एखाद्या पुरुषानं लग्नच केलेलं नाही आणि ‘एकटं’ राहणंच ज्याला आवडतं, त्याला मूल होऊ शकेल का? - पण असं झालं आहे खरं! अर्थात या ‘ब्रह्मचारी’ आणि एकट्या पुरुषाला एखादं जाऊ द्या, किती मुलं असावीत? त्याला किमान शंभर मुलं आहेत आणि तीही वेगवेगळ्या किमान बारा देशांत!
ही गोष्ट अशक्य वाटत असली तरी ती खरी आहे आणि खुद्द त्या व्यक्तीनंच त्याची कबुली दिली आहे. आता ही व्यक्तीही कोणी साधीसुधी नाही, तर ‘टेलिग्राम’ या मेसेजिंग ॲपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पॉवेल डुरोव हे ते गृहस्थ आहेत. टेलिग्रामच्या माध्यमातूनच त्यांनी नुकतीच ही माहिती दिली आहे. टेलिग्रामवर एका पोस्टद्वारे आपल्या तब्बल ५.७ दशलक्ष ग्राहकांना त्यांनी ही माहिती शेअर केली. पॉवेल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, मला नुकतंच कळलं की मला शंभरपेक्षा जास्त बायॉलॉजिकल मुलं आहेत आणि वेगवेगळ्या किमान बारा देशांमध्ये त्यांची ही मुलं आहेत. याबद्दल त्यांनी स्वत:ही आश्चर्य व्यक्त केलं आहे.
त्यांना शंभर जैविक मुलं कशी झाली आणि त्याची सुरुवात कशी झाली, याबद्दलचा किस्साही त्यांनी जाहीर केला आहे. साधारण १५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पॉवेल यांचा एक जवळचा मित्र एक दिवस त्यांच्या घरी आला. तो अतिशय गंभीर आणि चिंताक्रांत होता. त्यानं त्यादिवशी पॉवेलला एक विचित्र विनंती केली. तो म्हणाला, आम्हा नवरा-बायकोमध्ये ‘फर्टिलिटी इश्यू’ (प्रजननासंबंधी समस्या) असल्यानं आम्हाला मूल हाेऊ शकत नाही. तू शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अतिशय फिट आहेस. तू आमचा चांगला मित्र आहेस आणि आम्ही तुला अतिशय चांगलं ओळखतो. शिवाय आम्हाला आमच्या मुलासाठी उत्कृष्ट बीज हवं आहे, त्यामुळे तू आमच्यासाठी तुझे शुक्राणू दान कर, ज्याद्वारे आम्ही मुलाला जन्म देऊ शकू.. मित्राचं हे बोलणं मी हसण्यावारी नेलं, पण मित्र यासाठी अतिशय गंभीर आणि आग्रही होता, त्यामुळे मीही याविषयी विचार करू लागलो..
त्यानंतर पॉवेल स्पर्म क्लिनिकमध्ये गेले. तिथल्या डॉक्टरांना भेटले. डॉक्टरांनीही पॉवेल यांना सांगितलं, उच्च दर्जाचे शुक्राणू असलेल्या तरुणांची संख्या जगात अतिशय कमी आहे. त्याचवेळी संपूर्ण जगात अशी अनेक दाम्पत्यं आहेत, जी अपत्याअभावी अतिशय दु:खी आहेत. त्यामुळे तुम्ही केवळ तुमच्या मित्रालाच नव्हे, तर अशा अनेक गरजू दाम्पत्यांसाठी तुमचे शुक्राणू दान केले पाहिजेत.
पॉवेल यांना सुरुवातीला ही कल्पना फारशी रुचली नाही, त्यांना हा शुद्ध वेडेपणा वाटला, पण आधी मित्रासाठी आणि नंतर इतरांसाठीही त्यांनी आपले शुक्राणू दान करायला सुरुवात केली. अनेक दाम्पत्यं अपत्याअभावी किती चिंतित, दु:खी असतात आणि त्यासाठी ते किती प्रयत्न करतात हे पाहिल्यावर मात्र पॉवेलदेखील याविषयी गांभीर्यानं विचार करू लागले. नुकतंच त्यांना कळलं, त्यांनी दान केलेल्या शुक्राणूंमुळे वेगवेगळ्या बारा देशांतील किमान शंभर दाम्पत्यांना अपत्यप्राप्ती झाली आहे. पॉवेल म्हणतात, माझ्या या कृत्याचा मला आता अभिमान वाटतो.
आपल्याला मूल झाल्यामुळे त्या दाम्पत्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या आयुष्यात किती आनंद फुलला असेल, याची कल्पना मी करू शकतो!.. पॉवेल यांनी काही वर्षांपूर्वीच आपले शुक्राणू दान करणं बंद केलं, पण त्यांच्या म्हणण्यानुसार आणखी किमान एका आयव्हीएफ क्लिनिकमध्ये त्यांचे शुक्राणू जतन करून ठेवण्यात आले आहेत. भविष्यात त्याद्वारे आणखी काही दाम्पत्यांना अपत्यप्राप्तीसाठी त्याचा उपयोग केला जाऊ शकेल. पॉवेल यांच्या म्हणण्यानुसार शुक्राणू दान करण्यासंबंधी जगभरात अजूनही खूप अनास्था आहे. लोकांची ही धारणा बदलली पाहिजे.
भविष्यात मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे. शरीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असलेल्या पुरुषांनी आपल्या शुक्राणूंचं दान केलं पाहिजे. अपत्यप्राप्तीसाठी जीवापाड प्रयत्न आणि संघर्ष करणाऱ्या दाम्पत्यांना त्यांचा उपयोग होईल, त्यांच्या आयुष्यात हास्य फुलेल आणि मुख्य म्हणजे सुदृढ बिजामुळे त्यांचं होणारं अपत्यही तसंच सुदृढ जन्माला येऊ शकेल. पॉवेल यांच्या या कृत्याचं जगभरात अनेकांनी अभिनंदन केलं असलं तरी अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे. ही ‘बढाई’ मारण्याची गोष्ट नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.
पॉवेल डीएनए ‘ओपन सोर्स’ करणार
यासंदर्भात पॉवेल यांच्या डोक्यात एक नवीच कल्पना आहे. आपला डीएनए ‘ओपन सोर्स’ करण्याच्या विचारात ते आहेत. त्यामुळे त्यांची जैविक मुलं एकमेकांना शोधू शकतील. त्यांचं म्हणणं आहे, शुक्राणू दानासंदर्भात जगभरात चर्चा झाली पाहिजे. सशक्त, आरोग्यदायी शुक्राणूंची संपूर्ण जगभरातच कमतरता आहे. यासंदर्भातील उणीव कमी करण्यात मी माझ्या परीनं प्रयत्न केला, याचा मला गर्व आहे.