सोमवारच्या सकाळी तुम्ही हे वाचत असाल, तेव्हा अमेरिकेत त्यांच्या स्वातंत्र्य दिनाचा दिवस नुकताच मावळत असेल. सध्या सर्वशक्तिमान, सर्वांत बलाढ्य आणि सर्वांत विकसित समजल्या जाणाऱ्या अमेरिकेने इंग्रजांच्या जोखडातून मुक्ती मिळवली, त्यावेळी अमेरिकेतील तेरा वसाहतींनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारलं. पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. वसाहतींच्या या प्रतिनिधी सभेने ४ जुलै १७७६ रोजी स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. तेव्हापासून ४ जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस मानला जातो. अर्थात हा दिवस म्हणजे अमेरिकेसाठी दिवाळीच. या दिवशी सार्वजनिक सुटी तर असतेच, पण अमेरिकन नागरिक मोठ्या धूमधडाक्यात हा दिवस साजरा करतात. फटाके, रोषणाई, आतषबाजी, नाच, गाणी, संगीत, सार्वजनिक परेड, पिकनिक, बार्बेक्यू, बेसबॉल, विविध खेळ, राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांची भाषणं... या सगळ्या गोष्टींना उधाण येतं. फटाक्यांची आतषबाजी तर खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. आपल्याकडे दिवाळीत होते तशी. जवळपास प्रत्येक सर्वसामान्य माणूस स्वातंत्र्य दिनाच्या या जल्लोषात मोठ्या उत्साहानं सहभागी होतो. पण या जल्लोषाला एक काळोखी किनारही आहे. ही दिवाळीच अमेरिकेसाठी दरवर्षी आपत्ती ठरते. कारण अमेरिकेत वर्षभरात जितक्या म्हणून आगी लागतात, त्यातील सर्वाधिक आगी ४ जुलै या त्यांच्या स्वातंत्र्य दिनीच लागलेल्या असतात. दरवर्षी त्याचं प्रमाण वाढतंच आहे. पण यावर्षी मात्र नेहमीच्या जल्लोषावर थोडं नियंत्रण ठेवण्याचं कळकळीचं आवाहन जवळपास शंभर नामवंत शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन केलं होतं, स्वातंत्र्यदिन साजरा करा; पण फटाके फोडू नका, अशी त्यांची विनंती. कारण याच फटाक्यांमुळे लागलेल्या आगीमुळे अमेरिकेचं प्रचंड नुकसान होतं आहे. नैसर्गिक, वित्त आणि मानव हानी होत आहे. पर्यावरणाला मोठा हादरा बसतो आहे... प्रशासन तर यासाठी प्रयत्न करत असतंच सतत. तसं पाहिलं तर ४ जुलैनंतर अमेरिकेत लागणाऱ्या आगींचा हा प्रश्न काही नवा नव्हे, पण यंदा त्याचं गांभीर्य मात्र कितीतरी अधिक आहे. याला कारण उत्तर अमेरिकेतलं वाढतं तापमान.अमेरिका; त्यातही पश्चिम अमेरिका आणि कॅनडा या भागात यंदा लोकांना मोठ्या प्रमाणात दुष्काळ आणि वाढत्या तापमानाला सामोरं जावं लागतं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचा हिरवा, गवताळ भाग शुष्क झाला आहे. सर्वसामान्य तापमानापेक्षा अनेक ठिकाणचं तापमान वाढलं आहे. या वाढत्या तापमानाचाही दरवर्षी विक्रम होतो आहे. अर्थातच या शुष्क, कोरड्या वातावरणामुळे त्या भागातील जंगलांमध्ये कोट्यवधी एकर क्षेत्रात आगीचा धोका खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. नैसर्गिकरित्या आगी लागण्याच्या घटनांतही वाढ झाली आहे. तशात फटाके फोडल्यामुळे आगींचा हा धोका दसपटीनं वाढतो.नैसर्गिक आगींपेक्षा मानवी कृत्यांमुळेच मोठ्या प्रमाणात आगी, वणवे पेटत असल्याचा दशकांचा इतिहास आहे. कधी फटाक्यांमुळे, कधी सिगारेट्समुळे, कधी कॅम्पफायरमुळे, कधी विजेच्या तारांमुळे, तर कधी गवत कापणी यंत्रांच्या पात्यांना धार लावतानाही मोठ्या आगी लागल्या आहेत आणि त्यामुळे मोठा संहार घडला आहे. यासंदर्भातला एक पाहणी अभ्यास सांगतो, १९९२ ते २०१५ या काळात ४ जुलै या अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनीच विविध ठिकाणच्या जंगलांमध्ये तब्बल सात हजार ठिकाणी वणवे पेटले होते, आगी लागल्या होत्या. यातल्या बऱ्याचशा आगी रहिवासी भागात लागल्या आणि त्यानंतर त्या पसरत मोठ्या झाल्या, जंगलांपर्यंत पोहोचल्या. त्यामुळे जैवविविधतेचीही मोठी हानी झाली. स्वातंत्र्य दिनाच्या जल्लोषात लोकांनी ही गोष्टही लक्षात ठेवावी आणि अजाणतेपणी आगींना आमंत्रण देऊ नये, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं होतं. अमेरिकेच्या पश्चिम भागात आजही विजा पडून लागलेल्या आगींचं प्रमाण मोठं असलं तरी ज्या भागात विजा पडत नाहीत, त्याठिकाणी मानवी चुकांमुळे आगी लागल्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. अलीकडच्या काही दशकांत जंगलांत पेटलेल्या वणव्यांपैकी तब्बल ९५ टक्के वणवे मानवाच्या चुकींमुळे लागले आहेत आणि मानवी वस्त्यांनाही त्यामुळे मोठा धोका पोहोचला आहे. गेल्या वर्षी आतापर्यंतच्या सर्वात जास्त आणि मोठ्या आगी फटाक्यांमुळे लागल्या होत्या. २०२० हे वर्ष तर ‘फायर सिझन’ म्हणून ओळखलं गेलं. त्यात यंदाचं वातावरण अधिकच शुष्क आणि कोरडं असल्यामुळे छोटीशी चूकही आगीला आमंत्रण ठरू शकते. यंदा पुन्हा तसं होऊ नये म्हणून संशोधक मोठ्या प्रमाणात पुढे आले
फटाक्यांऐवजी लेझर लाइटचा वापरसंशोधकांनी लोकांना अगदी बारीक सूचना केल्या आहेत : आपला परिसर स्वच्छ ठेवा, तिथे काडीकचरा साचू देऊ नका, गटारी स्वच्छ करा, ज्वलनशील पदार्थ घरात- घराजवळ ठेऊ नका, ट्रेलर असेल, तर त्याच्या साखळ्या जमिनीला घासून आग लागेल इतक्या खाली ठेऊ नका, आपल्या लॉनमधील गवत कापायचं असेल तर भल्या सकाळी, जेव्हा वातावरणात दव असतं, त्यावेळी कापा, सिगारेटची थोटकं इतस्तत: फेकू नका.. अनेक सामाजिक संस्थांनी यंदा फटाके फोडण्याचं टाळलं आणि लेझर लाइट शोचा वापर केल्याच्याही बातम्या आहेत!