ठाण्यातील काँग्रेसचे नेते बाळकृष्ण पूर्णेकर आणि संजय चौपाने यांचे एकाच अपघातात मागेपुढे झालेले मृत्यू दुर्दैवी तर आहेतच पण ठाण्यातील काँग्रेसकरिता तर ही कधीही भरून न येणारी हानी आहे. औरंगाबाद येथे स्व. इंदिरा गांधी जन्मशताब्दी सोहळा आटोपून हे दोघे एकाच मोटारीतून निघाले होते. एका मोटारसायकलस्वाराला वाचवताना चालकाचा मोटारीवरील ताबा सुटला आणि ती रस्त्याचा दुभाजक ओलांडून पलीकडे गेली. तिकडून येत असलेल्या बसची या मोटारीला धडक बसून चौपाने जागीच गेले. पूर्णेकर यांची मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज अखेर संपली. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांची प्राणज्योत मालवावी हा विचित्र व दुर्दैवी योगायोग म्हणता येईल. राजकारण हेही कमालीच्या अस्थिरतेचे व पर्यायाने तणावाचे क्षेत्र आहे. वेगवेगळी व्यवधाने सांभाळताना अनेकदा तारांबळ उडते. अनेक नेते रात्री प्रवास करतात. विमानतळावर जाण्याकरिता पुरेसा वेळ हाती ठेवत नाहीत व मग चालकाला वाहन पिटाळायला भाग पाडतात. आतापर्यंत काही तरुण, उमद्या राजकीय नेत्यांना रस्ते अपघातात एक तर प्राण गमवावे लागले आहेत किंवा ते जायबंदी झाले आहेत. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. मुंबईतील शिवसेनेचा गड काहीसा कमकुवत झाला असतानाही ठाण्यात शिवसेना मजबूत आहे. अशा वेळी काँग्रेस पक्षात राहून कायम विरोधी पक्षाची भूमिका सांभाळायची हे काम पूर्णेकर यांनी यशस्वीरीत्या केले होते. त्यामुळे ते ठाण्यातील काँग्रेसचा चेहरा होते. चौपाने हे अजातशत्रू होते. त्यांची पक्षनिष्ठा दृढ होती. पूर्णेकरांना समाजकारणाचे बाळकडू वडिलांकडून मिळाले. स्व. आनंद दिघे यांच्याकडे त्यांचे भवितव्य वडिलांनी सोपवले होते. पूर्णेकर यांनी शिवसेनेत अल्पावधीत यश प्राप्त केले. मात्र ऐन मोक्याच्या वेळी निवडणूक लढण्याची संधी नाकारल्याने ते काँग्रेसमध्ये आले व पक्षाशी एकनिष्ठ राहिले. ठाण्यातील पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, खड्डे अशा अनेक समस्यांविरुद्ध चिकाटीने आंदोलन करून पूर्णेकरांनी स्वत:ची वेगळी छाप पाडली होती. रेती काढणे हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय. त्यामध्ये लिलाव पद्धती लागू ेकेल्यावर राज्यात स्वपक्षाचे सरकार असूनही पूर्णेकरांनी संघर्ष करून सरकारला निर्णय बदलायला भाग पाडले. पूर्णेकर अनेक सामाजिक उपक्रम राबवून सतत लोकांमध्ये राहायचे. रक्तदानाच्या चळवळीचे ते कार्यकर्ते होते व त्यांनी पन्नासहून अधिक वेळा रक्तदान केले होते. ठाण्यातील काँग्रेस मुळात कमकुवत असताना दोन नेत्यांच्या मृत्यूमुळे काँग्रेसच्या वर्मावर घाव बसला आहे, असे म्हटले तर ते चुकीचे नाही.
काँग्रेसच्या वर्मावर घाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 4:41 AM