रामदास भटकळ, ज्येष्ठ लेखक आणि प्रकाशक -
मराठी रंगभूमीची सुरुवात विष्णुदास भावे यांच्यापासून झाली असे आपण मानतो. तेव्हापासून कोणती नाटके आजपर्यंत टिकून आहेत? - ‘सौभद्र’, ‘शारदा’, ‘संशयकल्लाेळ’ ही संगीतामुळे बरीच टिकून राहिली. त्यानंतर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांची नाटके. मामा वरेरकर, मो. ग. रांगणेकर यांची तत्कालीन लोकप्रिय नाटके आज बव्हंशी विस्मृतीत गेली आहेत. ज्यांची नाटके वर्षानुवर्ष खेळली जाऊ शकतात असे फक्त प्रल्हाद केशव अत्रे आणि काही प्रमाणात पु. ल. देशपांडे. ह्या तात्कालिकतेला ताजे अपवाद दोनच. एकतर वि. वा. शिरवाडकर यांचे ‘नटसम्राट’! दीर्घकाळ प्रयोगरूपाने टिकलेले शिरवाडकरांचे हे एकच नाटक! पण, एका नाटककाराची अनेक नाटके दीर्घकालीन निकषावर टिकून असतील तर ते वसंत कानेटकर होत. त्यांचे सर्वांत लोकप्रिय नाटक ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आजही ठिकठिकाणी होत असते. मध्यंतरी बरीच वर्षे रोज त्यांचे एखादे तरी नाटक कुठेना कुठे प्रयोगात असायचेच. ह्या नाटकाच्या व्यावसायिक आणि व्यावहारिक यशामुळे त्यांच्या सुरुवातीच्या प्रायोगिक लेखनाकडे काहीसे दुर्लक्ष झाले आहे. त्याबद्दल आज थोडेसे. वसंतरावांना लेखनाचा, मराठी भाषेचा उत्तम वारसा होता. वडील गिरीश हे रविकिरण मंडळातले लोकप्रिय कवी. बालपणापासून साहित्याच्या सर्व स्तरांवर कानेटकरांचा परिचय. मामा वरेरकर, वि. स. खांडेकर, प्र. के. अत्रे, ना. सी. फडके हे भिन्न प्रवृत्तीचे लेखक. ह्या सर्वांना कानेटकरांविषयी आत्मीयता वाटायची. कानेटकरांवरील हा बहुरंगी संस्कार फार महत्त्वाचा ठरला. त्यामुळे त्यांनी कोणत्याही विशिष्ट गटाशी बांधिलकी मानली नाही. वसंतराव त्यांच्या तरुणपणापासून लिहीत असत. मनोविश्लेषणात्मक संज्ञाप्रवाहाच्या तंत्राने लिहिलेली ‘घर’ ही त्यांची अत्यंत उजवी कादंबरी.वसंतरावांच्या कथा तेव्हा निरनिराळ्या मासिकांतून प्रसिद्ध होत. मी ‘सत्यकथे’चा लेखक, अशी भूमिका त्यांनी घेतली नाही. काही महत्त्वाच्या लेखकांवर त्याचे बरेवाईट परिणाम झालेले दिसतात तसे त्यांच्यावर झाले नाहीत. ते निरनिराळे नाट्यपूर्ण विषय चित्रित करत तरी कथेच्या माध्यमातून त्यांची प्रतिभा फुलत नव्हती. त्यांची ‘पंख’ ही दुसरी कादंबरी लेखकाच्या नाटकातल्या गुंतवणुकीची चाहूल होती. त्यानंतरची ‘पोरका’ ही खांडेकरी पद्धतीची कादंबरी लिहितानाही त्यांना स्वत्व सापडले नाही. त्यानंतर मात्र त्यांनी आपल्याच एका कथेला नाट्यरूप द्यायचे ठरवले. वसंतराव तसे बोलघोवडे नव्हते. म्हटले तर संकोची स्वभावाचे होते.परक्याच्या घरी घुम्म होऊन बसायचे. भालबा केळकरांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन असा एक उत्तम संच पुण्यात जमवला होता. पुण्यात गेले की वसंतराव त्यांच्याशी आपल्या मनात वळवळणाऱ्या विषयांबद्दल बोलत असत. मी त्या वेळी कॉलेजमध्ये धडपडत होतो. आमच्या वयातच नव्हे, तर बऱ्याच बाबतींत अंतर होते. एका बाजूने मामा पेंडसे, चिंतामणराव कोल्हटकर यांसारख्या बुजुर्ग नटांचा प्रभाव दुसरीकडे इब्राहिम अल्काझी यांच्या शिस्तप्रिय आंतरराष्ट्रीय पद्धतीच्या रंगभूमीने मी घडत होतो. त्यामुळे कदाचित वसंतराव माझ्याशी त्यांच्या मनातील गोंधळांविषयी बोलत असत. औरंगजेब ह्या त्यांच्या लघुकथेला नाट्यरूप देताना वसंतरावांचा विचार बराचसा मनोविश्लेषणात्मक पद्धतीने चालला होता. त्यांचा नाटकाचा अभ्यास दांडगा असला तरी नाटकाचे तंत्र हा एक फसवा प्रकार आहे. नाटकातील पात्रे, घटनांचा समय, एकूण पार्श्वभूमी ही चटकन कशी मांडावी हे लक्षात येणे सोपे नसते. नाटकाची कथावस्तू प्रयोगाच्या सोयीसाठी कशी मांडावी, किती अंक, किती प्रवेश करावेत. अंक संपताना पुढे काय होणार यासंबंधीची उत्सुकता कशी वाढवावी ह्या विचारांनी ते बेजार असत.