आताच आपण आपला ६९ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. दिल्लीत राजपथावर झालेल्या दिमाखदार संचलनात भारताचे सामर्थ्य जगाने पाहिले. पण ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचले त्यांच्यामुळेच आजचे भारतीय प्रजासत्ताक उभे आहे, याचे आपण स्मरण ठेवतो का? देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहावे यासाठी सीमांवर प्राणांची बाजी लावणा-या शूर जवानांची यावेळी आपल्याला आठवण येते का? देशभक्ती आणि शौर्याचे बाळकडू आपण नव्या पिढ्यांना पाजण्यात यशस्वी होत आहोत का? मला आपल्याकडे हे फक्त सैन्यदलांमध्ये सळसळताना दिसते. अलीकडेच मी व्हिएतनामला गेलो होतो. तेथे मला प्रत्येक नागरिक देशभक्तीने भारावलेला दिसला.अमेरिकी सैन्याने व्हिएतनाममध्ये केलेल्या अनन्वित अत्याचारांच्या कहाण्या मी कित्येक वर्षे ऐकत आलो आहे. व्हिएतनामसारख्या छोट्याशा देशाने अमेरिकेसारख्या महासत्तेला गुडघे टेकण्यास कसे भाग पाडले असावे, याचे मला नेहमीच आश्चर्य वाटत आले होते. ही स्फूर्तिदायी शौर्यगाथा मला जवळून पाहायची होती, अनुभवायची होती. त्याचसाठी मी व्हिएतनामला जाऊन पोहोचलो.व्हिएतनाम प्रदेश फ्रान्सच्या ताब्यात होता. पुढे जिनिव्हा समझोत्यानुसार व्हिएतनामची दोन भागात फाळणी झाली. उत्तरेकडील भागाला व्हिएतनामी लोकशाही प्रजासत्ताक असे नाव दिले गेले. महान राष्ट्रवादी हो-ची मिन्ह या नव्या देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले. तेथे चीनचा प्रभाव वाढत आहे व त्या संपूर्ण भागात साम्यवाद पसरेल असे अमेरिकेस वाटले. त्यामुळे अमेरिकेने दक्षिण व्हिएतनाममध्ये सत्तापालट घडवून आणला आणि आपल्या पसंतीच्या नेत्याला पंतप्रधान पदावर बसविले. परंतु ‘व्हिएतकाँग’ नावाची देशभक्त संघटना अमेरिकेपुढे सर्वात मोठे आव्हान म्हणून उभी ठाकली. उत्तर व्हिएतनामच्या पाठीशी चीन होता व दक्षिण व्हिएतनामचे समर्थन करण्यासाठी अमेरिकेने १९५५ मध्ये तेथे पाऊल टाकले. लाओस आणि काम्पुचिया हे शेजारचे दोन छोटे देशही, अमेरिका महाबली आहे व आपल्या लष्करी ताकदीने ती आपल्याला चिरडून टाकेल, हे दिसत असूनही, उत्तर व्हिएतनामच्या बाजूने उभे राहिले.‘व्हिएतकाँग’ या क्रांतिकारी संघटनेस चिरडण्याचे दक्षिण व्हिएतनाम सरकारने हरतºहेने प्रयत्न केले. पण त्यात यश आले नाही. मग ही जबाबदारी स्वीकारली अमेरिकेने. या क्रांतिकाºयांनी अमेरिकी सैन्याच्या अनेक जवानांना जंगलांमध्ये ठार मारले तेव्हा अमेरिकेला त्यांच्या शक्तीची प्रथम कल्पना आली. ‘व्हिएतकाँग’ने आपल्या बचावासाठी ‘कू ची’ नावाचे भुयार तयार केले होते. हे क्रांतिकारी अमेरिकी सैनिकांना मारून या भुयारात घुसायचे. आत गेल्यावर भुयाराच्या तोंडावर काटेरी तारा लावल्या जायच्या. या काटेरी कुंपणात अडकलेले अनेक अमेरिकी सैनिक सहजपणे मारले गेले.मी हा ‘कू ची टनेल’ बघायला गेलो. गाईडला सोबत घेऊन याचा काही भाग आता पाहता येतो. चक्रव्यूहासारखे हे टनेल हेच व्हिएतकाँगच्या विजयाचे मोठे बलस्थान होते. हल्ला करून व्हिएतनामचे क्रांतिकारी सैनिक या टनेलमध्ये शिरले की त्यांच्या पाठोपाठ आपणही जायचे, असा डावपेच अमेरिकी सैन्याने अनेक वेळा खेळून पाहिला. परंतु टनेलमध्ये शिरलेला एकही अमेरिकी सैनिक जिवंत बाहेर येऊ शकला नाही! शेवटी अमेरिकेने या टनेलवर बॉम्बहल्ले केले. पण त्या टनेलवर काहीही परिणाम झाला नाही.