- संजीव साबडे (समूह वृत्त समन्वयक)कोणाचेही निधन दु:खदायकच असते. पण काहींच्या निधनामुळे सारा समाजच हळहळतो आणि शोक व्यक्त करतो. स्त्रीवादी चळवळीसाठी पाच दशकांहून अधिक काळ शांतपणे काम करणाºया विद्या बाळ यांच्या निधनामुळेही साºया समाजालाच दु:ख झाले आहे. विद्यातार्इंनी कधी स्त्रीमुक्ती चळवळीचा आक्रमक झेंडा हाती घेतला नाही, पण त्या महिलांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत, यासाठी विविध माध्यमांद्वारे प्रयत्न करीत राहिल्या. त्या मूळच्या लेखिका असल्या तरी त्यांच्या लिखाणातूनही स्त्रिया, त्यांचे प्रश्न आणि भोगाव्या लागणाºया यातना दिसत असत.त्यांनी सुरू केलेले ‘मिळून सा-याजणी’ हे मासिक तर अतिशय लोकप्रिय होते. केवळ महिलाच नव्हे, तर पुरुषही अतिशय तन्मयतेने ते मासिक आणि एकूणच विद्यातार्इंचे लिखाण वाचत. विद्यातार्इंची स्त्रीवादी चळवळ ही समान हक्कांसाठी असली तरी त्यात पुरुषांचा दु:स्वास कधीच नव्हता. किंबहुना पुरुषांना सोबत घेऊ नच आणि त्यांना बाजू समजावूनच स्त्रियांना समान अधिकार मिळवून देणे शक्य होईल, अशी त्यांची भूमिका होती आणि ती त्या ठामपणे मांडत. त्यामुळे स्त्रीमुक्ती चळवळीचा आक्रमक झेंडा हाती घेतलेल्या काही महिला नेत्या त्यांच्यापासून काहीशा दूर राहिल्या. पण त्याचा एक फायदा झाला आणि तो म्हणजे कोणत्याही चळवळीत वा आंदोलनात नसलेल्या महिलांना आपल्यासोबत घेणे विद्यातार्इंना शक्य झाले.महाराष्ट्रात एक काळ नियतकालिकांचा होता. तेव्हा खूप मराठी नियतकालिके निघत आणि वाचली जात. त्या काळातच किर्लोस्कर, स्त्री व मनोहर ही नियतकालिकेही अत्यंत लोकप्रिय होती. त्यापैकी स्त्री मासिकाच्या विद्याताई संपादकही होत्या. पुढे नियतकालिकांपेक्षा टीव्हीला अधिक महत्त्व आले आणि आर्थिक गणित जमत नसल्याने नियतकालिके बंद पडू लागली. पण त्याच काळात विद्यातार्इंनी ‘मिळून साºयाजणी’ मासिक काढण्याचा निर्णय घेतला. त्या मासिकाचे अधिकाधिक सदस्य व्हावेत, यासाठी त्यांनी त्या काळात खूप प्रयत्न केले. एकीकडे मध्यमवर्गीय महिला आणि दुसरीकडे मोलमजुरी करणाºया, तसेच ग्रामीण भागांतील स्त्रिया यांना एकमेकांशी जोडण्याचा यशस्वी प्रयोग विद्यातार्इंनी या मासिकाद्वारे केला.
एकीकडे लिखाणाच्या माध्यमातून, तर दुसरीकडे प्रत्यक्ष संघटना स्थापन करून विद्याताई स्त्रीवादी चळवळीसाठी सतत प्रयत्न करीत होत्या. त्यांनी ‘नारी समता मंच’ ही संघटना स्थापन केली. अशिक्षित महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी अशी संघटना गरजेची आहे, हे त्यांनी हेरले होते. त्यामुळे या संघटनेद्वारे त्या अनेक गावांमध्ये पोहोचू शकल्या. पण केवळ संघटना गावांमध्ये पोहोचून उपयोग नाही, प्रत्यक्ष महिलांनीही बोलायला हवे, आपला त्रास, जाच बोलून दाखवायला हवा, असे त्यांचे म्हणणे होते. त्यातूनच विद्यातार्इंनी ‘बोलते व्हा’ची स्थापना केली. त्याद्वारे अनेक महिला खरोखरच बोलत्या झाल्या. विद्याताई काही काळ आकाशवाणीवरही काम करीत होत्या. त्यांचे वक्तृत्व उत्तमच होते. पण वक्तृत्व उत्तम असण्यापेक्षा आपले म्हणणे लोकांपर्यंत पोहोचणे अधिक महत्त्वाचे आहे, या विचारातूनच त्यांनी भाषणशैली बदलली. त्यामुळे विद्यातार्इंचे भाषण एकतर्फी होत नसे. समोरच्या प्रेक्षकांशी, महिलांशी त्या भाषणातून संवाद साधत.आपल्या चळवळीत पुरुषांना जोडून घेण्यासाठी त्यांनी २००८ साली पुरुष संवाद केंद्राची स्थापना केली. आपल्या चळवळीविषयी पुरुषांना काय वाटते, त्यांचे काय म्हणणे व प्रश्न आहेत, हे समजून घेण्याबरोबरच स्त्रीवादी चळवळीविषयीचे गैरसमज दूर करण्यावर त्यांनी भर दिला. पुण्यातील मंजुश्री सारडा या महिलेची तिचा नवरा व सासºयाने हुंड्यासाठी विष देऊ न हत्या केल्याचे प्रकरण खूप गाजले होते. अशी अनेक प्रकरणे आजही पाहायला मिळतात. त्यामुळे विद्यातार्इंनी ‘मी एक मंजुश्री’ प्रदर्शन गावागावांत नेले.विद्यातार्इंचा सारा प्रवास गमतीदार होता. जनसंघाचे नेते रामभाऊ म्हाळगी यांच्या आग्रहास्तव त्यांनी १९७४ मध्ये महापालिकेची निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला. पण त्या पक्षाचा विचारही विद्यातार्इंना मानवला नसावा. लगेचच १९७५ साल हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर झाले. त्यानिमित्ताने महिलांच्या कामात स्वत:ला गुंतवून टाकणाºया विद्याताई पुढे कोणत्याही पक्षात गेल्या नाहीत. पण त्या प्रकारचे कार्य करणाºया मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, प्रमिला दंडवते या डाव्या विचारांच्या नेत्यांशी त्यांची प्रत्यक्ष व राजकीय जवळीक झाली. ती त्यांच्या चळवळीसाठी उपयोगाचीच ठरली.