‘ती सध्या काय करते?’ हा चित्रपट काही वर्षांपूर्वी बराच गाजला होता. त्यामधील नायकाला ज्याप्रमाणे त्याचे पहिले प्रेम असलेल्या आणि दुसऱ्या कुणाशी विवाहबद्ध झालेल्या नायिकेच्या वर्तमानाबद्दल उत्सुकता असते, तशीच उत्सुकता जगाला चीनबद्दल वाटत असते. पोलादी पडद्याआड चीन सध्या काय करतोय, हा गत काही दशकांपासून जगाच्या औत्सुक्याचा विषय बनला आहे.
चीन हा तसा प्राचीन काळापासूनच गूढ देश आहे. सांस्कृतिक क्रांतीनंतर चीनने स्वत:ला पोलादी पडद्याआड बंदिस्त करून घेतले आणि मग चीन आणखीच गूढ बनला. गत शतकाच्या अखेरच्या कालखंडात चीनने तो पोलादी पडदा जरासा बाजूला सरकवला खरा; पण त्यामधून उर्वरित जगाला आपल्याला हवे तेच दिसेल, याची पुरती तजवीज करून ठेवली. परिणामी, जगाची चीनसंदर्भातील उत्सुकता कायमच आहे आणि गत काही दिवसांत चीनमधून झिरपत असलेल्या बातम्यांमुळे ती वाढतच आहे. सर्वसामान्य चिनी जनता सध्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवण्यासाठी बाजारांमध्ये प्रचंड गर्दी करीत आहे आणि त्यामुळे बाजारांत चणचण निर्माण झाली आहे, ही त्या मालिकेतील ताजी बातमी!
चीनमध्ये पुन्हा एकदा कोविडचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा टाळेबंदी जाहीर करावी लागते की काय, अशी भीती चिनी सरकारला वाटत आहे. त्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवायला सांगितले आहे, असे स्पष्टीकरण चिनी सरकारने दिले आहे. चिनी जनतेचा मात्र त्यावर विश्वास दिसत नाही. तैवान ताब्यात घेण्यासाठी चीन युद्धाच्या तयारीत असावा आणि त्यामुळेच जीवनावश्यक वस्तूंचा साठा करायला सांगितले असावे, असा जनतेला संशय आहे. गत काही काळापासून चीनद्वारा ज्या गतिविधी सुरू आहेत, त्या बघू जाता, चिनी जनतेने तसा संशय घेणे स्वाभाविकच म्हणायला हवे.
गत काही काळात चीनने वारंवार तैवानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले आहे. एवढेच नव्हे तर, तैवान हा चीनचाच भाग असल्यामुळे, एक ना एक दिवस आम्ही तो भूभाग ताब्यात घेऊच, अशी दर्पोक्तीही चीन अलीकडे वारंवार करीत आहे. केवळ तैवानच्याच नव्हे, तर भारताच्या सीमेवरही चीनच्या कुरापती सुरूच आहेत. खरे म्हटल्यास चीनचे बहुतांश शेजारी देशांशी वाकडे आहे. त्यामागील कारण म्हणजे चीनचा त्या देशांच्या भूभागांवर असलेला डोळा!
नव्याने व्यायामशाळेत जाऊ लागलेल्या नवयुवकांचे बाहू सदोदित फुरफुरत असतात. चीनचेही सध्या तसेच झाले आहे. जगातील प्रमुख अर्थसत्ता बनल्यानंतर, त्या जोरावर लष्करी महासत्ता बनण्याचा ध्यास चीनने घेतला होता आणि आता तो पूर्णत्वास गेल्याचे चीनला वाटू लागले आहे. आता अमेरिकेला सर्वच क्षेत्रांमध्ये मागे सारून, जगातील एकमेव महासत्ता म्हणून दादागिरी करण्याची हौस चीनला लागली आहे. ती पूर्ण करण्यासाठी कधी भारताशी, कधी तैवानशी, तर कधी जपानशी कुरापती काढण्याचे चीनचे उद्योग सातत्याने सुरू असतात. त्याशिवाय चीनमध्ये आर्थिक आणि राजकीय आघाडीवरही सर्व काही आलबेल नसावे, असा संशय घेण्यास पुरेपूर जागा आहे.
बांधकाम क्षेत्रातील सर्वांत मोठी चिनी कंपनी एव्हरग्रांड दिवाळखोरीच्या तोंडावर उभी आहे. अर्थतज्ज्ञ या घडामोडीची तुलना २००८ मधील जागतिक वित्त संकटाशी करीत आहेत. तेव्हा लेहमन ब्रदर्स ही अमेरिकेतील मोठी गुंतवणूक बँक अचानक कोसळली होती आणि संपूर्ण जग मंदीच्या फेऱ्यात ढकलले गेले होते. तेथूनच अमेरिकेच्या जागतिक वर्चस्वास हादरे बसायला सुरुवात झाली होती आणि अमेरिका अजूनही त्यातून सावरू शकलेली नाही. एव्हरग्रांड चीनची लेहमन ब्रदर्स सिद्ध होऊ शकते, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. भरीस भर म्हणून ‘बेल्ट ॲण्ड रोड इनिशिएटिव्ह’ हा चीनचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पही संकटात सापडला आहे.
चीनचा खूप जिव्हाळ्याचा ‘चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ प्रकल्पही थंड बस्त्यात पडला आहे. त्यामुळे चीन एवढा अस्वस्थ झाला आहे, की काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया ‘बेल्ट ॲण्ड रोड इनिशिएटिव्ह’मधून बाहेर पडला, तेव्हा त्या देशाला धमकी देण्यापर्यंत चीनची मजल गेली. त्यातच सरकारच्या धोरणांमुळे तीन लाख सैनिक बेरोजगार झाल्याने माजी सैनिकांनी निदर्शने सुरू केली आहेत. बहुधा या देशांतर्गत अस्वस्थतेमुळेच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गत दोन वर्षांपासून देशाबाहेर पाऊल ठेवलेले नाही. ते या अस्वस्थतेवर कशी मात करतात, यावरच त्यांचे स्वत:चे आणि चीनचेही भविष्य अवलंबून असेल!