आपल्याला गृहीत धरणे आपल्या टीकाकारांएवढेच अनुयायांनाही जमू नये हा नेतृत्वाच्या शैलीचाच एक भाग आहे. तो कोणाही ऐरागैऱ्याला जमणारा नाही. राजकारणात फार खोलवर मुरलेल्या आणि त्यातले सारे छक्केपंजे त्यातल्या खाचाखोचांसह पक्केपणी ठाऊक असलेल्या मुरब्बी धुरिणालाच तो साधणारा आहे. सरळसोट राजकारण करणारे, त्यात फारसा बदल न करणारे आणि जुन्या भूमिकांना घट्ट चिकटून राहणारे पुढारी गृहीत धरता येतात. त्यांच्या पक्षांच्या पुढच्या वाटचालीचाही अंदाज घेता येतो. पण साऱ्यांत राहून केवळ स्वत:चेच असणारे मुत्सद्दी लोक पुढच्या क्षणी कोणता पवित्रा घेतील हे सांगणे अवघड असते. अशा मुत्सद्दी व मुरब्बी राजकारण्यांत शरद पवारांचा समावेश होतो. आपल्या राजकारणाला ते केव्हा व कोणते वळण देतील हे त्यांच्या निकटस्थांनासुद्धा ते वळण पूर्ण झाल्यानंतरच कळत असते. एकतर या निष्ठावंतांना त्यांच्या नेत्याच्या डोक्यात या क्षणी काय चालले आहे याची कल्पना नसते आणि त्याच्या मागून जाण्याखेरीज त्यांच्याजवळ पर्यायही नसतो. आपल्या अनुयायांचे ते एकारलेले निष्ठावंतपण पक्केपणी ठाऊक असलेले पवार त्यांच्या आयुष्यभराच्या वाटाव्या अशा बाजू क्षणात सोडतात आणि दुसऱ्या क्षणी एका अकल्पित बाजूवर जाऊन उभे राहतात. त्यांनी यशवंतरावांना सोडले तेव्हा त्याचा धक्का जेवढा महाराष्ट्राला बसला त्याहून अधिक तो यशवंतरावांनाही बसला. पवार मात्र तेव्हाही मनाने नि:शंक होते. त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला तेव्हाही आपली निष्ठावंत कोकरे आपल्यामागून नक्कीच येणार हे त्यांना ठाऊक होते. २०१४च्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे शिवसेनेने त्याला अडचणीत पकडून जास्तीची मंत्रिपदे मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ‘सेक्युलर’ पवारांनी हिंदुत्वनिष्ठ भाजपाला अभय दिले आणि ‘सेना नसली तरी मी आहे’ असे आश्वासन त्या पक्षाला दिले. त्यांची कोकरे तेव्हाही बिनतक्रार त्यांच्यासोबत राहिली आणि आता? शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला आणि तुमचे सरकार अल्पमतात आले तर तुम्हाला वाचवायला मी येणार नाही हे पवारांनी भाजपाला सांगून टाकले. याहीवेळी त्यांचे अनुयायी त्यांच्यासोबत निष्ठेने राहिले व राहतील. आपल्या अनुयायांच्या निष्ठांचे एकारलेपण ज्या नेत्याला गृहीत धरता येते त्यालाच अशा हालचाली जमतात. पवार आणि राज्यातील इतर पुढारी किंवा पवार आणि मुलायमसिंह यांच्यातील फरक यातून साऱ्यांच्या लक्षात यावा. एक गोष्ट मात्र पवारांच्या बाजूने नोंदवण्याजोगी. त्यांच्या अनुयायांनी जशी भक्तिपूर्वक साथ दिली तसे पवारांनीही त्यांना कधी वाऱ्यावर सोडलेले दिसले नाही. झालेच तर त्यांच्या राजकारणाने धर्मांध वा विचारांध भूमिका कधी घेतल्या नाहीत. आपल्या राजकारणात जात नावाची बाब साऱ्यांनाच जपावी लागते. मात्र याहीबाबत पवारांचे राजकारण कधी जात्यंध झाले नाही. कुणाचेही न होता ते सर्वांचे राहिले व साऱ्यांना त्यांच्या चांगल्या बाजूचा विश्वासच तेवढा वाटत राहिला. त्यांच्यापासून दूर झालेले आठवले वा मेटे यांनाच लोकांची तशी सहानुभूती वा आस्था मिळविता आली नाही. पवार हे उद्धव आणि राजचे काका, तसे फडणवीसांचेही आप्त आणि शेकापपासून डाव्या पक्षापर्यंतच्या साऱ्यांना जवळचे वाटणारे. राजकारणात प्रादेशिक राहूनही देशातील सर्वच पक्षांच्या लोकांना आपला वाटावा असा पवारांसारखा दुसरा नेता आज भारतात नाही. मोदी त्यांच्या भेटीला जातात आणि राहुल गांधीही त्यांचा पाहुणचार घेतात. आपले वाटावे आणि ते तसे आहेत की नाही याविषयीचा संभ्रमही असावा अशी ही अनिर्वचनीय पवार-प्रकृती. (आपल्या अध्यात्मात असूनही नसणाऱ्या आणि जाणवूनही न जाणवणाऱ्या बाबीची ओळख अनिर्वचनीय अशी करून दिली जाते म्हणून त्या शब्दाचा वापर) परवा पवारांनी फडणवीसांना आपण तुमच्यासोबत राहणार नाही हे बजावले. मात्र फडणवीसांपासून मोदींपर्यंत भाजपाच्या एकाही नेत्याने त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे दिसले नाही. पवारांचे मुत्सद्दीपण त्यांनाही पुरते कळले नसावे वा कळूनही गप्प राहण्याचा व वाट पाहण्याचा संयम त्यांना राखता आला ही बाब प्रश्नार्थक म्हणून लक्षात घेण्याजोगी. आपला पक्ष महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे हे ठाऊक असताना ते मणिपुरात निवडणुका लढवतात, उत्तर प्रदेशात उमेदवार उभे करतात आणि गोव्यातल्या जागांवरही हक्क सांगतात ही बाब गांभीर्याने घेण्याजोगी नसली तरी तिची टवाळीही कुणी केली नाही हे महत्त्वाचे. पवारांनी त्यांच्या या कसबाची देणगी आपल्या कोणत्याही अनुयायाला दिली नाही. सबब ते एकमेवाद्वितीयच राहिले. झालेच तर एक गोष्ट आणखीही. यशवंतरावांनी व्यक्तीकारणाचे राजकारण आणि राजकारणाचे समाजकारण केले. (त्यांच्या अगोदर एका महात्म्याने ही प्रक्रिया राजकारणाचे अध्यात्मीकरण करण्यापर्यंत पुढे नेली) पवारांनी ती प्रक्रिया उलट केली. त्यांनी समाजकारणाचे राजकारण आणि राजकारणाचे व्यक्तीकारण केले. ते त्यांना ज्या यशस्वीपणे करता आले तो साऱ्यांच्या कौतुक, कुतूहल आणि अभ्यासाचा विषय व्हावा.
‘अनिर्वचनीय’ शरद पवार
By admin | Published: February 18, 2017 12:42 AM