- डॉ. दीपक शिकारपूर(संगणक साक्षरता प्रसारक)येत्या काळामध्ये एक वेगळ्या प्रकारची, नवनिर्मितीशी संलग्न असलेली, अर्थक्रांती (इनोव्हेटिव्ह इकॉनॉमी) होणार आहे. म्हणजेच शेती, पर्यावरण व व्यावसायिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांवर मात करण्याचे अभिनव मार्ग आपल्याला शोधावे लागणार आहेत. तंत्रज्ञान आणि पर्यावरणाची सांगड घालून पारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर कमीतकमी कसा करता येईल याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कारण या ऊर्जास्रोतांचे साठे कमी होत आहेत. सर्वच देशांमध्ये पर्यावरणपूरक चळवळी जोर धरू लागल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये या नवविचाराला ‘ग्रीन आयटी’ ऊर्फ हरित-माहिती तंत्रज्ञान असे नाव पडले आहे. यामध्ये ऊर्जास्रोतांचा कार्यक्षमतेने व पुरेपूर वापर करून ते वाया न घालवण्याला सर्वाधिक महत्त्व दिले जाते.पर्यावरणाचा समतोल ढासळण्याचा पहिला परिणाम शेतीवर होतो हे आपणाला माहीतच आहे. बरे शेतीला पाणी तर द्यावेच लागते. परंतु या पाणीवापराचे प्रमाण आवश्यक तितकेच ठेवणे, पाणी वाया जाणे टाळणे, विजेचे बिल मर्यादेत ठेवणे आणि तरीही दुष्काळ, पूर आणि एकंदर लहरी हवामानाला तोंड देणे या बाबी शेतकºयाच्या आवाक्यात आल्या आहेत.माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणाºया ‘डेटा गॅदरिंग टेक्नॉलॉजीमुळे’ हे शक्य झाले आहे. अमेरिकेतील जॉर्जिया संस्थानातल्या शेतकºयांना गेली काही वर्षे सतत अवर्षण आणि दुष्काळाचा सामना करावा लागत आहे (होय, अमेरिकेत देखील शेतकºयाचे प्राण कंठाशी येतील असा दुष्काळ पडतो. निसर्गापुढे सगळे सारखेच!). त्यांच्या मदतीसाठी जॉर्जिया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी ही प्रणाली बनवली आहे. यासाठी त्यांनी कमी खर्चाचे, मर्यादित क्षमतेचे सेन्सर आणि जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम)चा वापर केला आहे.पीव्हीसी पाइपमध्ये बसवलेले हे सेन्सर संबंधित शेतजमिनीत विविध ठिकाणी वेगवेगळ््या खोलीवर पुरून ठेवले जातात. ते तिथे बसून मातीचे तापमान आणि तीमधील आर्द्रतेच्या प्रमाणाची माहिती गोळा करतात आणि पाइपमधील एँटेनाच्या साहाय्याने संगणकाकडे प्रक्षेपित करतात. संगणकाच्या पडद्यासमोर बसलेले शेतीतज्ज्ञ या माहितीचे विश्लेषण करून त्या जमिनीला केव्हा व किती पाणी द्यावे हे सांगतात.त्यामुळे तेथील शेतकºयांचे दोन-तीन फायदे होतात. पाणी, तसेच ते पुरवणाºया मोटरला पुरवावी लागणारी वीज वाचते हा फायदा तर उघड आहे. दुसरे असे की त्यांना घरापासून शेताच्या प्रत्येक कोपºयात जाऊन मोटर चालू वा बंद करावी लागत नाही. परिणामी वेळ व इंधनखर्च वाचतो. शिवाय पिकाला जरुरीइतकेच पाणी मिळाल्याने अति-किंवा कमी-पाण्यामुळे त्यावर होणारे दुष्परिणाम टळून धान्य वाया जाण्याचे प्रमाण घटते.जॉर्जिया विद्यापीठाने यापूर्वी अशा इतरही प्रणाली विकसित केल्या आहेत - उदा. कमी दाबावर चालणारी तरीही जास्त अंतरावर पाणी फेकणारी ‘स्प्रिंकलर सिस्टीम’ ऊर्फ तुषार-सिंचन पद्धत (यामुळे वाºयामुळे तसेच बाष्पीभवनाने पाणी वाया जाणे कमी होते), किंवा पाणी नक्की कोठे पडते आहे हे तपासणारे संवेदक (हे प्रत्येक तोटीवर लावता येतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तोटी वळवून हवे तिथेच पाणी फवारले जाते). या नव्या तंत्रज्ञानाचा वापर पूर्वीच्या पद्धतींसोबत केला जात आहे. जॉर्जिया, कान्सास आणि नेब्रास्का या तीन दुष्काळप्रवण संस्थानांमध्ये या प्रणालीचा यशस्वी वापर होतो आहे.
शेती जगविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 5:29 AM