नागपूर, चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भ तापायला लागला असून उन्हामुळे अंगाची काहिली होते आहे. काही भागातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. काल राज्यात चंद्रपुरात सर्वाधिक ४४.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. अकोला, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धेतही तापमानाने बेचाळीशी पार केली आहे.दरम्यान पुढील चार दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. एप्रिलच्या अखेरीसच ही परिस्थिती आहे तर मे आणि जूनमध्ये काय असणार याचा यावरून सहज अंदाज येतो. दरवर्षीचा अनुभव बघता मे महिन्यात तापमान ४५ ते ४६ अंशावर जाऊ शकते. विदर्भातील उन्हाळा तसा देशभरात बदनाम आहे. या दोनतीन महिन्यात कुणी बाहेरील लोक येथे येण्याससुद्धा घाबरतात. अरे बापरे! विदर्भातील उन्हाळा, नकोरे बाबा! अशीच एकंदरीत प्रतिक्रिया असते. परंतु येथे राहणाऱ्यांना मात्र उन्हाच्या या झळा सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. अर्थात त्यापासून आपला जास्तीतजास्त कसा बचाव करता येईल याची काळची प्रत्येकाने घ्यायला हवी. याशिवाय सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्येसुद्धा त्वरित उपचाराची सर्व सोय उपलब्ध असणे आवश्यक आहे. कारण सूर्य जसजसा आग ओकतोय तसतशी उष्माघाताच्या रुग्णांचीही संख्या वाढते आहे. विशेषत: पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये याचा प्रकोप अधिक आहे. केवळ नागपुरात आतापर्यंत उष्माघाताच्या ५० वर रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील काळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या आठवड्यातील वादळी पावसाने नाही म्हणायला तापमान किंचित घटले होते पण अशा विचित्र वातावरणात रोगराईही वाढत असते, हे लक्षात घ्यायला हवे. महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाला यादृष्टीने सर्तक राहण्याचे निर्देश शासनातर्फे देण्यात आले आहेत पण त्याचे काळजीपूर्वक पालनही अपेक्षित आहे. उन्हाळ्याच्या दिवसात कामानिमित्त बाहेर पडणाºयांना आणि प्रामुख्याने उघड्यावर भर उन्हात काम करणाºयांना उष्माघात होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे शहरातील प्रत्येक भागात जास्तीतजास्त पाणपोर्इंची व्यवस्था असणे गरजेचे आहे. बºयाच स्वयंसेवी संस्था या कामात पुढाकार घेत असतात. पण स्थानिक प्रशासनानेही याची विशेष काळजी घेतली पाहिजे. याशिवाय उन्हापासून बचावाकरिता रस्त्यावर किंवा चौकात तरी काही तात्पुरते शेडस्ही बांधण्यास हरकत नाही. यंदा पाऊस चांगला होणार असे भाकित हवामान विभागाने नुकतेच वर्तविले आहे. पण त्यापूर्वी हा उन्हाळा कसा सुसह्य होईल,हे बघायचे.
विदर्भ तापतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:48 AM