जागतिक महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन विजयाच्या समीप असले तरी अंतिमत: जगाचे बिग बाॅस म्हणून कोण बाजी मारणार, हे स्पष्ट व्हायला आणखी काही दिवस लागतील. शेवटच्या पाच-सहा राज्यांमधील मतमोजणी पूर्ण झाली तरी विद्यमान अध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा एकूण पवित्रा पाहता कोर्टकज्जेही होतील. त्या त्यांच्या भूमिकेमुळे आताच काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत, तर मतदानात घोटाळा झाल्याचा आरोप करीत ट्रम्पसमर्थकही आक्रमक झाले आहेत. हे गुऱ्हाळ आणखी काही दिवस सुरूच राहील.
आधीच्या कलचाचण्यांमध्ये ही निवडणूक जितकी बायडेन यांच्या बाजूने झुकलेली दिसत होती तशी प्रत्यक्षात एकतर्फी झाली नाही. अनेक राज्यांमधील मताधिक्य खूपच कमी आहे. सन १९०० नंतरचे, १२० वर्षांमधील सर्वाधिक ७० टक्के मतदान झाले आणि इतिहासातील सर्वाधिक सात कोटींहून अधिक मते बायडेन यांना मिळाली. पण, अमेरिकेत केवळ एकूण मतांवर अध्यक्ष निवडला जात नाही. गेल्यावेळी हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा ट्रम्प यांना तीस लाख मते कमी मिळाली होती. वरवर थेट निवडणूक भासत असली तरी इलेक्ट्रोरल काॅलेजेसची पद्धत असून, राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात इलेक्ट्रोरल मते निश्चित आहेत. तरीही, हा काैल डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का देणारा आहे. अमेरिकेत एका व्यक्तीला दोन वेळाच अध्यक्ष बनता येते आणि १९९२ पासूनचे दुसरी टर्म न मिळालेले ट्रम्प हे पहिले नेते बनतील, अशी शक्यता आहे. असे का घडले हा जगाच्या कुतूहलाचा, चिंतेचा व चिंतनाचाही विषय आहे.
अधिकृतपणे विजयी होण्यापूर्वीच ज्यो बायडेन यांनी व्हाइट हाउसमधील पहिल्या दिवशी तापमान वाढीविषयक पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा ट्रम्प यांचा निर्णय बदलला जाईल, असे सांगितले. हा करार किंवा विदेशी नागरिकांना प्रवेशाविषयीचे व्हिसा धोरण, अमेरिकेच्या सीमा अन्य देशांसाठी बंद करण्याचा व सीमेवर भिंत बांधण्याचा निर्णय, कोविड-१९ विषाणू संसर्गावेळीच जागतिक आरोग्य संघटनेच्या अडवणुकीचे पाऊल, अशा ट्रम्प यांच्या अनेक निर्णयांचा फेरविचार होऊ शकतो. त्याचे कारण, ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे अमेरिकेची मुक्त समाजाची, उदारमतवादी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची प्रतिमा काळवंडली. ट्रम्प यांचे एकूण वागणे लिंगभेदी मानसिकतेचे होते. त्यामुळे रिपब्लिकनांना मिळणारे महिलांचे मतदान आणखी कमी झाले. अमेरिकेचा अध्यक्ष हा जगाचा अनभिषिक्त नेता असतो. बाजूने असो की विरोधात, अन्य सगळ्या आर्थिक, सामरिक महासत्तांचा कारभार अमेरिकेच्या धोरणांवर ठरतो.
शीतयुद्धाचा शेवट व रशियाच्या विघटनांनतर तर ही बाब अधिक ठळक बनली. या पृष्ठभूमीवर, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकूणच कारभारात गांभीर्याचा अभाव राहिला. त्यांच्या निर्णयांवर लहरीपणा, एककल्लीपणा, किंबहुना विक्षिप्तपणाची टीका झाली. कोरोना संसर्गाचा सामना करताना त्यांनी दाखविलेल्या बेफिकिरीमुळे अमेरिका इतकी प्रगत असूनही जगात सर्वाधिक रुग्ण तिथे आढळले. विषाणू टोचून घेण्याच्या त्यांच्या वक्तव्याचे तर जगभर हसे झाले. मुळात अमेरिका ही नुसती अमेरिका नाहीच मुळी. अगदीच अपवाद वगळता जगातल्या बहुतेक सगळ्या देशांमधील मुले अमेरिकेत जाण्याची स्वप्ने मुठीत घेऊनच जन्माला येतात, आयुष्यभर त्या स्वप्नांचा पाठलाग करीत राहतात. अमेरिकेची बलाढ्य अर्थव्यवस्था अशा स्वप्नाळू लोकांच्या परिश्रमांवरच उभी आहे.
अशावेळी अमेरिका फर्स्टसारख्या संकुचित घोषणा ट्रम्प यांच्या अंगलट आल्या नसत्या तरच नवल. ते केवळ बाहेरच्या माणसांबद्दलच आकसाने वागले असे नाही. वर्णद्वेषाचा दीर्घकालीन व रक्तरंजित इतिहास असलेल्या कृष्णवर्णीयांबद्दलही ते असेच वागल्याचा, त्यांच्या कार्यकाळात वर्णवादी मानसिकतेला खतपाणी मिळाल्याचा आरोप झाला. एक्झिट पोलचे विश्लेषण सांगते, की सर्वाधिक ३५ टक्के मतदारांनी अर्थव्यवस्थेच्या, त्या खालोखाल २० टक्क्यांनी वंशभेदाच्या, १७ टक्क्यांनी कोरोना विषाणू महामारीचा सामना करताना ट्रम्प यांनी दाखविलेल्या बेफिकिरीच्या मुद्द्यावर मतदान केले. थोडक्यात ट्रम्प यांच्या चार वर्षांतल्या चुका सुजाण अमेरिकन मतदारांनी सुधारल्या आहेत. बायडेन असो की ट्रम्प, सद्भाव, साैहार्द्र व धार्मिक सहजीवनाला काैल देणाऱ्या या जनभावनेची व्हाइट हाउसला नक्कीच दखल घ्यावी लागणार आहे.