संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत -
‘लोकांचे मन जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो,’ असे लोकप्रिय वचन आहे. त्याचे प्रत्यंतर निवडणुकांमध्ये वरचेवर येते. याची आठवण होण्याचे तात्कालिक निमित्त शिवसेनेच्या गुजराती सेलचे प्रमुख हेमराज शहा यांनी दिलेल्या ‘जिलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ या ताज्या घोषणेत आहे. भाजप-शिवसेना युती असताना मुंबईसह महाराष्ट्रातील गुजराती बांधव हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जर मत द्यायचे असेल व त्यांच्या मतदारसंघात उमेदवार शिवसेनेचा असेल, तरी डोळे झाकून मत देत होते. अर्थात, कुठलेच जात-धर्मीय बांधव एका पक्षाला मत देत नाहीत, परंतु महाविकास आघाडी सरकार स्थापन करून भाजपशी पंगा घेतल्यावर शिवसेनेला गुजराती खाद्यपदार्थांचा आधार घेत, त्या समाजाची सहानुभूती प्राप्त करावीशी वाटली, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. शिवसेना स्थापन झाली, तेव्हा ठिकठिकाणी उडपी हॉटेलांमधून इडली, डोसा वगैरे पदार्थ लोकप्रिय होऊ लागले होते. परप्रांतातून आलेले दाक्षिणात्य येथील नोकऱ्या व व्यवसायावर कब्जा करीत आहेत, हाच शिवसेनेच्या स्थापनेमागील मूळ अंगार असल्याने दाक्षिणात्यांच्या इडलीला ‘ठेचण्या’करिता वडापावचा जन्म झाला. त्यामुळे वडापाव हे सेनेच्या झणझणीत राजकारणाचे हत्यार होते. १९६६ मध्ये दादर स्टेशनबाहेर अशोक वैद्य यांनी वडापावची गाडी लावली. दादरमध्येच सुधाकर म्हात्रे यांचीही वडापावची गाडी सुरू झाली. १९७०-८०च्या सुमारास मुंबईतील कापड गिरण्या बंद पडू लागल्या, त्यावेळी बेरोजगार गिरणी कामगारांनी किंवा त्यांच्या मुलाबाळांनी घरे चालविण्याकरिता वडापावच्या गाड्यांचा आधार घेतला व सेनेने त्यांना राजाश्रय दिला. या परिस्थितीतून जन्माला आलेला व वाढलेला वडापाव व्यवसाय स्थिरस्थावर झाला आणि नावारूपाला आला. आता वेगवेगळ्या शहरांत ब्रँड बनलेल्या वडापावने आपली ओळख निर्माण केली आहे. अर्थात, सेना नेत्यांची मुले कॉन्व्हेंटमध्ये, त्यांच्या मालकीची पंचतारांकित हॉटेल्स, तर गोरगरीब शिवसैनिकांची मुले महापालिका शाळेत व त्यांच्या चरितार्थाकरिता वडापावच्या गाड्या अशी खिल्ली उडविण्याची संधी विरोधकांना नेहमीच मिळत आली. दक्षिणेकडील नेते हे लोकानुनयाकरिता एक रुपयात तांदूळ, दोन रुपयांत गहू देत आले. हेच राजकारण शिवसेनेने एक रुपयात झुणका-भाकर देऊन १९९५च्या निवडणुकीपूर्वी केले. शिवसेनेच्या सत्ता काळातच ही योजना गुंडाळली गेली. अर्थात, सेनेच्या पानात सत्तेची पुरणपोळी पडण्याची जी अनेक कारणे होती, त्यामध्ये ही झुणका-भाकर योजना होती हे नाकारता येत नाही. २००९ मध्ये शिवसेनेला अचानक शिववडा ग्लोबल ब्रँड करण्याची उबळ आली. खा.संजय राऊत यांनी याकरिता मुंबईतील वेगवेगळ्या वडापाव विक्रेत्यांकडून स्पर्धेकरिता एंट्री मागविल्या होत्या. २७ वडापाव विक्रेत्यांमधून बोरीवलीचा मंगेश वडापाव, दादरचा वसईकर वडापाव वगैरे अव्वल ठरले होते. वेगवेगळ्या वडापावची वेगवेगळी चव हेच वैशिष्ट्य असल्याने, स्वच्छता व किंमत यांचा सुयोग्य मिलाफ साधण्यातील मर्यादा यामुळे ग्लोबल शिववडापाव लोकलच राहिला. काँग्रेसने वडापाव नव्हे, तर कांदेपोहे ही मराठी माणसाची ओळख असल्याचे सांगत, कांदेपोहेे संमेलन आयोजित करण्याची घोषणा केली होती. मात्र, ती फलद्रुप झाली नाही. शिववड्याला टक्कर देण्याकरिता नितेश राणे यांनी ‘छत्रपती वडापाव’ तळायला घेतला. यामुळे छत्रपती उदयनराजे भोसले यांचे पित्त खवळले व वडापावला ‘शिव’ म्हणणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान असल्याची आरोळी त्यांनी ठोकली होती.जी गोष्ट मराठी खाद्यपदार्थांची तीच बिर्याणी, कबाब वगैरे पदार्थांची! मुस्लीम मतदारांची मने जिंकण्याकरिता इफ्तार पार्ट्या देण्यात आता कुठलाही पक्ष मागे नाही. आता तर रमजानमध्ये पहाटेच्या वेळी मुस्लीम समाज नाश्ता करतो व मग दिवसभर काही खात नाही, म्हणून ‘सहेरी’ पार्ट्या करण्याकडे कल आहे. परप्रांतीयांना आपलेसे करण्याकरिता शिवसेनेनी ‘लाई चना’चे आयोजन केले होते. मागील निवडणुकीच्या वेळी शिवसेनेने १० रुपयांत शिवथाळी देण्याची घोषणा केली व कोरोनाच्या काळात तिची किंमत पाच रुपये केली.भाषा ही ज्याप्रमाणे कुठल्याही समाजाची ओळख आहे. त्याचप्रमाणे, खाद्यपदार्थ हीही ओळखच! खाद्यसंस्कृतीला गोंजारण्यामुळे तो समाज आपलासा करणे शक्य होते, याच हेतूने हे सुरू आहे. अर्थात, कुणी काय खावे व काय खाऊ नये, या उचापतींपेक्षा हे निश्चित चांगले!