- विनय उपासनीसौदी घराण्याचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान ऊर्फ ‘एमबीएस’ यांच्याच इशाऱ्यावरून जमाल खाशोगी या अमेरिकेत आसरा घेतलेल्या बंडखोर सौदी पत्रकाराची हत्या झाल्याचा अहवाल नुकताच अमेरिकेने जाहीर केला. सत्तेवर आल्यानंतर अवघ्या महिनाभरात अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाईल, अशा प्रकारचा हा निर्णय आहे. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुश्नेर आणि ‘एमबीएस’ यांची सलगी असल्याने ट्रम्प प्रशासनाने खाशोगी हत्येप्रकरणी तोंडात मिठाची गुळणी धरली होती.
दोन वर्षांपूर्वी तुर्कस्तानाची राजधानी इस्तंबूलच्या दूतावासात सापळा रचून जमाल खाशोगी यांची हत्या करण्यात आली. खाशोगी यांचा दोष एवढाच की, त्यांनी मोहम्मद बिन सलमान यांच्या धोरणांना विरोध दर्शवला होता. त्यामुळे खाशोगी यांना देशत्याग करावा लागला. त्यांनी थेट अमेरिकेचा आसरा घेतला. तेथूनही खाशोगी यांनी नेमस्तपणे आपली भूमिका कायम राखली होती. ‘वॉशिंग्टन पोस्ट’या ख्यातनाम वर्तमानपत्रातून खाशोगी सौदी अरेबियात राबविण्यात येत असलेल्या धोरणांवर टीकेचे आसूड ओढतच होते.
खाशोगी यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ अमेरिकेत आश्रय घेतलेले परदेशातील बंडखोर पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देणाऱ्यांना अमेरिकेत प्रवेशबंदी करणारा ‘खाशोगी कायदा’ पारित करण्यात येणार असल्याची घोषणा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी केली आहे. असाच एक कायदा बराक ओबामा यांच्या कारकिर्दीत - २०१२ मध्ये - पारित करण्यात आला होता. त्या कायद्याचे नाव होते ‘सर्गेई मॅगनित्स्की कायदा’. रशियामध्ये प्रचंड प्रमाणात बोकाळलेल्या भ्रष्टाचारात सरकारातील उच्च पदस्थांचाच कसा हात आहे, हे सप्रमाण सिद्ध करणारे सर्गेई मॅगनित्स्की यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ हा कायदा करण्यात आला होता.
रशियातील करासंदर्भातील कायदे सल्लागार असलेल्या सर्गेई मॅगनित्स्की यांनी २३ कोटी डॉलरच्या करचोरीचा पर्दाफाश केला होता. त्यात रशियन सत्ताधाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. मॅगनित्स्की यांनी याबाबत आवाज उठवण्याचा अखंड प्रयत्न केला. अध्यक्ष पुतिन यांच्यापर्यंत तक्रारी केल्या. परंतु काहीही कारवाई झाली नाही. उलटपक्षी मॅगनित्स्की यांनाच तुरुंगात डांबण्यात आले. एका सामान्य कैद्याप्रमाणे मॅगनित्स्की यांना वागणूक देण्यात आली. तुरुंगातच त्यांना विविध व्याधींनी जखडले. त्यांना वैद्यकीय उपचार देण्यात टाळाटाळ करण्यात आली.
२००९ मध्ये मॅगनित्स्की यांचा तुरुंगातच पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. परंतु मॅगनित्स्की यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मॅगनित्स्की यांचे अमेरिकी मित्र बिल ब्राऊडर यांनी आपल्या मित्राची ही कथा जगासमोर आणली. त्यांनी अमेरिकी संसदेत त्यासाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग करत ‘मॅगनित्स्की कायदा’ मंजूर करून घेतला. मॅगनित्स्की यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या लोकांना शिक्षा करणे आणि त्यांना अमेरिकन भूमी पासून दूर ठेवणे, हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट होते. उल्लेखनीय म्हणजे हा कायदा पारित करून घेण्यासाठी तत्कालीन उपाध्यक्ष व विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
२०१६ पासून जगभरासाठी ‘मॅगनित्स्की कायदा’ लागू झाला. अमेरिकेच्या इतिहासातील हा एक असा सर्वसमावेशक कायदा आहे, जो मानवाधिकारांचे रक्षण करतो आणि भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कारवाईचे आश्वासन देतो. आतापर्यंत या कायद्यांतर्गत १०१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. जमाल खाशोगी हत्या प्रकरणात संशयाची सुई असलेल्या १७ जणांचाही त्यात समावेश आहे. आता याच मॅगनित्स्की कायद्याच्या धर्तीवर ‘खाशोगी कायदा’ तयार करण्यात येणार असून अमेरिकेत आश्रय घेतलेले विदेशी पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना तो संरक्षण देणार आहे. जमाल खाशोगी यांना ज्या पद्धतीने आमिष दाखवून आणि फसवून तुर्कस्तानच्या सौदी दूतावासात त्यांची हत्या करण्यात आली, तसा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी हा कायदा महत्त्वाची भूमिका पार पाडू शकणार आहे.