- यदु जोशी वडिलांनी जन्माला घातलेल्या पक्षाची जबाबदारी मुलावर की पुतण्यावर, अशी परीक्षेची घडी आली तेव्हा मुलालाच वारसा मिळाला, भावाने वेगळा पक्ष थाटला. संदर्भ अर्थातच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अन् उद्धव ठाकरे-राज ठाकरेंचा आहे. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेना सोडली; पण शिवसेना संपली नाही. पक्षाला सर्वांत मोठा धक्का बसला तो जून २०२२ मध्ये. जेव्हा एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे ४० आणि १० अपक्ष आमदार घेऊन बाहेर पडले. मग १३ खासदार, अनेक आजी- माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी त्यांना सोडून गेले. कोणतेही सत्तापद घेणार नाही, हा बाळासाहेबांनी केलेला पण तोडत मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे या बंडानंतर पायउतार झाले, काँग्रेसवर हयातभर टीका करणाऱ्या बाळासाहेबांचा पुत्र काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेला, तेव्हा टीका झाली होतीच, हिंदुत्वाला मूठमाती दिल्याचाही आरोप झाला. मात्र, २५ वर्षे शिवसेना युतीत सडल्याचे सांगत ठाकरेंनी काँग्रेस, शरद पवार यांना जवळ केले.
आता राजकीय आयुष्याच्या एका निर्णायक टप्प्यावर उद्धव ठाकरे उभे आहेत. मातोश्री, सेना भवन, भगवा, जयभवानी जयशिवाजी हे ब्रँड सोडून शिवसेनेतून कोणी बाहेर पडण्याची हिंमत दाखवेल, असे कोणाला वाटले नव्हते अन् समजा तसे घडलेच, तर चार- सहा आमदारांपलीकडे कोणी जाणार नाही, हा बेसावधपणा ठाकरेंना नडला. आज त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा, त्यांच्या स्वतःच्या नेतृत्वाचा आणि एकूणच ठाकरेंच्या राजकीय भवितव्याचा कधी नव्हे एवढा कस लागत आहे. लोकसभा निवडणूक ही राज्य पिंजून काढण्यास त्यांनी कधीच सुरुवात केली आहे. शिंदेंच्या बंडाच्या काही दिवस आधी ठाकरे रुग्णालयात होते. हृदयाचा त्रास त्यांना आहेच, स्टेंट टाकलेले आहेत. मात्र, आज तब्येतीच्या मर्यादा धुडकावत ते जिवाचे रान करत फिरत आहेत. दिल्लीतील महाशक्ती आणि राज्यातील तीन पक्षांची मजबूत महायुती यांना एकाचवेळी आव्हान देत ठाकरे निघाले आहेत. शिवसेना कोणाची ठाकरेंची की शिंदेंची, या प्रश्नाचे उत्तरही ते देणार आहेत. भाजपला त्यांनी अक्षरशः अंगावर घेतले आहे. भलेभले महाशक्तीसमोर गुडघे टेकत असताना ठाकरे मात्र भिडले आहेत.
लोकसभा निवडणूक ही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असेल. आज त्यांच्यासोबत पक्षाचे केवळ पाच खासदार आहेत. जेमतेम १४ आमदार आहेत. गेल्यावेळचा मित्र भाजप या वेळचा सर्वांत मोठा विरोधक आहे. राजकारणाचे अनेक संदर्भ बदलले आहेत. शिवसैनिकांची ताकद, सहानुभूती हे फॅक्टर ठाकरेंना कितपत तारतील, हे निकालात दिसेलच. बाळासाहेब हे सामान्य शिवसैनिकांपासून नेत्यांनाही सांभाळून घेत, प्रेम देत, लोक त्यांच्यावर जीव ओवाळून टाकत. साहजिकच याबाबत उद्धव यांची बाळासाहेबांशी तुलना होते, तेव्हा त्यांना कमी गुण दिले जातात. मात्र, सत्ता आणि आपली माणसे सोडून गेल्यानंतर त्यांनी नक्कीच आत्मचिंतन केले असेल, उणिवांवर मात करत मुलगा आदित्य यांना सोबत घेत आणि स्व. मीनाताईंची कमतरता शिवसैनिकांना भासून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या रश्मी ठाकरेंच्या सोबतीने उद्धव यांनी लोकसभेसाठीचा रथ बाहेर काढला आहे. एका नव्या लढाईसाठी मातोश्री सज्ज झाली आहे. विजयाला गवसणी घालून ते मातोश्रीवर परततील, की त्यांच्या विजयरथाची चाके चिखलात उगवणारे कमळ अडवेल याचा फैसला आता जवळ आला आहे.
विजयाची गुढी! २०१४ ची निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेकडून बराच काळ उमेदवार जाहीर झाला नव्हता. अचानक एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव जाहीर झाले. शिवसेनेतून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आनंद परांजपे हे तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात होते. त्यांच्या बरोबरीने मनसेचे राजू पाटीलही मैदानात होते. निवडणुकीच्या तोडावर गुढीपाडव्याची नववर्ष स्वागत यात्रा होती. त्या दिवशी तिन्ही उमेदवार एकत्र येणार असे चित्र होते. डोंबिवली काबीज करायची तर स्वागत यात्रेत हजेरी लावलीच पाहिजे, डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानात गुढी उभारण्यासाठी भल्या पहाटे तिन्ही उमेदवार तेथे पोहोचले होते. डोंबिवलीचे भाजपचे आमदार रवीद चव्हाणही उपस्थित होते. स्वागत यात्रेनिमित्त तिन्ही उमेदवारांच्या हस्ते गुढी उभारली गेली. हा दुर्मीळ राजकीय योग जुळून आला होता. यंदा तसेच सौहार्दाचे दर्शन घडते की नाही त्याकडे साऱ्याऱ्यांचे लक्ष लागले आहे.