नाशिकचे राजकीय नाट्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 08:14 AM2023-01-14T08:14:48+5:302023-01-14T08:15:04+5:30

काँग्रेसने नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात पक्षाचा एबी फॉर्म दिल्यानंतरही विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज न भरता त्यांचे पुत्र, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना पुढे चाल दिली.

Vidhan Parishad elections and political drama are trying to become an equation of Maharashtra politics. | नाशिकचे राजकीय नाट्य

नाशिकचे राजकीय नाट्य

Next

विधान परिषद निवडणूक व राजकीय नाट्य हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे जणू समीकरणच बनू पाहत आहे. गेल्या जूनमध्ये राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीच्या वेळीच शिवसेना फुटली. एकएक करून आमदार सुरतमार्गे गुवाहाटीला पोहोचले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद सोडले. महाविकास आघाडीचे सरकार पडले. आता राज्यात दोन पदवीधर व तीन शिक्षक अशा विधान परिषदेच्या पाच जागांच्या रणधुमाळीची सुरुवात अर्ज भरण्याच्या राजकीय नाट्याने झाली. काँग्रेसनेनाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात पक्षाचा एबी फॉर्म दिल्यानंतरही विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज न भरता त्यांचे पुत्र, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना पुढे चाल दिली.

भारत जोडो यात्रेच्या आधारे पुनरुज्जीवनाची स्वप्ने पाहणारी काँग्रेस तांबे पिता-पुत्रांच्या डावपेचांबद्दल पूर्णपणे गाफील राहिली. या डावपेचांना मोठ्या राजकीय घराण्याचे वलय आहे. काँग्रेस विधिमंडळ गटनेते, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे डॉ. सुधीर तांबे हे मेहुणे, तर सत्यजित हे भाचे. या दोन्ही घराण्यांना दिवंगत स्वातंत्र्यसेनानी, सहकारितेचे अध्वर्यू भाऊसाहेब थोरात यांचा वारसा आहे. योगायोगाने गुरुवारीच भाऊसाहेब थाेरात यांची जयंती होती. आणखी योगायोग म्हणजे बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे यांनी त्यांच्या पहिल्या निवडणुका अपक्ष म्हणूनच जिंकल्या होत्या. सत्यजित यांच्या बंडाळीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फूस होती किंवा राजकीय नाट्याची संहिताच फडणवीसांनी लिहिल्याचे मानले जाते.

गेल्या महिन्यात गॅविन न्यूसम लिखित ‘सिटिझनविल’ या नागरी प्रश्नांवरील पुस्तकाच्या सत्यजित यांनी केलेल्या मराठी अनुवादाचे प्रकाशन फडणवीस व थोरात यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी ‘या कर्तबगार तरुणाला लवकर संधी द्या, अन्यथा आमचा त्यांच्यावर डोळा आहेच’, असे विधान फडणवीस यांनी केले होते. त्याचा संबंध सत्यजित यांच्या बंडाशी जोडला जात आहे. खरे-खोटे फडणवीस, तांबे व थाेरातच जाणोत. सत्यजित तांबे तरुण आहेत. युवक काँग्रेसचे नेतृत्व करताना महाराष्ट्रभर फिरून त्यांनी नेटवर्क उभे केले आहे. त्यांनी राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काही चूक नाही. वडीलधारी मंडळी सत्तरीतही पदाला चिकटून राहणार असतील तर तरुणांनी किती वाट बघायची, असेही त्यांना वाटत असावे. कदाचित कुटुंबातील फूट टाळण्यासाठी तांबे पिता-पुत्रांनी हा निर्णय घेतला असेल. फक्त जे केले ते पक्षाला विश्वासात घेऊन केले असते तर नाचक्की झाली नसती. शिवाय, बाळासाहेब थोरात यांच्यासारखे मुरब्बी नेते भाच्याच्या योजनांबद्दल अनभिज्ञ असतील असे मानणे भाबडेपणाचे ठरते.

नागपूर विधिमंडळ अधिवेशनकाळात मॉर्निंग वॉकवेळी पाय घसरल्याने बाळासाहेब जखमी झाले. ते मुंबईत उपचार घेत असताना इकडे संगमनेरमध्ये राजकीय नाट्याची रंगीत तालीम सुरू होती, असे म्हणता येईल. गमतीने असेही म्हणता येईल, की चुलत्या-पुतण्यांच्या राजकीय खेळी, डावपेच महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर बहरत असताना त्याला मामा-भाचे नात्याची किनार लाभली आहे. फडणवीसांनी अशी खेळी खरेच केली असेल तर विखे, मोेहिते, महाडिक अशा काँग्रेस, राष्ट्रवादीच्या घराण्यांमधील नवी पिढी भारतीय जनता पक्षाच्या वळचणीखाली उभे राहिल्याचा प्रवाह प्रवरेकाठच्या संगमनेरपर्यंत विस्तारला आहे. खरे पाहता विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधरांसाठी राखीव जागांबद्दल राजकीय पक्ष नको तितके महत्त्वाकांक्षी आहेत. या जागा शिक्षक किंवा पदवीधरांच्या हक्काच्या. त्यांच्या संघटनांच्या तंबूत राजकीय पक्षांचे उंट शिरले व त्यांनी तंबू ताब्यात घेतले.

विविध प्रश्नांवर सतत आंदोलने करणाऱ्या संघटनांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी राजकीय पक्षांनी या जागाही शह-काटशहाचे मैदान बनवले. मुळात पक्षांकडे या जागांवर प्रबळ उमेदवार नाहीत. भाजपने कोकण व मराठवाड्यात उमेदवार आयात केले. नाशिकमध्ये उमेदवार नसल्याने सत्यजितना पाठिंबा देण्याचा विचार सुरू आहे. नागपुरात सक्षम उमेदवार नसल्याने विद्यमान आमदार नागो गाणार यांनाच समर्थन द्यावे लागले. शिवसेनेकडे पाचपैकी एकही मतदारसंघ नसल्याने उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटांना संधीची शक्यता नव्हती. तरीदेखील महाविकास आघाडीत नागपूरची जागा ठाकरे गटाने पदरात पाडून घेतली. औरंगाबादेत राष्ट्रवादीचे विक्रम काळे, अमरावतीत भाजपचे डॉ. रणजित पाटील व कोकणात बाळाराम पाटील असे सगळेच विद्यमान आमदार रिंगणात असले तरी राज्याचे लक्ष मात्र नाशिककडे असेल.

Web Title: Vidhan Parishad elections and political drama are trying to become an equation of Maharashtra politics.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.