पं.नेहरूंची देशसेवा आणि त्यांची थोरवी या अभिमानास्पद बाबी देशाच्या इतिहासातून पुसून नाहीशा करायला निघालेल्या आताच्या सत्ताधाऱ्यांना त्यांच्या मोठेपणाचा, नेतृत्त्वाचा आणि त्यागाचा गौरव ऐकविण्याची बुद्धी वरुण गांधी या भाजपाच्या खासदारास व्हावी ही बाब त्यांच्यासाठी जेवढी कौतुकाची तेवढीच त्यांच्या पक्षातील इतर पुढाऱ्यांना लाज वाटायला लावणारी ठरावी. नेहरूंची सव्वाशेवी जयंती १४ नोव्हेंबरला पार पडली. साऱ्या जगाने त्यांची त्या दिवशी आठवण केली. पण त्याच काळात इतरांच्या जयंत्यांचे स्मरण ठेवणाऱ्या मोदी सरकारला मात्र नेहरूंची साधी आठवणही काढाविशी वाटली नाही. स्वातंत्र्यलढ्याचे नेते, आयुष्याची १५ वर्षे तुरुंगात घालविलेले देशभक्त, जगाने नावाजलेले अभ्यासू इतिहासकार, प्रतिभाशाली लेखक, आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय समाजवादाचे उद््गाते, देशाचे पहिले पंतप्रधान, भारतात लोकशाही व घटना रुजविणारे संवेदनशील नेते, भाक्रा-नानगल व हिराकुंडसारखी धरणे देशात उभारून तिथला दुष्काळ संपविणारे देशकारणी, भाभा अणुशक्ती केंद्राची पायाभरणी करून देशाच्या आजच्या अणुशक्तीचा आरंभ करणारे दूरदृष्टीचे सत्ताधारी, जगातील सत्तागटांपासून दूर राहिलेल्या दीडशे राष्ट्रांचे सर्वोच्च नेते आणि देशातील असंख्य नागरिकांएवढेच लहानांचे लाडके चाचा असलेले पं. नेहरू यांना देशाच्या सरकारने विस्मरणात टाकावे या एवढे त्याचे कृतघ्नपण दुसरे नाही. आजचे मोदी सरकार नेहरूंच्या पक्षाचे नाही. मात्र एवढ्याच एका कारणाखातर या सरकारने नेहरूंची सव्वाशेवी जयंती देशात साजरी करायला नकार दिला असेल तर त्याएवढे त्याचे व त्याला सत्तापदी बसविणाऱ्यांचे करंटेपण दुसरे नाही. लोकशाही हे मतभेदांचे राज्य आहे. मात्र त्यात मनभेद असू नयेत हे त्याच्या निकोप वाढीसाठी आवश्यक आहे. मोदींचा पक्ष ज्या संघाने जन्माला घातला त्याला नेहरू-गांधींचे आरंभापासून वावडे आहे. मात्र तो वसा सत्तेवर आल्यानंतरही भाजपाच्या सरकारने चालविणे हा दीर्घद्वेष्टेपणा आहे. वरुण गांधी हे नेहरूंचे पणतू व संजय गांधी यांचे चिरंजीव आहेत. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेले ते खासदार आहेत. त्यांच्या मातोश्री मेनका गांधी बऱ्याच काळापासून भाजपामध्ये व आता त्या पक्षाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत. मोदींच्या सरकारने नेहरूंच्या स्मरणाकडे पाठ फिरविली, त्याविषयीची खंत काँग्रेस पक्षाने व्यक्त न करण्याचा मोठेपणा दाखविला. सोनिया गांधी व राहुल गांधीही त्याविषयी कुठे बोलल्याचे आढळले नाही. मेनकांनीही त्याविषयी मौन पाळलेलेच देशाला दिसले. पण जे घडत होते व आहे ते कमालीची अस्वस्थता निर्माण करणारे आहे. ही अस्वस्थताच असह्य होऊन वरुण गांधींनी नेहरूंच्या जाणीवपूर्वक केलेल्या विस्मरणासाठी सरकार व भाजपा यांना दोषी ठरविले आहे. देशभक्तांच्या त्यागाचा विसर ही कोणत्याही सुसंस्कृत देशाला, समाजाला व त्याच्या सरकारला कमीपणा आणणारी बाब आहे. नेमक्या याच शब्दात वरुण गांधींनी त्यांच्या पक्षाला खडे बोल ऐकविले आहेत. ते ऐकवितानाच ‘कोणीही उठसूट टीका केली म्हणून नेहरूंचे इतिहासातील महत्त्व व जनमानसातील स्थान कमी होणार नाही हे लक्षात ठेवा’ असेही ते म्हणाले आहेत. ते म्हणताना त्यांनी नेहरू व देशबंधू चित्तरंजन दास यांच्या डाव्या भूमिका व उजव्या राजकारणापासून त्यादोहोंनी राखलेले अंतरही वरुण गांधींनी सांगितले आहे. आश्चर्य हे की भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे देखील नेहरूंना आपला आदर्श मानीत. या वाजपेयींनीच सध्याच्या पंतप्रधानांची गुजरातमध्ये अल्पसंख्यकांच्या झालेल्या कत्तलीवरून २००२ मध्ये कानउघाडणी केली होती. त्यासाठी त्यांनी त्यांना जाहीररीत्या राजधर्म ऐकविला होता. वास्तव हे की, तेव्हा अडवाणी आड आले नसते तर वाजपेयींनी मोदींच्या उचलबांगडीची पूर्ण तयारीच केली होती. मात्र मोदी संघाएवढेच दीर्घद्वेष्टे आहेत. त्यांनी नेहरूंचा दुस्वास तर केलाच पण नंतरच्या काळात ते वाजपेयींबाबतही शाब्दिक भलेपणाखेरीज काही करताना दिसले नाहीत. दुर्दैवाने आपल्या लोकशाहीत आणि त्यातही आताच्या संघकुलोत्पन्नांच्या राजकारणात नेता बोले आणि अनुयायी दळ हाले अशी स्थिती असल्याने नेहरूंवर तोंडसुख घेण्यात त्यातल्या शाळकरी पोरांपासून इतिहासातले काही एक ठाऊक नसणाऱ्या अज्ञ जनांनाही आनंद घेताना देशाने पाहिले आहे. ही बाब आजच्या सत्ताधाऱ्यांना सध्या लाभदायक वाटत असली तरी वास्तवात ती त्यांच्या विरोधात जाणारी आहे. वरुण गांधी ही केवळ सुरुवात आहे. त्यांच्यासारखे मन व मत असणारी अनेक माणसे व तरुण त्यांच्या पक्षात व देशात आहेत. एक दिवस हा वर्ग गांधी-नेहरू यांच्या सत्ताधाऱ्यांनी चालविलेल्या टवाळीविरुद्ध व त्यांचे नाव पुसून टाकण्याच्या त्यांच्या खेळाविरुद्ध संघटितपणे उभा राहील व तो दिवसही आता फारसा दूर नसेल.
वरुणास्त्र
By admin | Published: September 08, 2016 4:34 AM