कोरोना प्रादुर्भावाविषयीच्या कधी सचिंत करणाऱ्या तर कधी आश्वस्त करणाऱ्या संमिश्र वार्ता कानी पडत असताना वर्ष सरत आले असून, नाताळाचे आगमन झालेय. गतवर्षी याच काळात चीनमध्ये कोरोनाने उसळी घेतली होती. पण, कोरोनाचा संसर्ग चीनच्या सीमा ओलांडून उर्वरित जगालाही तितक्याच झपाट्याने आपल्या कवेत घेईल, याची कल्पना नसल्याने नाताळ विशेष धास्तीविना साजरा करता आला. यंदा परिस्थिती बरीच नाजूक झालेली आहे. युरोप आणि अमेरिकेतील बेजबाबदार सार्वजनिक वर्तनाने तिथल्या आरोग्य यंत्रणेवर ‘न भूतो...’ असा दबाव आणला असून, रुग्णालयांच्या रेशनिंगची वेळ प्रशासनांवर आलेली आहे.
आफ्रिका व आशियातील देशांतली परिस्थिती तुलनेने तितकी खराब नसली तरी मुळातच आरोग्य यंत्रणा दुबळी असल्यामुळे आणि आर्थिक स्थिती खालावल्यामुळे तिथल्या प्रशासन यंत्रणेवरही प्रचंड ताण आहे. त्यातच इंग्लंडमध्ये कोरोनाचे नवे उत्परिवर्तन आढळल्याने चलबिचल वाढलेली आहे. दुसऱ्या बाजूने कोरोनाविरोधी लस उपलब्ध झाली असून, श्रीमंत देशांत तिची टोचणीही सुरू झालेली आहे. वर्षभरात ही लस जगभर मिळेल, गरिबांपर्यंतही ती पोहोचेल आणि कोरोनाच्या प्रसाराची शृंखला खंडित होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. त्यामुळे वर्षभरातले सण साजरे करताना आपण जो निराशेचा अनुभव घेतला, तो जशाचा तसा या नाताळात दिसू नये. नाताळ हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा सोहळा.
येशूच्या जीवनाला कारुण्याची गडद किनार होती, मानवतेच्या उत्कर्षाची असोशी होती. कोरोनाचा दाहक अनुभव घेताना जगाने वेगळ्या प्रकारे जे साहचर्य अनुभवले, त्याची वीण येशूच्या संदेशाशी घालता येते. विषाणूच्या पारिपत्त्यासाठी अवघ्या जगाने आपली प्रज्ञा संघटितपणे पणास लावली. संशोधकांच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावरल्या समन्वयाची जोड नसती तर जो तो आपल्या कोशातच राहून संशोधनाच्या कित्येक स्तरांची पुनरावृत्ती करत बसला असता आणि लस कित्येक वर्षे दूर राहिली असती. २०१९च्या डिसेंबर अखेरीस चीनमध्ये गतिमान झालेल्या प्राथमिक संशोधनाने युरोप-अमेरिकेतील संशोधकांना आवश्यक माहिती उपलब्ध करून देत मौल्यवान वेळ वाचवला. परिणामी, आज विक्रमी कालावधीत लस उपलब्ध झालीय. एरवी लसनिर्माणाची प्रक्रिया किमान सहा-सात वर्षे चालत असते. कोविड-१९ विरोधी लस तयार होण्यास जेमतेम सात महिने लागले.
भेदाभेदांचे दृष्य-अदृष्य अडथळे ओलांडून मानवतेने साधलेला हा समन्वय अन्य सर्व धर्मांप्रमाणे येशूच्या धर्माचेही अधिष्ठान आहे. दुर्बलांच्या उत्थानासाठी येशूने जीवन वेचले. आज मेलिंदा आणि बिल गेट्स फाउंडेशन कोट्यवधी रुपयांचे साहाय्य भारतातील सिरम इन्स्टिट्यूटला देत असून, त्या आस्थापनात तयार केलेल्या लसींचे डोस भारतासह जगातील कितीतरी दुर्बल देशातल्या लोकसंख्येसाठी वापरले जाणार आहेत. हे येशूच्या मार्गाचेच अनुसरण नव्हे काय? हा मार्ग अनुसरताना फाउंडेशनने किंवा प्रगत जगातील अन्य सेवाभावी संस्था व व्यक्तींनी जातिधर्माविषयीचा विचारही केलेला नाही. महामारीच्या काळात अडल्या हातांपर्यंत आणि मुक्या हाकांपर्यंत असंख्यांनी जमेल तशी धाव घेतली. कुणी भुकेल्यांच्या पोटात अन्न जावे म्हणून धडपडले तर कुणी कष्टांसाठी आतुरलेल्या हातांना काम दिले.
कुणी आजाऱ्यांची शुश्रूषा केली तर कुणी वाटेत अडकून पडलेल्यांना इच्छितस्थळी रवाना होण्यास साहाय्य केले. मानवतेच्या अक्षय वाहत्या झऱ्याचे जे दर्शन या कठिण समयी घडले त्यामागे जगभरातल्या धर्मतत्त्वांनी दिलेल्या परसेवेच्या दीक्षेचाही प्रभाव आहे. यातून आपल्यातल्या अनेकांच्या पर्यावरणीय संवेदना अधिक सजग झाल्या असतील. त्यांचे पर्यावरण संवर्धनातले यत्न पृथ्वीला अधिक आयुष्य देणारे आणि म्हणूनच येशू ख्रिस्त किंवा मानवतेच्या कल्याणासाठी जीवन वेचणाऱ्या अन्य देवपुत्रांच्या अनुयायांचेच असतील.
नाताळपाठोपाठ नवे वर्ष येणार आहे. तसा हा सण काही विशिष्ट धर्मापुरताच मर्यादित राहिलेला नाही. वैश्विकीकरणाच्या विद्यमान युगात आपल्या जीवनात आनंद निर्माण करणारे, आपली विजिगीषा जागृत ठेवणारे सण धर्माच्या मर्यादा ओलांडून मानवतेचे उत्सव होत असतात. म्हणूनच दिवाळीसारखा प्रकाशाभिमुख जीवनाचा संदेश देणारा सण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासात साजरा होत असतो. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताचा सोहळाही असाच वैश्विक झालेला आहे. त्यात प्रत्येकाने सहभागी होत आनंदाच्या आणि आशेच्या उन्मेशांना आपल्या मनाच्या कोंदणात जोजवावे आणि मानवतेच्या व्याधीविरहित विकासासाठी जगभरात चाललेल्या संघटित यत्नांना सुयश मिळावे, अशी प्रार्थना करावी.