तब्बल ६० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रणजी करंडकावर आपले नाव कोरत विदर्भ संघाने इतिहास रचला आणि ‘सोशल मीडिया’वर एक नवी चर्चा सुरू झाली. हा विजय वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीकडे एक पाऊल ठरेल, असा विश्वास विदर्भवाद्यांना वाटू लागला आहे. मात्र केवळ विश्वास वाटणे आणि प्रत्यक्ष कृती यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो. केवळ ‘सोशल मीडिया’वर वेगळ्या विदर्भाचे समर्थन करत आंदोलनाची भाषा करणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचाच प्रकार ठरतो. विदर्भाच्या क्रिकेट संघाने मिळविलेला विजय हा सांघिक प्रयत्नांचा आहे. त्यामागे कठोर परिश्रम व अनेक वर्षांची तपस्या आहे. या स्पर्धेत तर कामगिरीतील सातत्यामुळेच यशाचा टप्पा गाठता आला. वेगळ्या विदर्भ राज्यासाठीचे आंदोलनदेखील तसे जुनेच आहे. मात्र वेगवेगळ्या ऋतूप्रमाणे आंदोलनदेखील बदलत गेले. कधीकाळी विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांनी विदर्भाच्या आंदोलनाला नेतृत्व दिले. मात्र काळाच्या ओघात आंदोलनातील सातत्य हरवत गेले. मधली काही वर्षे तर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा अक्षरश: थंडबस्त्यात पडला होता. नाही म्हणायला प्रसिद्धी मिळविण्यासाठी काही हौशी कार्यकर्ते ‘जय विदर्भ’ म्हणत पत्रकबाजी करायचे. मागील लोकसभा निवडणुकांनंतर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा खºया अर्थाने परत चर्चेत आला. मात्र अॅड.श्रीहरी अणे वगळता या आंदोलनाला सक्षम नेतृत्व लाभू शकले नाही. नाही म्हटले तरी आता आ.आशिष देशमुख या आंदोलनाला राजकीय नेतृत्व देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र नेतृत्वामागे जनतेचे समर्थन असणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. जनतेच्या भरवशावरच लोकशाहीत विजय मिळविणे शक्य आहे. विदर्भाच्या क्रिकेट संघाच्या मागे जनतेचे आशीर्वाद होते, भावना जुळल्या होत्या. या खेळाडूंनी जनतेमध्ये विजयाचा विश्वास निर्माण केला होता. या संघाकडून विदर्भवाद्यांनीदेखील शिकवण घेण्याची आवश्यकता आहे. केवळ गप्पा हाकून किंवा वर्तमानपत्रांमध्ये छायाचित्र छापून विजय मिळू शकत नाही. विजय मिळविण्यासाठी तप लागते, घाम गाळावा लागतो. विदर्भवाद्यांनी ‘एअर कन्डिशन्ड’ आंदोलनाची तºहा सोडून जनतेमध्ये जाऊन वेगळ््या विदर्भासाठी समर्थन जुटविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यात नियोजन आणि सातत्य अपेक्षित आहे. जर कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे घाम गाळला तरच जनतेमध्ये विश्वास निर्माण होईल व वेगळ्या विदर्भ राज्याची स्वप्नपूर्ती होऊ शकेल. जर असे झाले तर एक दिवस विदर्भ राज्याची चमू रणजी करंडक उंचावेल आणि तो सर्वार्थाने दुग्धशर्करा योग ठरेल.
विदर्भाचा ‘विजय’ कधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 12:25 AM