पोलिसांची प्रतिमा बदलण्यासाठी आत्तापर्यंत अनेक प्रयत्न झाले. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यासाठी आचारसंहिता बनविल्या, परंतु तीदेखील चमकोगिरीच ठरली. पोलीस कर्मचा-यांची वर्षानुवर्षांची मस्ती काही उतरत नाही. सांगलीतील अनिकेत कोथळेपासून अनेक प्रकरणांनी पोलिसांतील गुन्हेगारी उघड झाली, पण त्यापेक्षाही सामान्य नागरिकांना पोलिसांकडे गेल्यावर न्याय मिळेलच, याची शाश्वती राहिली नाही, हे पोलीस दलाचे सर्वांत मोठे अपयश आहे. हा समज दृढ करणाºया घटना सातत्याने घडत आहेत. एखादी घटना घडल्यावरही नागरिक पोलीस ठाण्यात जायला कचरतात. कारण पोलिसांकडून तक्रारदारालाच आरोपीप्रमाणे वागणूक दिली जाते. बोलण्यातील गुर्मीपासून ते पोलीस ठाण्यात मिळणाºया वागणुकीमुळे नैराश्य येते, पण त्यापेक्षाही तक्रार घेऊन येणाºयावरच पोलीस दंडुका उगारतात, हे जास्त भीषण. पुण्यातील जनवाडी पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी पट्ट्याने मारहाण सुरू केली. आपल्या मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून वडिलांना धक्का बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला केवळ बदलीची शिक्षा झाली. शहाण्याने कोर्टाची किंवा पोलीस ठाण्याची पायरी चढू नये, म्हणतात. येथे एका ज्येष्ठ नागरिकाचा पोलीस चौकीच्या पायरीवरच मृत्यू झाला. वास्तविक, ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्टÑ पोलीस दलाचे ब्रीद, परंतु त्यामध्ये भ्रष्टाचाराची लागण झाल्याचा फटका सामान्य माणसाला बसू लागला आहे. पोलिसांना मिळणाºया सुविधा, त्यांचे वेतन याबाबत अनेकदा चर्चा होते. उत्सवांच्या काळात पोलिसांना तासन्तास कराव्या लागणाºया ड्युटीबाबत त्यांचे कौतुकही होते. जनतेचे रक्षक म्हणून विविध सामाजिक संघटनांकडून सत्कार सोहळेही होतात, परंतु पोलिसांमध्ये माणुसकीची भावना निर्माण करण्यात यश मिळाले आहे, असे म्हणता येण्यासारखी परिस्थिती आज राहिलेली नाही. पोलीस ठाण्यामध्ये आलेल्या नागरिकाला सौजन्यपूर्वक वागणूक मिळणे, हा त्याचा हक्क आहे. त्यासाठी मोहिमा राबविल्या जातात, परंतु पोलीस चौकीपर्यंतच्या स्तरापर्यंत हा संदेश पोहोचलेला दिसत नाही. कायद्याचे रक्षकच भक्षक बनायला लागले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखणे याचा अर्थ भीतियुक्त समाज निर्माण करणे नाही. कायद्याविषयी सामान्य माणसाला विश्वास वाटायला हवा, परंतु यंत्रणाच किडलेली असल्याने पोलिसी राज भयभीत करत आहे.
पोलिसीराजचे बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 3:55 AM