‘पिंक’ या चित्रपटात ‘वुई शूड सेव्ह अवर बॉइज’ हे अमिताभ बच्चन यांच्या तोंडी असलेले वाक्य खूप महत्त्वाचे आहे. ते म्हणतात की, मुलांची काळजी घेतली तर मुली आपोआप सुरक्षित राहतील. याच चित्रपटात ते म्हणतात, `नाही` हा एक शब्द नसून ते एक वाक्य आहे. नाही म्हटल्यावर वेगळ्या स्पष्टीकरणाची, खुलाशाची गरज नाही. या साऱ्याची प्रकर्षाने आठवण होण्याचे निमित्त अर्थातच डोंबिवली या सांस्कृतिकनगरीत एका केवळ १५ वर्षे वयाच्या मुलीवर तब्बल नऊ महिने ३३ तरुणांनी केलेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेचे आहे. मुलीचे वय व बलात्कार करणाऱ्यांची संख्या यामुळे या घटनेचे वेगळेपण असले तरी दररोज देशभरात कुठे ना कुठे महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. महिलांवरील अत्याचाराचा कायदा कठोर केल्यामुळे व जनजागृती झाल्याने तक्रार दाखल करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे संख्यात्मकदृष्ट्या अत्याचाराच्या घटना वाढल्याचे दिसत असले तरी यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, आतापर्यंत अशा शेकडो घटना दाबून टाकण्यात समाज यशस्वी होत होता. आता स्त्रिया गप्प बसत नाहीत.
पोलिसांनी आतापर्यंत दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी एका मुलाच्या प्रेमात होती. यातून त्यांच्यात शरीरसंबंध घडले. त्या संबंधांचे चित्रीकरण करून तिला ब्लँकमेल करून अन्य तरुणांनी तिच्यावर बलात्कार केले. मुळात अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध ठेवणे हा गुन्हा आहे हा संस्कार त्या मुलावर तसेच त्या मुलीवर तिच्या घरातून व्हायला हवा होता. शरीरसंबंधांचे फोटो व व्हिडिओ काढून घेणे हे सर्रास सुरू आहे. सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या भागातही अशी कृत्ये बिनधोक केली जातात. मग हे फुटेज किंवा चित्रफीत दाखवून ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार वाढले आहेत. डोंबिवलीतील मुलीला पुढे ब्लॅकमेलिंगला सामोरे जावे लागले, कारण त्या मुलाच्या हाती असलेला “तो” व्हिडिओ आणि फोटो ! हे शस्त्र वापरून मुलींना आपल्या कह्यात आणण्याच्या घटना हल्ली सातत्याने उघड होतात. याबाबत पुरेशी जागरूकता नसल्याने हे प्रकार चालू आहेत. डोंबिवलीतील घटनेतील बहुतांश मुले ही कनिष्ठ मध्यमवर्गीय आहेत. मात्र अशी विकृत मानसिकता हे केवळ गोरगरिबांचे व्यवच्छेदक लक्षण नाही.
अतिश्रीमंतांच्या जगात चित्र आणखी भयानक आहे. मुंबई-दिल्लीसारख्या महानगरांमधल्या श्रीमंतांच्या शाळांमध्ये शाळकरी मुले काय करतात, याच्याही बातम्या आलेल्या आहेतच. पॉर्नच्या माऱ्यामुळे नात्यांचा ओलावा संपुष्टात येऊन वखवख वाढल्याचे हे लक्षण आहे. मोबाइल, सोशल मीडिया हे जीवनाचा अविभाज्य अंग झाले आहे. आपली मुले मोबाइलमध्ये दिवसभर काय करतात हे जाणून घेण्यास पालकांना वेळ नाही. समजा पालकांनी तसा प्रयत्न केला, तर मुला-मुलींना ते आपल्या खासगीपणावरील अतिक्रमण वाटते. काही मुलांनी यामुळे आत्महत्या केल्याच्याही घटना घडल्या आहेत. शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षण, पौंगंडावस्थेत होणाऱ्या चुकांमुळे कायद्याच्या कचाट्यात सापडण्याचा असलेला धोका, सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे होणारी संभाव्य कारवाई याबाबत मुलांना संस्कारित करायला हवे. आभासी जग आणि वास्तवातील जग याची गल्लत न करण्याबाबत मार्गदर्शन करायला हवे. यापेक्षा अधिक व्यापक मुद्दा आहे तो सुस्थापित जीवनाचा. माणसाचा मूळ स्वभाव हा पशुसारखे स्वैर वर्तन करण्याचा. परंतु विवाहसंस्थेच्या बेडीने त्याच्या स्वैराचाराला चाप बसवण्याचा प्रयत्न अनेक पिढ्यांत केला गेला. त्यामुळे त्याच्या स्वैराचाराला काही प्रमाणात आळा बसला, पण त्याची मूळ प्रवृत्ती कायमच राहिली. एकेकाळी मॅट्रिक झालेल्या, पदविका प्राप्त केलेल्यांनाही नोकरी मिळत होती, घराकरिता कर्ज उपलब्ध होत होते व संसारात शिरल्यावर सुरक्षिततेच्या कोषात ते रुळत होते.
गेल्या काही वर्षांत शिक्षणाची किंमत कमी झाली आहे. कमीत कमी वेतनात उच्चशिक्षित मंडळी उपलब्ध होत असल्याने अल्पशिक्षितांकरिता मोलमजुरी करण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. अशा तरुणांना भवितव्य नसल्याने हातात येणारी अल्पस्वल्प कमाई मौजमजेवर उडवायची, मिळेल ते ओरबाडायचे ही वृत्ती बळावली आहे. यातून मग परस्परांवर जाळी फेकणे, ब्लॅकमेलिंग करणे, खात्यातील पैसे लुटणे हे प्रकार वाढले आहेत. डोंबिवली ही सांस्कृतिक, सुसंस्कृत नगरी आहे, असा दावा केला जातो. परंतु येथील मध्यमवर्गीयांत असे काही घडतच नसेल, याची छातीठोक हमी कुणीच देऊ शकत नाही.