पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येणार आहे. त्याचे सर्व श्रेय मोदींनाच द्यावे लागेल. त्यांनी २०१४ मधील निवडणुकीत दिलेली आश्वासने किती पूर्ण झाली, त्याचा लेखाजोखा या निवडणुकीच्या वेळी देण्यात आला नाही. शेतकºयांना ५० टक्के नफा जोडून भाव देण्याचा, युवकांना दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचा व सबका साथ सबका विकास हे विषय मागे पडलेत. तरीही मोदी यांनी विजय खेचून आणला यात शंका नाही. विशेष म्हणजे, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या काँग्रेसशासित राज्यात भाजपाने मिळविलेल्या विजयामुळे मोदींची लोकप्रियता व विश्वास अजून कायम असल्याचे सिद्ध केले. महाराष्ट्र व कर्नाटकमधील निकालही हाच संदेश देत आहे, परंतु आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू व केरळमध्ये मोदी जादूचा परिणाम झाला नाही. उत्तर प्रदेशमध्ये सपा व बसपा युतीचा परिणाम पडला नाही. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा प्रभाव कमी करून भाजपाने विजय मिळविला. एकंदरीत शेतकरी व असंघटित कामगारांची उपेक्षा करूनही निवडणूक जिंकता येते, हा संदेश या निकालावरून गेला आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीचा अभ्यास केल्यास एक मुद्दा स्पष्ट होतो की, प्रत्येक निवडणुकीत पाकिस्तानचा हात असतो. गुजरात निवडणुकीतील प्रचाराची आठवण करून देतो. त्या निवडणुकीत पाकिस्तानला रस आहे व अहमद पटेल काँग्रेसचे मुख्यमंत्री होतील, ही चर्चा घडवून आणली गेली होती.नरेंद्र मोदी यांनीच शेतकरी व असंघटित कामगारांची उपेक्षा केली असे नाही. त्यासाठी विरोधी पक्षही तेवढाच दोषी आहे. नरेंद्र मोदी व भाजप ज्या कुशलतेने हिंदुत्वाचा मुद्दा वापरत होते, त्याला उत्तर देण्यात विपक्ष अपयशी ठरले, तसेच जातीच्या राजकारणात शेतकºयांचे, युवकांच्या नोकरीचे, विणकरांचे प्रश्न मागे पडले, ही या निकालाची शोकांतिका आहे. काश्मीरमधील पुलवामाची दुर्दैवी घटना व पाकिस्तानवरील प्रतिहल्ल्याचा प्रचार याचा निवडणुकीवर प्रभाव पडला. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी निवडणूक जिंकण्यासंदर्भात केलेल्या विधानाकडे लक्ष वेधू इच्छितो. ते म्हणतात, किती चांगल्या पद्धतीने सरकार चालविले, लोकांचे प्रश्न किती सोडविले, देशाची अर्थव्यवस्था किती सुधारली, यावर निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी ते पी. व्ही. नरसिंहराव सरकारचे उदाहरण देतात. त्यांच्या मते निवडणुका भावनात्मक मुद्द्यांवर जिंकता येतात. म्हणून ते म्हणतात, मुस्लिमांमध्ये फूट पाडा, हिंदूंना संघटित करा व निवडणुका जिंका. मोदी यांचे निवडणूक जिंकण्याचे तंत्र आणि मंत्र हेच आहे. इंदिरा गांधी यांना निवडणूक जिंकण्याचे तंत्र माहिती होते, तसेच नरेंद्र मोदी यांचे आहे. नोटाबंदीच्या वेळी मोदी म्हणाले होते, ‘मैंने अमिरों की निंद हराम कर दी.’गरिबांना ते खरे वाटले.
गाव व शहर यांतील उत्पन्नाची तफावत दूर झाली नाही, तर ‘सब का साथ सब का विकास’ कसे साध्य होईल? आमदार, खासदार स्वत:चे भत्ते वाढवून घेण्यासाठी एकत्र येतात. पुढील पाच वर्षांत मोदी सरकार व विरोधी पक्ष सामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देतील, अशी आशा करू या.विजय जावंधिया(शेतकरी नेते.)