त्या दिवसांत नाटक तीन अंकी असावे असा प्रघात होता. दंडकच! भालबा केळकरांचा तसा आग्रह असायचा. वसंतरावांनी ते तीन अंकांचे बंधन न मानता त्यांच्या कथावस्तूला योग्य अशी मांडणी करावी असा माझा आग्रह असे. वसंतरावांनी अनेक खर्डे केले. भालबांना पुण्यात, मला मुंबईत, नाशकात बहुतेक सिंधूताईंना वाचून दाखवत. यातून त्यांच्यातील नाटककाराला फायदा झाला असणार. नाटक पीडीए बसवणार. तेव्हा त्यांनी धरलेल्या आग्रहानुसार तीन अंकांतच नाटक लिहिले गेले. सुरुवातीला थोडी लांबण जाणवायची. पण, एकदा का प्रत्यक्ष नाट्यवस्तूला सुरुवात झाली की ती सारी पात्रे जिवंत होत. सर्वच पात्रांना त्यांनी न्याय दिला होता. उत्तम कलाकार आणि भालबांचे दिग्दर्शन यांची साथ मिळाली आणि ‘वेड्याचं घर उन्हात’ हे नाटक हौशी नटांचे असूनही त्याचे महाराष्ट्रभर शंभराहून अधिक प्रयोग झाले. अनेक ज्येष्ठ नाट्यकर्मी हे नाटक पाहून थक्क झाले. पीडीए, डॉ. श्रीराम लागू आणि वसंत कानेटकर यांना एकदम प्रचंड कीर्ती मिळाली. हे यश वेगळ्या प्रकारचे होते. त्यानंतर वसंतरावांचा आत्मविश्वास बळावला. त्यांनी अगदीच वेगळ्या प्रकारचे नाटक लिहायला घेतले. पौराणिक पार्श्वभूमीचे. पण, अनोखे तत्त्वज्ञान मांडणारे ‘देवाचे मनोराज्य!’ हे नाटक फसले. पण वसंतरावांची प्रयोग करण्याची धमक कायम होती हे महत्त्वाचे.त्यानंतर त्यांनी लिहिलेली ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही एक फार वेगळ्या प्रकारची सुखात्मिका होती. प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे यांच्यापर्यंतच्या कोट्या किंवा व्यंगांवर आधारित विनोदापेक्षाही ‘प्रेमा तुझा रंग कसा’मधील विनोद वेगळा होता- विशुद्ध म्हणायला हरकत नाही. हे नाटक पीडीएच्या यशस्वी नाटकांपैकी एक ठरले. त्याचे इतरांनीही अनेक प्रयोग केले.यानंतर वसंतराव एक यशस्वी नाटककार मानले जाऊ लागले. त्यांची नाटक ह्या माध्यमावर आणि संवादलेखनावर पकड बसली. दरवेळी ते सर्वस्वी नवा विषय शोधायचे, त्या चिंतनात ते दंग व्हायचे. हा त्यांच्या प्रतिभेचा गुणधर्म. ‘राजा शिवाजी’ या गो. स. सरदेसाई यांच्या एका छोट्या पुस्तकाने ते प्रभावित झाले. आणि त्या झपाटलेल्या परिस्थितीत त्यांनी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे नाटक लिहिले. या नाटकाचे दिग्दर्शन मास्टर दत्ताराम या कसलेल्या व्यावसायिक नटाने केले. संभाजीची भूमिका डॉ. काशीनाथ घाणेकर यांनी गाजवली. या ऐतिहासिक नाटकापासून मराठी रंगभूमीवर नवीन इतिहास घडणार होता. आज अर्धशतकानंतरही हे नाटक मराठी रंगभूमीवरील हुकमी एक्का आहे.कानेटकरांच्या लेखनावर या यशाचा वेगळाच परिणाम झाला. मुख्य म्हणजे त्यांच्या आधीच्या लेखनातील प्रयोगशीलतेकडे प्रेक्षकांचे, समीक्षकांचे फारसे लक्ष गेले नाही. ‘वेड्याचं घर उन्हात’ हे एक आद्य प्रायोगिक नाटक होते. त्या नाटकाच्या व्यावहारिक यशाने हळूहळू हौशी आणि व्यावसायिक ह्या सीमारेषा पुसून टाकल्या. पण, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’पासून कानेटकरांच्या नाटकांना मिळालेल्या व्यावसायिक वळणामुळे हा पहिला अध्याय मात्र विस्मरणात गेला.ramdasbhatkal@gmail.com