पंतप्रधाननरेंद्र मोदी आज ७१ वर्षांचे होत असताना आमच्यातले दीर्घ, सुखद, समृध्द करणारे स्नेहबंध आपल्यासमोर उलगडताना मला विशेष आनंद होत आहे. देशाच्या प्रगतीसाठी असलेली त्यांची अथक, अविचल बांधिलकी आणि देशवासीयांच्या जगण्याचा दर्जा सुधारण्यासाठी अविश्रांत धडपड इतर अनेकांप्रमाणे मलाही पाहायला मिळाली. गुजरातचे मुख्यमंत्री या नात्याने १३ वर्षे आणि देशाचे पंतप्रधान म्हणून गेली सात वर्षे हाच दृष्टिकोन उराशी बाळगून त्यांनी विकास कार्यक्रम राबवला.
त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य असताना झालेल्या अनेक फलदायी चर्चा मला आठवतात. धोरणे आखताना त्यांची बहुआयामी कल्पनाशक्ती आणि सटीक भाष्य सदैव उपयोगी पडले. त्यांच्यात कार्यकर्त्याचा ध्यास आणि मुत्सद्याची दृष्टी आहे. भविष्यावर ठाम नजर ठेवून आपल्या सहकारी मंत्र्यांना, खासदारांना आणि प्रामुख्याने देशवासीयांना बदलाचे सक्रिय दूत होण्याची प्रेरणा देणारे मोदीच माझ्या डोळ्यासमोर येतात.
सकारात्मक बदलाच्या प्रक्रियेत लोकांना सामील करून घेणे हीच त्यांच्या कार्यशैलीची मुख्य खूण राहिली. त्यांचे माझ्याशी आणि माझ्या मंत्रालयीन सहकाऱ्यांशी बोलणे व्हायचे तेव्हा केवळ सरकारी कार्यक्रमांपेक्षा स्वच्छता अभियान, स्मार्ट शहरे हेच विषय जास्त असत. मोदीजींनी केवळ समावेशक विकासाला गती दिली नाही तर त्याची फलनिष्पत्ती दाखवता येईल आणि टिकून राहील, हेही त्यांनी पाहिले.
परिस्थिती गंभीर असताना त्यात आशेचा किरण शोधणे हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनोखे वैशिष्ट्य. संकटाचे रुपांतर संधीत करण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. कोविडची साथ हाताळताना तीच उपयोगी पडली आणि नव्या उद्योगांना प्रभावी वातावरण मिळावे, नवनवीन गोष्टी बाहेर याव्यात, यासाठी त्यांनी साद घातली. गेल्या काही वर्षांत सुधारणांच्या विलक्षण कल्पना त्यांनी डोक्यात घेतल्या. त्यात सर्व क्षेत्रे होती. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी पैसे थेट हस्तांतरित करणे, संथ अर्थव्यवस्थेत प्राण फुंकणे, मध्यम आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन, नवे शैक्षणिक धोरण, आरोग्य व्यवस्था बळकट करणे अशा कितीतरी गोष्टी त्यांनी केल्या.
- ही गती सांभाळणे हे आता देशापुढचे आव्हान आहे. नरेंद्रभाईंची अदम्य इच्छाशक्ती देशाला विकास, वाढीच्या नवनव्या वाटांवर पुढे नेईल आणि भारत जगातले लक्षणीय राष्ट्र होईल, यात शंका नाही. आपली उदात्त स्वप्ने साकार होतील, अशा शुभेच्छा मी नरेंद्रभाईंना देतो. हा विलोभनीय जन्मदिन आनंददायी होवो.