इमारती, पूल, रस्ते इत्यादी बांधकामांसाठी वाळूचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत असतो. काँक्रिटमध्ये तर वाळू हा मुख्य घटक असतो. सध्या विकासाच्या कामांतर्गत काँक्रिटचे रस्ते बांधण्याचे मोठे प्रकल्प शासनाने हाती घेतले आहेत. याचे उदाहरण म्हणजे नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुुतगती मार्ग किंवा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आहे. हा महामार्ग ७०१ किमी लांबीचा असून ८ पदरी काँक्रिटचा नियोजित महामार्ग आहे. काँक्रिटच्या रस्त्यांचे आयुष्य डांबरी रस्त्यांपेक्षा जास्त असते व त्याला लागणारा देखभालीचा खर्च कमी असतो.
दिवसेंदिवस काँक्रिटच्या व इतर बांधकामात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने नैसर्गिक (नदीनाल्यातील) वाळूचा तुडवडा पडतो, ती महागडी होते किंवा कधी कधी तर नैसर्गिक वाळूअभावी बांधकामे बंद पडतात. त्यामुळे नैसर्गिक वाळूची मागणी प्रचंड वाढते. परिणामी वाळूचे बेकायदा व प्रचंड उत्खनन वाढते. त्याचा अनिष्ट परिणाम नदीनाल्याच्या नैसर्गिक प्रवाहावर पडतो. यामुळे नदीचा तळ सुरक्षित राहत नाही, आजूबाजूच्या परिसरात पाणी झिरपत ठेवणे आणि जलस्तर उंचावणे मंदाविते. जलचरांच्या जीवनचक्रावर परिणाम होतो व पर्यावरणाचा ºहास होतो. म्हणूनच केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सन २०१६ मध्ये केलेल्या कायद्यातील तरतुदींनुसार वाळूच्या उत्खननावरही बंधने आणली. बरेचदा वाळूघाट बंद असताना अवैधरीत्या वाळूउपसा सुरू असतो, परिणामी शासनाचा महसूल बुडतो. वाळूची मागणी जास्त आणि उपलब्धता कमी यामुळे वाळूचा दर आवाक्याबाहेर पोहोचतो. त्यामुळे बांधकामाचे अंदाजपत्रकही कोलमडते.
कृत्रिम वाळूपासून तयार होणारे काँक्रिट आणि मॉर्टर नैसर्गिक वाळूपासून तयार झालेल्या किंबहुना काही परिस्थितीत त्याहीपेक्षा जास्त मजबुती देणारे असते. नैसर्गिक वाळू गोलाकार तर कृत्रिम वाळूचे कण साधारण त्रिकोणाकृती असतात. यामुळे बांधकामात घट्टपणा येतो. ती अधिक मजबुतीने चिकटली जाते. त्यामुळे नैसर्गिक वाळूचा बांधकामातील उपयोग कमी करून त्याऐवजी कृत्रिम वाळूचा वापर वाढवणे आवश्यक ठरते. कृत्रिम वाळूचा उपयोग काँक्रिटिंग, प्लास्टरिंग, विटाची जुडाई, फ्लोरिंग इत्यादी सर्व प्रकारच्या बांधकामांसाठी केला जाऊ शकतो. कृत्रिम वाळू सहजतेने आणि मुबलक प्रमाणात बाजारपेठेत उपलब्ध आहे. बरेचदा ती नैसर्गिक वाळूपेक्षा स्वस्त असते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासन निर्णयाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हाती घेण्यात येणारे रस्ते, पूल, इमारती यांच्या बांधकामासाठी लागणाºया एकूण परिमाणाऐवजी २० टक्के कृत्रिम वाळूचा उपयोग करणे अनिवार्य केले आहे. कृत्रिम वाळू चांगल्या गुणवत्तेची असण्यासाठी आवश्यक त्या चाचण्या करून घेणे आवश्यक ठरते.
- प्रा.डॉ. संदीप ताटेवार, अभियांत्रिकी प्राध्यापक