भारतीय वैज्ञानिकांनी बुधवारी आपली पहिलीच मंगळ मोहीम पहिल्याच फटक्यात यशस्वी करून दाखवून भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे सिद्ध केले आहे. मंगळयान मंगळावर जाऊ न काही विशिष्ट कामगिरी पार पाडणार असले तरी मूलत: बाह्य अंतराळात जाण्याची व तेथे दीर्घकाळ कामगिरी करण्याची तंत्रज्ञान आणि विज्ञानविषयक क्षमता भारताजवळ आहे हे जगाला दाखवून देणे, हा त्यामागचा उद्देश होता. अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची निकट स्पर्धा आहे ती चीनशी. चीनने या क्षेत्रात जे काही यश मिळवले आहे, ते भारतानेही मिळवले आहे; पण या मंगळ मोहिमेतील यशामुळे भारताचे यश चीनपेक्षा काकणभर सरस ठरले आहे. कारण चीनने जी मंगळ मोहीम हाती घेतली होती, ती अयशस्वी ठरली होती. मंगळ मोहिमेतील सर्वांत अवघड गोष्ट होती ती या यानाचा मंगळाच्या कक्षेतील प्रवेश. हा प्रवेश दोन गोष्टींमुळे अवघड व आव्हानात्मक होता. एक तर या प्रवेशासाठी जी द्रव इंधनयुक्त अपोगी मोटार वापरायची होती, ती यानाच्या उड्डाणापासून कार्यरत करण्यात आलेली नव्हती. तिचा वापर मंगळाच्या कक्षाप्रवेशावेळीच करायचा होता. त्यामुळे जवळपास ३00 दिवस ही मोटार कामकाजाविना थंड पडून होती. ती बुधवारी सकाळी सुरू होईल का, ही चिंता वैज्ञानिकांना सतावत होती. ही मोटार सुरू झाली नाही तर अन्य पर्यायी व्यवस्था वैज्ञानिकांनी केली होती; पण ते दुधाची तहान ताकावर भागवल्यासारखे ठरले असते. पण ही मोटार सुरू होणार असा आत्मविश्वास वैज्ञानिकांकडे होता. कारण तो असल्याशिवाय त्यांनी पंतप्रधानांना ही मोहीम प्रत्यक्ष पाहण्यासाठी बुधवारी आमंत्रित केले नसते. त्यांचा हा आत्मविश्वास सार्थ ठरला. दुसरी अवघड गोष्ट होती, ती यानाचा मंगळाकडे धावण्याचा अफाट वेग कमी करण्याची. हा वेग कमी केला नाही तर यान मंगळावर आदळून नष्ट होण्याची शक्यता होती. ही आपोगी मोटार सुरू झाली नसती तर यानाचा वेग कमी करणे शक्य झाले नसते. मंगळाच्या कक्षेत यान प्रतिसेकंद २२.५७ किमी या वेगाने प्रवेश करणार होते. त्याचा हा वेग सेकंदाला ४.६ किमी इतका खाली आणणे आवश्यक होते. या आपोगी मोटारने हा वेग कमी करण्यास मदत केली. ही मदत मिळाली नसती तर वैज्ञानिकांनी यानाला एक कोलांटउडी देऊ न त्याला उलट्या दिशेने पळविले असते. त्यामुळे उलट्या दिशेच्या वेगावर मंगळाच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पडून यानाचा वेग कमी झाला असता. एकंदर मंगळाच्या कक्षेत सुस्थिर प्रवेश हाच सर्व मंगळयानांसाठी कळीचा मुद्दा होता. हीच गोष्ट चिनी, रशियन आणि एवढेच नाही तर जपानी मंगळयानांनाही साधली नव्हती. अमेरिकेलाही त्यासाठी झगडावे लागले होते. भारतीय वैज्ञानिकांनी पहिल्याच प्रयत्नात ही अवघड गोष्ट साधली आणि म्हणूनच ते जगातले श्रेष्ठ अंतराळ वैज्ञानिक आहेत. भारताला आपले तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रातले श्रेष्ठत्व याच कामगिरीतून जगाला दाखवायचे होते, ते त्यांनी दाखविले आहे. मंगळावर मिथेन वायू आहे का, याचा शोध घेणारी यंत्रणा या यानावर वैज्ञानिकांनी बसवली आहे. हाही एक अभिनव प्रयोग आहे. मंगळावर जीवसृष्टी कधीकाळी किंवा आता असली तर मिथेन वायूचा अंश तेथे असणारच, यात काही शंका नाही. पण हा अंश शोधण्याचे काम आजवर कोणत्याच यानाने केले नाही. ते हे भारतीय मंगळयान करणार आहे. यापूर्वी चंद्रावर अमेरिका, रशियाच्या अनेक मोहिमा गेल्या होत्या, चीनचेही एक यान गेले होते, पण त्या कुणालाच चंद्रावरील पाण्याचा शोध लागला नव्हता. हा शोध सर्वप्रथम भारतीय चांद्रयानाने लावला. त्यामुळे भारतीय वैज्ञानिकांचे मनोबल वाढलेले आहे. त्यामुळेच ज्या गोष्टींचा शोध लावण्यात इतरांना अपयश आले आहे, त्याचा शोध घेण्याची जिज्ञासा भारतीय वैज्ञानिकांत आहे. कदाचित या शोधातही ते यशस्वी होतील. भारताच्या सर्वच अंतराळ मोहिमा अत्यंत कमी खर्चाच्या आहेत. या मंगळयान मोहिमेने तर कमी खर्चाची परिसीमाच गाठली आहे, असे म्हणावे लागेल. या मोहिमेसाठी किलोमीटरला ११ रुपयांपेक्षाही कमी खर्च आल्याचा हिशेब काही आकडेमोड तज्ज्ञांनी मांडला आहे. हा खर्च मुंबईच्या टॅक्सीच्या दरापेक्षाही कमी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. याचा अर्थ जागतिक अंतराळ मोहिमेत भारताने सर्वच देशांपुढे जबरदस्त स्पर्धा उभी केली आहे असा होतो. शिवाय गरीब देशांना त्यांचे अवकाश कार्यक्रम राबविण्याची संधी भारतामुळे मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. थोडक्यात, मंगळयानाने भारताला वैज्ञानिक व तंत्रज्ञान सत्ता बनविण्याच्या दिशेने दमदार पाऊ ल टाकले आहे.
अपूर्व यश...
By admin | Published: September 25, 2014 6:02 AM