संजीव साबडे
वर्षभरापूर्वी काँग्रेसतर्फे लोकसभेची निवडणूक लढविलेली प्रख्यात व लोकप्रिय अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर हिने अखेर अपेक्षेप्रमाणे शिवसेनेत प्रवेश केला. ती शिवसेनेत जाणार, याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होतीच. विधान परिषदेवर राज्यपालांनी नियुक्त करावयाच्या सदस्यांसाठी उद्धव ठाकरे सरकारने ज्या बारा जणांची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे, त्यात ऊर्मिलाचे नाव आहे. सरकारमधील तिन्ही पक्षांनी मिळून ही यादी तयार केली आणि शिवसेनेने ऊर्मिला मातोंडकरच्या नावाची शिफारस केली. त्यामुळे ऊर्मिलाने हातावर शिवबंधन बांधून घेतल्याने आश्चर्य वाटण्याचे कारणच नव्हते.
पण ऊर्मिला मातोंडकरने लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्ष का सोडला, तिच्यावर ती वेळ का आली, याचा आजतागायत काँग्रेस नेत्यांनी विचारच केला नाही. लोकसभा निवडणुकीतील आपल्या पराभवाला काँग्रेसचे मुंबईतील काही नेतेच कारणीभूत असल्याची तक्रार तिने केली होती. ते नेते म्हणजे संजय निरूपम हे माहीत असूनही काँग्रेसचे केंद्रातील आणि राज्यातील नेते गप्प बसून राहिले. त्यांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला नाही. ती पराभूत झाली असल्याने आता तिचा काय उपयोग, असा विचार त्यांनी केला असावा. जो पराभूत झाला, त्याचे महत्त्व संपले, असेच काँग्रेसजनांना कायमच वाटत आले आहे.
गेले वर्षभर मुंबई काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. एकनाथ गायकवाड हंगामी अध्यक्ष आहेत आणि मुंबईकरांना ते नावाव्यतिरिक्त फारसे परिचितही नाहीत. मिलिंद देवरा काही काळ अध्यक्ष होते. पण दक्षिण मुंबईवगळता शहराशी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांशी त्यांचा संबंध नव्हता. निरूपम केवळ पश्चिम उपनगरापुरते आणि त्यातही उत्तर भारतीय मंडळींत त्यांना स्थान. अशा वेळी भाजपविरुद्ध ठामपणे लढू इच्छिणाऱ्या आणि त्यासाठी काँग्रेसमध्ये स्वतःहून आलेल्या मराठमोळ्या ऊर्मिला मातोंडकरला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष केले असते, तिच्यामागे राज्य व केंद्रीय नेते उभे राहिले असते, तर तिने नक्कीच संधीचे सोने करून दाखविले असते. या नव्या नेतृत्वामुळे किमान काँग्रेस कार्यकर्ते तरी निश्चितच सक्रिय झाले असते. तिने शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी खेद वा खंत व्यक्त करण्याऐवजी ‘ऊर्मिला मातोंडकर आत्ताही सत्ताधारी महाविकास आघाडीचाच भाग आहे’, असे अजब वक्तव्य केले. त्यामुळे तिच्या शिवसेनेत जाण्यास काँग्रेस नेतृत्वही जबाबदार आहे की काय अशीच शंका येते. ऊर्मिलाचे वक्तृत्व उत्तम आहे, राजकीय, सामाजिक प्रश्नांची तिला चांगली जाण आहे. ती सुसंस्कृत आहे, कार्यकर्त्यांमध्ये सहजपणे मिसळते, हे गेल्या निवडणुकीत लोकांनी पाहिले आहे. अनेकांना माहीत नसेल कदाचित, तिच्यावर घरातच समाजवादी चळवळीचे संस्कार झाले आहेत. तिच्या हिंदुत्वामध्येही सर्वधर्मसमभाव आहे, हे तिच्या शिवसेनेतील प्रवेशानंतरच्या वक्तव्यांतून दिसून आले आहे.
तिने भाजपशी लढण्यासाठी काँग्रेसची निवड केली होती. पण तो पक्ष भाजपशी लढू शकेल का, अशी शंका तिला येऊ लागली. लोकसभा व विधानसभेतील पराभवानंतर काँग्रेसने केंद्र वा राज्य पातळीवर आत्मचिंतन केले नाही. जे चर्चा करू इच्छितात, त्यांच्यावर पक्षविरोधी असा शिक्का मारला जातो. मध्यंतरी मध्य प्रदेशातील तरुण नेते ज्योतिरादित्य सिंदिया पक्ष सोडून गेले, राजस्थानातील सचिन पायलटही निघालेच होते, त्यांना कसेबसे थांबविले गेले. हे तरुण नेते का नाराज आहेत, त्यांना पक्षात पुढे आणण्यात आपण कमी पडत आहोत का, याचा विचार काँग्रेसने करायला हवा, आत्मचिंतन सतत व्हायला हवे. ते होत नसल्याने पक्ष अधिकाधिक दुबळा होताना दिसत आहे. अशा वेळी ऊर्मिला मातोंडकर शिवसेनेत गेली, हे काँग्रेसचे नक्कीच नुकसान आहे. अर्थात तसा विचार तरी काँग्रेस नेते करतील का हा प्रश्नच आहे. शिवसेनेचा मात्र फायदा झाला, हे नक्की ! भाजपशी लढण्यासाठी सेनेला चांगली महिला नेता मिळाली आहे. त्यामुळे शिवसेनेत निश्चितच आनंद असेल. पण काँग्रेसला तिच्या जाण्याचे काहीच वाटत नसेल तर परिस्थिती गंभीरच म्हणायला हवी.
(लेखक लोकमतचे समूह वृत्त समन्वयक आहेत)