- हरीष गुप्ता(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)
उत्तर प्रदेशातील निवडणूक निकालांचा राष्ट्रीय पातळीवर परिणाम दिसेल असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले तेव्हा कोणाच्याही भुवया उंचावल्या नाहीत. निवडणुकीत असे बोलायचे असते म्हणून या विधानाकडे दुर्लक्ष केले गेले; पण त्यांना जवळून ओळखणाऱ्यांचे म्हणणे अमित शहा वायफळ बडबड करीत नाहीत. सरळ बॅटने खेळतात. स्तुतिपाठक भले त्यांना ‘चाणक्य’ म्हणोत.मोदी सांगतील तेच हे ऐकतात. दोन दशकांपासून ते मोदी यांचे सच्चे सहकारी आहेत. याचा अर्थ असा की शहा जेव्हा जाहीरपणे काही बोलतात तेव्हा त्याचा अर्थ राजकीय घ्यायचा असतो. दीर्घकाळ स्वस्थतेत गेल्यावर मोदी यांनी अमित शहा यांना उत्तर प्रदेश निवडणुकीची जबाबदारी दिली आणि एनडीए ला ३०० ते ४०० जागांचे लक्ष्यही दिले. याच वर्षी जुलैत होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीत या जागा महत्त्वाच्या ठरतील.
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालावर देशातील राजकीय शक्तीची जुळवाजुळव अवलंबून आहे. निकाल भाजपच्या विरोधात गेला तर सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील. मतभेद विसरून शरद पवार किंवा दक्षिणेतील अथवा पूर्व भारतातील कोणाला तरी उमेदवार करतील. ११ लाख मतांच्या इलेक्टोरल कॉलेजमध्ये एनडीएकडे सध्या काठावरचे बहुमत आहे. भाजपला बीजेडी, वायएसआर काँग्रेस, टीआरएस किंवा अगदी द्रमुकचीही गरज पडू शकते. केंद्रात भाजप स्थिर राहायला उत्तर प्रदेशात चांगल्या जागा मिळणे अत्यावश्यक आहे. काही प्रतिकूल घडले तर भाजपतही बिनसेल. बरेच अडगळीत पडलेले नेते डोके वर काढतील. याच कारणांनी मोदी, भाजप आणि संघाने उत्तर प्रदेशात सगळी ताकद लावली आहे.अमित शहा पुन्हा सक्रिय पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये अमित शहा हा भाजपचा सर्वांत सक्रिय चेहरा आहे. पंतप्रधानांनी शहा यांना उत्तर प्रदेश निवडणुकीची सूत्रे दिली. याचे कारण तेथे दगाफटका होऊ शकतो अशी शंका त्यांना आली. गेल्या वर्षी काही काळ शहा स्वस्थ होते. फार कोठे दिसत नव्हते. अमित शहा असे अचानक गप्पगप्प झाले म्हणजे काहीतरी गडबड आहे असे अंतस्थ गोटातल्या लोकांना वाटू लागले होते; पण जे काही होते ते मोदी आणि शहा यांच्यात होते. तिसऱ्या कोणाला त्याचा पत्ता नव्हता.त्या काळात पक्षाचे नवनियुक्त अध्यक्ष जे. पी. नड्डा जोरात होते. सगळा प्रकाशझोत त्यांच्यावर होता; पण बघताबघता स्थिती बदलली. अमित शहा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर पक्ष मुख्यालयात रात्री उशिरापर्यंत बैठका घेऊ लागले. खुद्द पक्षाध्यक्ष मात्र या बैठकांना प्रत्यक्षात जाऊ शकत नव्हते, ते ऑनलाइन सहभागी होत. सगळी सूत्रे शहा हलवीत होते. सगळे निर्णय ते घेणार, कृतिकार्यक्रम तेच ठरविणार; बाकीच्यांनी फक्त हो म्हणायचे.२०१४-२०१९ या काळात अमित शहा पक्षाचे अध्यक्ष होते, तो काळ अनेकांना यानिमित्ताने आठवला. तेच ते जुने अमित शहा पाच राज्यांतल्या या निवडणुकांमुळे पुन्हा पाहायला मिळत असून, ते स्वत:ही छान एन्जॉय करीत आहेत, असे दिसते.काँग्रेसची दोन्हीकडे गोची गतसप्ताहात राहुल गांधी सुवर्ण मंदिरात दर्शनाला गेले असता पक्षाने विधानसभेचे तिकीट दिलेले सर्वच्या सर्व ११७ उमेदवार तेथे हजर पाहून अत्यंत सुखावले. विद्यमान मुख्यमंत्री चरणजित चन्नी आणि दुसरे दावेदार नवज्योतसिंग सिद्धू दोघांनीही राहुल यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला, याचाही त्यांना खूप आनंद झाला. भावी मुख्यमंत्री राहुल यांनी जाहीर करावा असे दोघांनाही वाटत होते. दोघेही त्यांचा कौल मानायला राजी होते. बिच्चारे राहुल! त्यांनी पत्रकारांना सांगितले पक्ष कार्यकर्त्यांशी बोलून आपण मुख्यमंत्री म्हणून कोणाचा चेहरा समोर आणायचा, याचा निर्णय घेऊ. हे बोलत असताना राज्यातल्या किमान ३० टक्के दलित मतांचा पाठिंबा असलेले विद्यमान मुख्यमंत्री बाजूला आहेत हे राहुल विसरले. चंचल वृत्तीच्या सिद्धू यांचे नाव घेतले तर दलित मते जातील आणि चन्नी यांना पुढे केले, तर जाटांची नाराजी ओढवेल, अशी एकूण पेचाची परिस्थिती तयार झाली आहे. ... काय हा दैवदुर्विलास! पण खरे सांगायचे तर राहुल यांनी स्वत:च पक्षाला या स्थितीत ढकलले आहे. अंतस्थ वर्तुळातून असे सांगण्यात येते की, मोठी गर्दी पाहून राहुल हुरळले आणि त्या मोहाला बळी पडले. आता हा घोळ निस्तरण्यासाठी सोनिया गांधींच्या दरबारी गेलाय म्हणतात. ‘माझ्याशिवाय तुम्हाला दुसरा कुठला चेहरा दिसतो तरी आहे का’ असे विचारून प्रियांका यांनीही अशीच गोची करून ठेवली आहे. उत्तर प्रदेशात तुम्ही मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचे नाव मतदारांसमोर ठेवणार, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला होता. पत्रकार परिषद आधी ठरली होती आणि प्रियांका यांना आगाऊ कल्पना देण्यात आली होती, तरी त्या बोलून गेल्या आणि नंतर ते बोलणे सहेतुक नव्हते, अशी सारवासारव करू लागल्या; पण व्हायचे ते नुकसान झालेच. उत्तर प्रदेशातली प्रचार मोहीम पंक्चर झालीच!