‘जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आणि महन्मधुर ते ते सर्व मला मिळावे’, अशी धारणा तर प्रत्येक मनुष्याची असते. मात्र, हे ‘सर्वांना’ मिळावे अशी धारणा असलेला ‘खरा माणूस’ निर्माण करण्याचे काम वामनराव पै यांनी केले आहे. आज (शुक्रवार) त्यांचा आठवा स्मृतिदिन त्यांचे सर्व साधक ‘पुण्यस्मरण दिवस’ म्हणून साजरा करीत आहेत.
‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य संदेशासाठी सर्व समाज त्यांना ओळखतो. त्यांच्या ह्या एका वाक्यातून अनेकांना जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली; पण हे वाक्य सांगून न राहता त्यामागे वामनराव यांनी ‘जीवनविद्या’ नावाचे समग्र तत्त्वज्ञान उभे केले व संपूर्ण हयात ग्रंथ व प्रवचनातून लोकांपर्यंत पोहोचविले. आज समाजमनाचे चांगले पोषण होण्यासाठी हे तत्त्वज्ञान शाळा, महाविद्यालयांतून तरुणांना दिले पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने आपल्या विकासाला विवेकाची जोड मिळेल अन्यथा हा विकास हा भकास झाल्याशिवाय राहणार नाही.
हा अध्यात्माचा प्रांत, हा विज्ञानाचा प्रांत अशा सीमा न आखता वामनराव पै यांनी अध्यात्मातील विज्ञानच जगासमोर आणले. येथे अखिल मानवजातीचा विचार असल्याने जात, धर्म याच्या पलीकडे जाऊन विश्वमानवाला सुखी करण्याचे सामर्थ्य ह्या ज्ञानात आहे. त्यांनी आपल्या लेखनातून व प्रवचनातून अध्यात्मासारखा अत्यंत बोजड विषय सोपा करून सांगितला. परिणामी त्यांचे विचार तरुणांना विशेष आकर्षित करू लागले. म्हणूनच ‘अध्यात्मविद्या विद्यानाम’ या गीतेतील उक्तीप्रमाणे श्रेष्ठ असणारे अध्यात्म शिकावे ते वामनरावांकडूनच.व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्व या प्रत्येक स्तरावर विचार करून लिहिलेल्या त्यांच्या ग्रंथात मानवजातीच्या प्रत्येक समस्येचे समाधान आहे.
‘विश्वातील प्रत्येक माणूस हा एखाद्या हारात गुंफलेल्या फुलाप्रमाणे एकमेकांशी जोडलेला असून, एका व्यक्तीच्या सुख किंवा दु:खाचा परिणाम सर्व जगावर होतो’ ह्या त्यांच्या सिद्धांताचा अनुभव आज संपूर्ण मानवजातीला येत आहे. ‘कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात भारताने जागतिक पातळीवर बजाविलेली भूमिका आणि त्यानंतर ‘आत्मनिर्भर भारत’ बनविण्याची पंतप्रधानांची घोषणा यातून वामनराव पै यांच्या ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे जावे!’ हा दिव्य संकल्प साकार होतानाचे चित्र उभे करतो आहे.’ म्हणून विश्वकल्याणाचा ध्यास घेऊन ‘विश्वप्रार्थना’ निर्माण करणारे वामनराव पै हे खºया अर्थाने ‘विश्वसंत’ होते. त्यांची संकल्पना मग ती धर्माची असो किंवा परमेश्वराची, त्याला एक व्यापक व वैज्ञानिक अधिष्ठान आहे. ह्याचा अनुभव घेण्यासाठी त्यांच्या तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास व्हायला हवा. समाजातील सर्व विचारवंतांनी हे ‘अमृत’ मंथनासाठी घ्यायला हवे, अन्यथा मराठीतील हा अनमोल ठेवा इतर संतसाहित्याप्रमाणे केवळ कीर्तन, प्रवचनाचा विषय बनून राहील. मात्र, वामनरावांची ह्या विचारांची ताकद केवळ वाचनाने किंवा चिंतनाने कळणार नाही, तर त्यासाठी त्यांचा अनुभवच घ्यायला हवा. त्यांचे संपूर्ण जीवनचरित्र हे त्यांच्या विचारांचाच आरसा आहे.
निरपेक्ष भावना हाही एक वामनराव पै यांचा विशेष पैलू होता. एका व्यक्तीने सद्गुरूंना घरी येण्याची विनंती केली. त्याला सद्गुरू लगेच हो म्हणाले. त्यानंतर त्या माणसाने तेथील सचिवाकडे चौकशी केली की, बोलीचे पैसे किती? पण त्याला ज्यावेळी समजले की, सद्गुरू पैसे घेतच नाहीत आणि जीवनविद्येमध्ये बोली हा प्रकारच नाही, तेव्हा त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
दर्शनासाठी, समुपदेशनासाठी पैसे नाहीत, यावर त्याचा विश्वास बसेना. ते नेहमी म्हणत की, हे पै तुम्हाला जे करायला सांगतात, त्यासाठी ‘पै’चाही खर्च नाही. शिवाय या सर्वांतून काही प्रसिद्धी मिळवायची, संप्रदाय वाढवायचाय, शिष्यगण वाढवायचे आहेत, यातील एकही उद्देश नाही. ‘आम्ही वैकुंठवासी आलो याचि कारणासी’- ते देण्यासाठी आले होते घेण्यासाठी नाही. काही मिळावे म्हणून नाही तर सर्वकाही मिळाले आहे म्हणून. विशेष म्हणजे ते उत्तम क्रिकेट खेळायचे. अर्थात ते अष्टपैलू होते. बुद्धिबळामध्ये तर त्यांचे विशेष प्रावीण्य होते; पण ही सगळी वलयांकित क्षेत्रे सोडून ते समाजसेवेच्या क्षेत्रात आले. केवढा हा त्यांचा त्याग. सेवा जर निरपेक्ष भावनेने केली, तरच ती सेवा असे ते म्हणायचे. त्यांच्या ते आचरणातून दिसून येते.
अशा आदरणीय आणि आचरणीय युगपुरुषाचे आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे स्मरण हेच खºया अर्थाने ‘पुण्यस्मरण’ आहे असे म्हणायला हवे.