शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

सम्मेद शिखरजी आणि जैन धर्मीयांमधील अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 10:30 AM

सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्यास या स्थळाचे पुरातन पावित्र्य धोक्यात येईल, अशी भीती जैन बांधवांना वाटते; आणि ही भीती गैरलागू नव्हे!

- संजय सोनवणी(सांस्कृतिक अभ्यासक)

सम्मेद शिखरजी पर्वतरांगेतील पार्श्वनाथ हे सर्वात उंच ठिकाण आहे. छोटा नागपूर पठाराच्या पूर्वेला असलेले हे शिखर झारखंड राज्यात मोडते. सम्मेद शिखरजी हे जैन धर्मीयांचे पवित्र तीर्थक्षेत्र असून, याच पर्वतावर जैनांच्या चोवीस तीर्थंकरांपैकी २० तीर्थंकरांना निर्वाण प्राप्त झाले, अशी मान्यता आहे. यातील तेवीसावे तीर्थंकर पार्श्वनाथ फार महत्त्वाचे! या शिखरावर भगवान पार्श्वनाथांसहित सर्व तीर्थंकर व अनेक महान मुनींची प्राचीन मंदिरे आहेत. या ‘शाश्वत तीर्थ’स्थानाला भेट देण्यासाठी जगभरातून जैन धर्मीय आणि जैन तत्त्वज्ञानाबाबत आस्था असलेले भाविक येत असतात. 

सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळ घोषित करणारी अधिसूचना जारी झाल्यानंतर जैन धर्मीयांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ठिकठिकाणी आंदोलने सुरू असून, नऊ दिवसांच्या उपोषणानंतर मुनी सुज्ञयसागरजी यांचे निधन झाले आहे. सम्मेद शिखरजीला  पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्यास या स्थळाचे पुरातन पावित्र्य धोक्यात येईल, अशी भीती जैन बांधवांना वाटते. सर्वच पर्यटनस्थळांची सध्याची अनावस्था पाहता ही भीती गैरलागू नाही. अगदी राजपूत व मुघल सत्तांनीही या तीर्थस्थळाला सहकार्यच केले असल्याचे इतिहास सांगतो. पृथ्वीराज चौहान यांच्या  काळात या तीर्थस्थळाचा सर्व करही माफ केला गेला होता. १५९२मध्ये  बादशहा अकबराने एक फर्मान काढून शत्रुंजय (पालीताना), अबू, राजगीर आणि सम्मेद शिखरजी या पवित्र ठिकाणी कोणत्याही प्राण्याच्या हत्येस प्रतिबंध केला. 

शिवाय करमाफीची जुनी योजना तशीच कायम ठेवली. त्यावेळचे प्रसिद्ध जैन जगद्गुरू आचार्य हिरविजय सुरीश्वरजी महाराज यांच्या विनंतीवरून अकबराने हे फर्मान जारी केले होते. १६९८मध्ये जहांगीराचा द्वितीय पुत्र आलमगीरने शिखरजी हे स्थान जैन तीर्थयात्रींसाठी करमुक्त केले होते. परधर्मियांबाबत अनास्था न ठेवता मोगल सत्तेने या तीर्थस्थळाचे जनमानसातील स्थान मान्य करून हे निर्णय घेतले. ब्रिटिश काळात मात्र बंगाल सुभ्याचा सुभेदार नबाब अहमदशहा बहादूरने सम्मेद शिखरजी पर्वतावरील जमीन मुर्शिदाबादच्या जगत शेठ या धनाढ्यास विकली. जगत शेठने पालगंजच्या राजाला एका पत्रान्वये सम्मेद शिखरजी पर्वताचा काळजीवाहक म्हणून नेमले.

ब्रिटिश सरकारने याच पत्राचा आधार घेत पालगंजच्या राजाला या जमिनीचे सर्वाधिकार दिले. राजाने तीर्थस्थानाचा खर्च करावा, पण त्या बदल्यात तीर्थक्षेत्राला मिळणाऱ्या उत्पन्नात त्याला भागीदारीही दिली. राजाने याच अधिकाराचा वापर करत या पर्वतावरच्या जमिनीपैकी दोन हजार एकर जमीन चहाच्या मळ्यासाठी एका इंग्रजाला भाडेपट्ट्याने दिली आणि नव्या मालकाने १८८८ साली तेथे  कत्तलखानाही काढला. पूर्वीच्या सत्तांनी दिलेले परंपरागत मालकी व वहिवाट हक्क तर डावलण्यात आलेच, पण सम्मेद शिखरजीचे पावित्र्यही डागाळले. जैन धर्मियांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यावेळी पावित्र्याची आणि अहिंसेच्या मूलतत्वाची उद्घोषणा करण्यासाठी उभे ठाकले प्रसिद्ध प्रज्ञावंत व जैन तत्वज्ञ बॅरिस्टर वीरचंद गांधी. त्यांनी खुद्द पालगंजचा राजा आणि एका इंग्रज व्यक्तीविरुद्ध कलकत्ता उच्च न्यायालयात केस दाखल केली. प्राचीन आज्ञापत्रे व फर्माने पुराव्यादाखल पुढे ठेवली. इंग्रज न्यायालयाने ते पुरावे ग्राह्य धरून सम्मेद शिखरजीवरील कत्तलखाना बंद करण्याचा आदेश तर दिलाच, पण तो बेकायदा भाडेपट्टाही रद्द केला. 

तेव्हापासून आतापर्यंत सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळाचा दर्जा घोषित करेपर्यंत येथील शांतता व पावित्र्य अढळ राहिले. जे तत्व पूर्वीच्या हिंदू, मुघल आणि ब्रिटिश सत्तांनी  पाळले त्याला आता मात्र छेद मिळाला आहे. या स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, या मागणीकडे कानाडोळा करून या स्थळाला पर्यटनस्थळ म्हणून घोषित करणे हा या स्थळाचे पुरातन पावित्र्य धोक्यात आणण्याचा प्रकार आहे, अशी समस्त जैन बांधवांची भावना झाली आहे.त्या भागात राहणाऱ्या बहुसंख्य आदिवासींनाही सरकारचे हे कृत्य मान्य नाही. पार्श्वनाथ यांचे असंख्य अनुयायी गोंड, संथाल या आदिवासी समाजांपैकी होते.  येथे केवळ पर्यटनाच्या हेतूने गर्दी वाढली व पर्यटकांच्या सोयीसाठी सरकारने या पर्वताचे मूळचे सौंदर्य डागाळणारी बांधकामे केली तर शांतीच्या शोधात येणाऱ्या भाविकांचे येथे वावरणे कठीण होऊन जाईल. सरकारने पर्यटनस्थळासाठी सम्मेद शिखरजीकडे  नजर वळवावी हे अनाकलनीय आहे, हेच खरे!

टॅग्स :Jain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्र