निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्ष अन् शिवसेनेच्या मालकीची लढाई चाललेली असताना ठाकरेंच्या हातून एकेक करीत सगळेच निघून जात असल्याचे दिसत आहे. आता उद्धव ठाकरेंचे काय होणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर शिंदे गटाकडून प्रसिद्धीमाध्यमांना एक पत्र पाठविले गेले की, यापुढे आमचा उल्लेख फक्त ‘शिवसेना’ असा करा, शिंदे गट असे लिहू नका. आयोगाने आदेश दिला असला तरी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट असल्याने शिंदे गट, ठाकरे गट असे लिहायला कोणाची हरकत नसावी. बाळासाहेबांकडून मिळालेला ठाकरे ब्रँड अजूनही ‘मातोश्री’वर आहे. तो कोणालाही पळविता येणार नाही. सत्तासंघर्षानंतर ठाकरेंना काही प्रमाणात सहानुभूती मिळाली आहे. आयोगाच्या आदेशानंतर ती वाढली, असा ठाकरे गटातील नेत्यांचा दावा आहे. मात्र, राजकीय व्यवहारवादाच्या स्पर्धेत दिवस जातील तशी ही सहानुभूती बोथट होत जाईल.
ठाकरेमुक्त शिवसेना इतक्या लवकर शक्य नाही. गळ्यात भगवा दुपट्टा अन् कपाळावर भगवा टिळा लावणारा गावोगावचा शिवसैनिक कोणासोबत आहे व राहील यावर सगळा खेळ असेल. सत्तेच्या मोहात अडकून ठाकरेंनी शिवसेनेची वाट लावली, हे खरे मानले तरी, ठाकरेंकडील शिवसेना काढली, धनुष्य-बाण हिसकावला म्हणून ते संपतील असे मानणे हा राजकीय मूर्खपणा ठरेल. पात्रता असो-नसो; ७५ वर्षांच्या लोकशाहीतही घराणेशाहीचे गारूड कायम आहे. ठाकरेंसाठी सर्वांत कसोटीचा काळ यापुढचा असेल. उद्धव ठाकरेंकडे आता काय उरले आहे? त्यांच्याकडे त्यांनी निर्माण केलेली एक सोज्ज्वळ नेत्याची प्रतिमा आहे. ती किती खरी, यावर नक्कीच वाद होऊ शकतो. बाळासाहेब असोत की उद्धव ठाकरे; दोघांनी कायम ज्यांच्यावर देशद्रोही म्हणून टीका केली, त्या समुदायातील तरुणाईच्या डीपीवर सध्या उद्धव ठाकरे दिसतात... म्हणजे पाहा! सगळा खेळ तुम्ही तुमची प्रतिमा कशी बनवता / बदलता यावर आहे. उद्धव हे जसे असल्याचे भासवतात तसे ते प्रत्यक्षात नाहीत, असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करणारे बरेचजण आहेत. त्याच वेळी ते अंतर्बाह्य सोज्ज्वळ असल्याचे छातीठोकपणे सांगणारेही आहेतच.
भगतसिंह कोश्यारी यांनी तर राज्यपालपद सोडल्यावर ठाकरे यांना ‘संत’ म्हटले. ठाकरेंकडे आता केवळ त्यांची प्रतिमा उरली असताना, त्यांच्या प्रतिमाभंजनाचा प्रयत्न नजीकच्या भविष्यात केला जाऊ शकतो. काही गोष्टी चौकशीच्या आणि कारवाईच्या रडारवरदेखील येतील, असे दिसते. प्रतिमाभंजनातून ठाकरे परिवाराची दुसरी बाजू समोर आणण्याची खेळी बुमरँग तर होणार नाही ना, याचा अंदाजही सध्या घेतला जात असल्याची माहिती आहे. चौकशी, कारवाईच्या फेऱ्यानंतर ठाकरेंची प्रतिमा खरेच मलिन झाली तर ‘मातोश्री’ला आणखी उतरती कळा लागेल. प्रतिमा टिकली तर ठाकरेंचे वर्चस्व वाढेल. सध्या तरी अस्थिर आणि अधांतरी अशी ठाकरेंची अवस्था आहे. दोन हजार कोटींच्या आरोपांवरून खासदार संजय राऊत कमालीचे अडचणीत येतील, असे दिसते...अधांतर आणि अस्थिर क्षितीज मोकळे नाही. सध्या तीन वर्षांपूर्वीचे गडे मुर्दे बाहेर काढण्याची सर्वच नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. पहाटेच्या शपथविधीसह तेव्हाचे अनेक विषय चघळले जात आहेत. मुद्द्यांवरून सामान्यांचे लक्ष हटविण्यासाठीची ही सर्वपक्षीय खेळी आहे.
परदेशी, ब्रिजेश सिंह आले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ज्यांचा दबदबा होता, ते प्रवीणसिंह परदेशी मंत्रालयात परतले आहेत. अमिताभ बच्चन यांना सिनेमांना अन् परदेशींना प्रशासनात निवृत्तीचा नियम लागू होत नाही. राज्याची अर्थव्यवस्था तीन ट्रिलियन डॉलरची करण्यासाठी स्थापलेल्या मित्रा संस्थेचे सीईओ म्हणून परदेशी आले आहेत. अजय अशर हे मुख्यमंत्र्यांचे मित्र याच मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांवरील त्यांचा असर हल्ली कमी झाला आहे असे म्हणतात. सत्ताबाह्य केंद्र निर्माण होऊ देऊ नका, असा आदेश दिल्लीहून आल्यानंतर असे घडल्याचीही चर्चा आहे. सीएमओमध्ये ‘आनंद’ कोण आहे माहीत नाही; पण त्यांच्या नावाचा आधार घेऊन आमच्याकडे सध्या ‘सगळे आनंदीआनंद आहे!’ अशी कोटी सीएमओमधील काही अधिकारी करतात. त्यांना सातव्या मजल्यावर असलेले आणि मुख्यमंत्र्यांपेक्षाही मोठे केबिन दिले आहे! डायरेक्ट दिल्लीचा माणूस आहे म्हणतात!
फडणवीस यांच्या काळात माहिती जनसंपर्क विभागाचे सचिव व महासंचालक असलेले आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह हे मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रधान सचिव म्हणून आले आहेत. दबंग अधिकारी अशी त्यांची ओळख आहे; पण त्यांच्या येण्याने आयएएस लॉबीमध्ये अस्वस्थता दिसते. परदेशींच्या येण्यानेही काही बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. ब्रिजेश सिंह यांना आणून फडणवीस यांनी शिंदेंकडे आपला माणूस पेरला, असे अनेकांना वाटते; पण ते अजिबात खरे नाही. ब्रिजेश सिंह वेगळ्या चॅनेलमधून आले आहेत.