- राजा मानेउजनी धरण १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. पाणी वापराचे नियोजन न झाल्यास मात्र ‘दैवाने दिले अन् कर्माने नेले’ अशी गत सोलापूर जिल्ह्याची होऊ शकते...‘दैव देते आणि कर्म नेते’, ही म्हण आपल्या चांगल्या परिचयाची आहे. या म्हणीचा खऱ्या अर्थाने बोध घेण्याची सध्याची परिस्थिती आहे. तो बोध न घेतल्यास मात्र सोलापूर जिल्ह्याला ‘कर्माने नेले’ असे निराशेचे सूर काढण्याची वेळ येऊ शकते. दर वर्षीचा दुष्काळ आणि या वर्षीही राज्यात सर्वांत कमी पाऊस झाल्याची खंत परतीच्या पावसाने व उत्तरा नक्षत्राने धुऊन काढली. उजनी धरणाच्या वरच्या भागात विशेषत: पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस पडल्याने उजनी धरणाला तारले. पावसाच्या प्रतीक्षेत सोलापूर जिल्हा पावसाळ्यात उन्हाने तापत असताना तिकडे पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनी धरणातील पाणी पातळी उंचावत होती. शेवटी परतीच्या पावसानेही साथ दिली आणि जिल्हा सुखावला. उजनी धरण आपल्या महाकाय ११७ मूळ पाणीसाठा क्षमता व नंतर वाढविलेल्या ६ टीएमसी म्हणजे एकूण १२३ टीएमसी क्षमतेने भरण्याच्या तयारीला लागले आहे.१९८१-८२ सालापासूनचा उजनी धरणाचा आढावा घेतला तर असे लक्षात येते की गेल्या २७ वर्षांत धरण १४ वेळा १०० टक्के भरले. सात वेळा ९५ टक्क््यांपेक्षाही अधिक पाणी-पातळी धरणाने गाठली. तीन वेळा निचांकी पाणीसाठा राहिल्याचाही अनुभव धरणाने दिला. २००३-०४ साली तर उणे ६.८३ एवढाच पाणीसाठा धरण गाठू शकले. त्यानंतर २०१२-१३ ला १६.२६ टक्के तर या वर्षी पाण्याने १४.६० टक्के एवढी पातळी गाठली. २००५ ते २०१२ या कालावधीत धरणात पाणी समाधानकारक राहिल्याने ऊसाचे क्षेत्र प्रचंड प्रमाणात वाढले. पर्यायाने साखर कारखान्यांची संख्याही त्याच गतीने वाढली.जिल्ह्यातील सुमारे ४२ लाख लोकांना पिण्याचे पाणी पाजण्याचे काम हे धरण करते. एका अर्थाने उजनी धरणातील पाणी आणि सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे अच्छे वा बुरे दिन, यांचे अतूट नाते आहे. सध्या उजनी धरणाचे अच्छे दिन सुरू आहेत. त्यामुळे आपोआपच जनतेचेही अच्छे दिन! वाईट काळात पाणी बचत व पाणी वापराबद्दल जे गांभीर्य दाखविले गेले ते खऱ्या अर्थाने आता दाखविले पाहिजे.त्याच गांभीर्याची आठवण माजी आमदार व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी करून दिली आहे. जिल्हा बँकेचा संसार तोलामोलाचा करता करता त्यांनी हे भान ठेवल्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे. धरणाची पूर्ण १२३ टीएमसी पाणी क्षमता भरल्याशिवाय पाणी सोडू नये, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे ३६ टीएमसी पाणी राखीव ठेवावे, सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी २१ टीएमसी पाणी राखून ठेवून, शहरातील नागरिकांनीही पाणी काटकसरीने वापरावे, शेतकऱ्यांच्या पिकांसाठी पाण्याच्या सहा पाळ्या देण्यात याव्यात आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सध्या १२ तास केला जाणारा वीजपुरवठा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ८ तास करावा, अशा मागण्या राजन पाटील यांंनी केल्या आहेत. राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी पाटील यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. उजनी धरण भरत असताना धरणातून पाणी नियोजन न करता सोडत राहणे परवडणारे नाही. पूर्ण क्षमतेने धरण भरू देण्यात काही तांत्रिक अडचणी असल्यास त्याही तंत्रशुद्ध पद्धतीने जनतेसमोर यायला हव्यात. उजनीतील पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे काटेकोर नियोजन झाले तरच राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जिल्ह्यातील ठिबक सिंचन योजनेला अर्थ राहणार आहे. राज्यात सर्वाधिक साखर कारखान्यांची संख्या, राज्यात सर्वाधिक साखर उत्पादनाचा विक्रम आणि राज्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलाचा विक्रमही आपल्या नावावर आहे. या सर्व बाबी खऱ्या अर्थाने सार्थकी लावण्याचे काम उजनीचे ‘अच्छे दिन’ करू शकतात, त्याला कर्माची जोड हवी.
उजनी धरणाचे ‘अच्छे दिन’...!
By admin | Published: September 30, 2016 4:16 AM