- रवींद्र वासुदेव गाडगीळ
वसंत ऋतूवर लिहायला घेतल्यावर लगेच मनासमोर वसंत बहार खुलला आणि खरेच 'फुलला मनी वसंत बहार. एकेक करून सर्व 'वसंत' डोळ्यांसमोर आठवणींच्या साठवणीतून झरझर उतरू लागले. वसंत-वीणा झंकारू लागल्या आणि ते 'वसंत-वैभव' साऱ्या आसमंतात उधळून द्यावे आणि त्यात तुम्हा रसिक वाचकांनाही सामील करून घ्यावे, अशी तीव्र इच्छा झाली. आपल्यासमोर मी अनेक वसंत लीला, वसंत वर्णन, वसंत मालती, वसंत मंजिरी, वसंत विलास, वसंताच्या खुणा, वसंत चंद्रिका, वासंतिका, वसंत कोकीळ माझ्या परीने जिथून मिळेल तिथून आणून सादर करणार आहे. आपलेही सहकार्य त्यात अपेक्षित आहेच. चला तर मग लुटू या आनंद वसंतोत्सवाचा!
प्रथम आले ते नाटककार स्व. वसंतराव कानेटकर. विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शोभावे, एवढी त्यांची लेखनसंपदा आहे. लोकमान्य आणि लोकप्रिय. त्यांच्याविषयी लिहिता लिहिता बहुतेक हा ऋतू संपेल की काय? असे वाटते. बघू तरी काय आहे तो वसंत बहार-
'वादळ माणसाळतंय', 'वेड्याचे घर उन्हात', 'देवांचे मनोराज्य', 'प्रेमा तुझा रंग कसा?', 'रायगडाला जेव्हा जाग येते', 'दोन ध्रुवांवर दोघे आपण', 'मत्स्यगंधा', 'मोहिनी', 'अश्रूंची फुले झाली', 'लेकुरे उदंड झाली', 'इथे ओशाळला मृत्यू', 'घरात फुलला पारिजात', 'तू तुझा वाढवी राजा', 'मीरा-मधुरा', 'हिमालयाची सावली', 'बेईमान', 'अखेरचा सवाल', 'नल-दमयंती', 'विषवृक्षाची छाया', 'माणसाला डंख मातीचा', 'सूर्याची पिल्ले', 'एक रूप-अनेक रंग', 'गोष्ट जन्मांतरीची', 'गाठ आहे माझ्याशी', 'कधीतरी-कोठेतरी', 'पंखांना ओढ पावलांची', 'छूमंतर', 'गगनभेदी', 'मदनबाधा', 'सोनचाफा' ही झाली त्यांच्या नाटकांची यादी!
आता एकांकिका- 'व्यासांचा कायाकल्प', 'मद्रासीने केला मराठी भ्रतार', 'गड गेला पण सिंह जागा झाला', 'स्मगलर', 'सम्राटांच्या न्यायालयात रामशास्त्री', 'झेंडे पाटील महाविद्यालयात गंगू', 'अंबु', 'विठा', 'आनंदीबाई आणी-बाणी पुकारतात', 'शहाण्याला मार शब्दांचा'
कांदंबऱ्या- 'घर', 'पंख', 'पोरका', 'तेथे चल राणी'...
कथा - 'लावण्यवती', 'रमाई', 'हे हृदय कसे आईचे',
टीका - 'नाटक एक चिंतन'
आत्मचिंतन - 'मी... माझ्याशी'
अबब! केवढं हे साहित्य...डोळे दीपून जातात. एकापेक्षा एक सरस व सुंदर! फुलविला ना ह्यांनी तुमच्या जीवनात वसंत? साक्षात सरस्वतीचे पुत्रच हे! अखंड साहित्ययोगी! सतत चिंतन, लेखन, वाचन चालूच. त्यामुळे समाजमन सहज समजून घेणारे. प्रत्येकाच्या बोलण्यातून, प्रसंगातून, घटनेतून कथेचे, चित्रपटाचे, नाटकाचे सार व बीज शोधून त्वरित त्याचा शब्दरूपी कल्पवृक्ष आपणासमोर ठेवणारे! आपणास वाटावे की, 'अरे, हेच मलाही म्हणायचे होते','हेच माझे दुःख आहे, शल्य आहे, आनंद आहे, सुख आहे.... नाही नाही! मी जे शोधत होतो, ते हेच! असा हा कल्पवृक्ष, मनोवांछित फळ देणारा! या कल्पवृक्षाखाली उभे राहून आपणही काही स्वेच्छा प्रकट करू या. निश्चितच हाती काही लागेल.
'जिथे गवताला भाले फुटतात', हे त्यांच्या ऐतिहासिक नाटकांपैकी एक व्यावसायिक नाटक. इतिहास व छत्रपती शिवाजी हा त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. हे त्यांचे शिवशाहीवरचे शेवटचे नाटक. १६८९ ते १७०७ चा कालखंड ह्यात घेतला आहे. एवढा प्रदीर्घ कालखंड ह्या एका नाटकात सामावला आहे. ह्या नाटकातील विविध माणसं, त्यांच्या प्रवृत्ती, त्यांचे गुण-दोष, त्यांची थोरवी, त्यांची क्षुद्रता यामुळे ज्या घडामोडी घडत होत्या, त्यांचे वर्तमानकाळाशी पूर्णपणे विलक्षण साम्य आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात, ते खरे आहे! फंद-फितुरीने, दुहीने, लाचारीने, स्वार्थाने, वैराने, भ्रष्टाचाराने, नादान लोक जेव्हा जेव्हा पोखरले जातात, तेव्हा तेव्हा जबर किंमत द्यावीच लागते. कोण्या एका ताठ मानेच्या व्यक्तित्वाची, राष्ट्राची, भूमीची, समाजाची! छत्रपती राजाराम, महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे ह्यांच्या जीवनावर प्रकाश टाकून, त्यांच्याबद्दलच्या इतिहासातील व समाजातील गैरसमजुती दूर करणारे हे नाटक आहे.
हे नाटक लिहिताना, बसविताना व सादर करताना नटभास्कर प्रभाकरपंत पणशीकर ह्यांनी व त्यांच्या सुकन्या जान्हवी खांडेकर ह्यांनी बहुमोल साथ केली. स्वतः पणशीकर ह्यांनी औरंगजेब सादर केला होता, तर जान्हवीताईंनी महाराणी ताराबाई सादर केली होती. हे सर्व लिहायचे कारण सद्यस्थितीत वाचनसंस्कृती बंद होत चालली आहे. सोशल मीडियाच्या युगात आता कोणालाच वेळ नाही. अशात वेळात वेळ काढून ही नाटकं, कादंबऱ्या, कथा, लेख वाचून, बघून, ऐकून आपणही क्षणभर आनंदात राहून सर्वांना तो आनंद वाटावा. स्मृतींना पुन्हा उजाळा द्यावा. भूतकाळात रमू नये म्हणतात, परंतु अद्भुत काळात जरूर रमावं आणि इतरांनाही रमवावं!
ravigadgil12@gmail.com
(क्रमश:)