- मिलिंद कुलकर्णीभारतीय माणूस उत्सवप्रिय आहे. उत्सव आला की, त्याच्यात उत्साह संचारतो. जल्लोषात उत्सव साजरे केले जातात. तीच स्थिती आता, ‘दिनां’ची झाली आहे. वर्षातून निम्मे दिवस वेगवेगळे दिन साजरे होत असतात. त्यात उत्साहाचा, जनजागृतीचा भाग किती आणि उपचाराचा भाग किती हा संशोधनाचा विषय ठरावा.मुळात उत्सव असो की, दिनविशेष असो, त्याचा उद्देश हा दैनंदिन जीवनातील रहाटगाड्यातून मोकळा होत माणसाला निखळ आनंद मिळावा, असा आहे. कुणाला दहीहंडीत तो आनंद मिळतो, तर कुणाला गरबा-दांडीयामध्ये मिळतो. व्यक्ती तितक्या प्रकृती या नात्याने आनंद शोधण्याचे प्रकार भिन्न असतात. एवढेच काय भारतीय परंपरेतील सण-उत्सवांसोबत मग भागवत सप्ताह, रामायण कथा, कीर्तन, प्रवचन सोहळ्यांचे आयोजन वर्षभर केले जाते. कुणाचाही त्याला आक्षेप नसतो. धर्मनिहाय वेगवेगळे सोहळे आयोजित केले जातात. मग दिवाळी, ख्रिसमस, ईद, बुध्दपौर्णिमा, धर्मसंस्थापकांच्या जयंती-पुण्यतिथी असे सोहळे साजरे होत असतात.तसेच जागतिक, राष्ट्रीय दिन साजरे केले जातात. त्याला संयुक्त राष्ट्र संघ, जागतिक आरोग्य संघटना, सरकारांच्या मान्यतेने हे दिवस साजरे केले जातात. मग तो शिक्षक दिन, डॉक्टर डे, क्रीडा दिन, अभियंता दिन, पत्रकार दिन... अशा व्यवसायागणिक दिनांना त्या व्यावसायिकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. आरोग्य, साक्षरता, हृदय, मधुमेह, रक्तदान अशा आरोग्याशी निगडीत दिनांच्या दिवशी त्यासंबंधी जनजागृती केली जाते. वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.हे सगळं ‘छान छान’ असे वरकरणी वाटत असले तरी प्रत्यक्षात या विषयांचे गांभीर्य अलिकडे संपत चालले आहे. व्यावसायिक मंडळींविषयी वर्षातून एकदा कृतज्ञता व्यक्त केली की, उर्वरित दिवसांमध्ये त्यांचा उपहास, टीका, प्रसंगी हल्ला करायला आम्ही मोकळे असतो. ‘व्हॅलेंटाईन डे’ वरुन घडणारे रामायण तर सुपरिचित आहे. त्यामुळे त्याविषयी अधिक न बोललेले बरे. बाकी सण-उत्सवांचा ‘इव्हेंट’ होतोय. त्याला समाजातील काही घटक व्यावसायीक स्वरुप देत आहेत. वर्गणी, तिकीटे, प्रायोजकत्व अशा बाबींमधून समाजात श्रीमंत-गरीब अशी दरी निर्माण केली जात आहे. समाजातील काही मूठभर मंडळींच्या हातात या गोष्टी जात आहे. निखळ आनंद, खळाळता उत्साह या गोष्टी लुप्त होत आहेत. हे झाले सण, उत्सवांचे तर ‘दिनां’विषयी उपचार केले जात आहेत. साधे पत्रकार दिनाचे उदाहरण घेतले तरी दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत अनेक पत्रकार संघटना तयार झाल्या आहेत. प्रत्येक संघटनेला त्याच दिवशी कार्यक्रम घ्यायचा असतो. वक्ता आणि प्रमुख अतिथींची उडणारी तारांबळ पाहिली म्हणजे, एकच लग्नघटिका आली तर पुरोहिताची उडणारी धावपळ आठवते. अलिकडे झालेल्या क्रीडा दिनी हाच प्रकार दिसून आला. वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांच्या संघटना कार्यरत आहेत. पुन्हा शाळा, महाविद्यालयांमध्ये याचदिवशी कार्यक्रम घेणे शासकीय धोरणानुसार बंधनकारक असते. त्यामुळे त्यांचेही कार्यक्रम होतात. या सगळ्यातून नेमके काय साधले जातेय, याचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.‘एक गाव एक गणपती’ असा उपक्रम महाराष्ट्रात बऱ्यापैकी राबविला जातो. शासन आणि प्रशासन या उपक्रमाला प्रोत्साहनदेखील देते. जळगावसारख्या ठिकाणी सगळ्या क्रीडाप्रकाराच्या संघटनांना एकत्र आणून क्रीडा महासंघ स्थापन करण्यात आला आहे. त्यांचा एक कार्यक्रम होत असतो. अशा पध्दतीने सगळ्यांना एकत्रित आणून एकच कार्यक्रम ठेवला तर यजमान आणि पाहुणे या दोघांची धावपळ तर होणार नाहीच, पण कार्यक्रम नेटका, देखणा आणि परिणामकारक होऊ शकेल.अर्थात हे सगळे प्रत्यक्षात येण्यासाठी मनाचा मोठेपणा, मोकळेपणा हवा आहे. मी, माझे असे करत राहिल्यास कार्य सीमित होते. डबके तयार होते. नवनवीन लोक आले, कल्पना वेगवेगळ्या सूचतात. पाणी प्रवाही राहिल्यास नितळ, स्वच्छ राहते, हे लक्षात घेऊन खरे तर आम्ही बदलायला हवे. ही काळाची गरज आहे. अन्यथा उपचारापुरते दिन दरवर्षी साजरे होत जातील. साजरे करणाºयांना आनंद, समाधान मिळत असला तरी त्याचा उद्देश साध्य होणार नाही, समाजावर परिणाम होण्याची अपेक्षा फलद्रुप होणार नाही.
उपचारांपुरते दिन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2018 9:40 AM