टळले. आपत्काळात विमानाचा स्फोट झाल्यावरही पायलटनी त्यांच्या कौशल्याचा वापर करत शेवटच्या क्षणी हे विमान गर्दीच्या ठिकाणी कोसळणार नाही, याची दक्षता घेत भीषण दुर्घटना टाळली, याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे. मुळात उत्तर प्रदेश सरकारच्या मालकीचे असलेले हे विमान अलाहाबादला अपघातग्रस्त झाल्यावर त्या सरकारने विकले आणि दुरुस्तीसाठी साधारण चार वर्षे हँगरला ठेवल्यानंतर चाचणीसाठी गुरुवारी उडाले, ते परतलेच नाही; पण ज्या क्षणी ते कोसळले त्या क्षणी त्याने मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकवला. अशी दुर्घटना घडली, की मुंबई विमानतळाच्या धावपट्टीच्या क्षेत्रात असलेल्या बहुमजली झोपडपट्ट्या, विमानांच्या उड्डाणक्षेत्राच्या परिघात असलेल्या उंच इमारतींचा विषय दरवेळी चर्चेत येतो.कुणाला धावपट्टीवर येणाऱ्या कुत्र्यांचा विषय आठवतो, तर कुणाला खाद्याच्या शोधात फडफडणाºया आणि विमानांवर आदळणाºया पक्ष्यांचा. पण त्या भागातील मतदारांचा कैवार घेत वेगवेगळे राजकीय नेते झोपड्या हटवण्यास विरोध करतात. तोच प्रश्न इमारतींच्या उंचीचा. न्यायालयाने उंचीची मर्यादा आखून दिल्यानंतरही त्यातून पळवाटा काढण्यासाठी, दिलासा देण्यासाठी दबाव आणला जातो. पण मतांसाठी बेकायदा गोष्टींना पाठीशी घालण्याचा हा खेळ केवळ विमानातील प्रवाशांच्याच नव्हे, तर मुंबईकरांच्या जिवावर कसा उलटू शकतो, त्याची भयावह जाणीव घाटकोपरच्या घटनेने मुंबईकरांसह सर्व यंत्रणांना करून दिली. आधीच मुंबईचे हवामान, प्रदूषण यामुळे दृश्यमानता कमी होते. त्यात दाटीवाटीच्या वस्त्यांची भर पडते. अनेकदा विमाने उतरण्यास पुरेशी जागा न मिळाल्याने किंवा वैमानिकाचा अंदाज चुकल्याने पुन्हा उड्डाण घेत नव्याने विमाने उतरवावी लागतात. छेद देणाºया धावपट्टीमुळे आधीच मुंबई विमानतळाच्या क्षमतेवर मर्यादा येतात. नवी मुंबईतील विमानतळ पूर्ण होईपर्यंत या मर्यादांवर मात करत उड्डाणांचे नवनवे विक्रम केले जात आहेत. सध्या राज्यात विविध ठिकाणी छोटी विमानतळे कार्यरत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सी प्लेनची संकल्पना प्रत्यक्षात येते आहे. वाहतुकीचे हे अवकाश अनेक मार्गांनी खुले करण्याची स्पर्धा सुरू असताना त्या सेवेची पायाभूत गरज असलेल्या धावपट्टीची आणि तिच्या सुरक्षिततेची गरज कळतेय, पण वळत नाही, अशा अवस्थेत सापडली आहे. वातावरण खराब असतानाही या विमानाची चाचणी घेण्यास भाग पाडल्याचा आरोप सहवैमानिक मारिया यांच्या पतीने केल्याने खाजगी विमानसेवेतील सुरक्षेचा, तथील गळेकापू स्पर्धेचा; परिणामी त्यातील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दाही समोर आला आहे. दुर्घटनेच्या तपासानिमित्ताने या साºयांचीच चौकशी होण्याची गरज आहे आणि कुणाचाही मुलाहिजा न बाळगता विमानांच्या उड्डाणांतील अडथळे दूर करण्याची, त्यांचा मार्ग मोकळा करण्याची गरज आहे. तोच इशारा या दुर्घटनेने दिला आहे.
अस्मानी संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 5:45 AM