व्हिएतनामची जनता आपल्या आत्मसन्मानासाठी कशी निकराने लढली व अमेरिकी सैन्याने त्यांच्यावर किती अघोरी अत्याचार केले हे ‘वॉर म्युझियम’मध्ये-युद्ध संग्रहालयात पाहिले. हे युद्ध १९५६ पासून १९७५ पर्यंत चालले. त्यात अमेरिकेने केवळ व्हिएतनामच नव्हे तर त्यास साथ देणाºया लाओस व काम्पुचिया (कम्बोडिया) या शेजारी देशांमध्येही विध्वंस केला.इतिहास असे सांगतो की, या २० वर्षांच्या युद्धात सुमारे नऊ वर्षे अमेरिकी हवाईदलाने दर आठ मिनिटाला एक याप्रमाणे बॉम्ब टाकले. या लढाईत अमेरिकेने व्हिएतनाम व लाओसवर मिळून सुमारे २६ कोटी ‘क्लस्टर बॉम्ब’ टाकले, असा जाणकारांचा अंदाज आहे. जगभरात ‘क्लस्टर बॉम्ब’मुळे मरण पावलेल्यांपैकी निम्मे लोक याच भागातील आहेत. एवढेच नव्हे तर अमेरिकेने व्हिएतनाममध्ये विषारी वायूंचाही अस्त्र म्हणून वापर केला. त्याचे दुष्परिणाम आजही पाहायला मिळतात. त्या युद्धात ३० लाखांहून अधिक लोक ठार झाले. आणखी कित्येक लाख अपंग झाले. अमेरिकेलाही मोठी किंमत मोजावी लागली. त्यांचे ५८ हजार सैनिक या युद्धात मारले गेले. या सैनिकांच्या शवपेट्या अमेरिकेत पोहोचू लागल्या तसा अमेरिकी नागरिकांचाही संताप वाढत गेला. मुळात अमेरिका व्हिएतनाममध्ये गेलीच कशाला, असे लोक विचारू लागले. अमेरिकेत यावरून लोक रस्त्यांवर उतरले. त्यावेळी रिचर्ड निक्सन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. आपलीच जनता संतापल्यावर निक्सन यांना व्हिएतनाममधून माघार घेण्यावाचून पर्याय राहिला नाही. अमेरिकेची अवस्था एवढी केविलवाणी झाली की त्यांच्या सैन्याने शस्त्रास्त्रे तेथेच टाकून काढता पाय घेतला.अमेरिकेच्या माघारीनंतर १९७५ मध्ये उत्तर व्हिएतनामच्या साम्यवादी सैन्याने दक्षिण व्हिएतनाममधील क्रांतिकाºयांच्या मदतीने सायगॉन हे तेथील सर्वात मोठे शहर काबिज केले. त्यातूनच उत्तर व दक्षिण मिळून ‘सोशलिस्ट रिपब्लिक आॅफ व्हिएतनाम’ हे एकसंघ राष्ट्र निर्माण झाले. आता या सायगॉन शहराचे हो ची मिन्ह या साम्यवादी नेत्याच्या नावाने हो ची मिन्ह सिटी असे नामकरण करण्यात आले आहे. व्हिएतनाम युद्ध सुरू असतानाच हो ची मिन्ह यांचे निधन झाले. परंतु त्यांच्या अनुयायांनी अमेरिकेची व्हिएतनाममधून हकालपट्टी करण्याचे त्यांचे स्वप्न साकार केले. हो ची मिन्ह यांचे भारतावर खूप प्रेम होते. व्हिएतनाम युद्धात भारताने त्यांना पाठिंबा दिला होता. हे युद्ध सुरू असतानाच हो ची मिन्ह भारताच्या भेटीवर आले होते. आता व्हिएतनाम वेगाने विकास करीत आहे. सन २०२० पर्यंत व्हिएतनाम विकसित राष्ट्रांच्या श्रेणीत जाऊन बसेल, अशी अपेक्षा आहे. २० वर्षांच्या युद्धाने उद््ध्वस्त झालेल्या देशाने अशी भरारी घेणे हे नक्कीच अभिमानास्पद आहे.हे लिखाण संपविण्यापूर्वी...हो ची मिन्ह शहराच्या एका रस्त्यावरून मी जात होतो. दुचाकी वाहनांच्या संख्येच्या बाबतीत या शहराचा जगात दुसरा क्रमांक लागतो. अचानक एका दुचाकी चालकाने सायकलस्वाराला ठोकरल्याचे मला दिसले. आपल्याकडे असे घडले तर बहुधा धडक देणारा बाईकवाला पळून जातो. परंतु येथे तो थांबला. शाळा-कॉलेजांत जाणारे विद्यार्थीही धावले. सर्वांनी मिळून जखमीला इस्पितळात नेले. मी हे सर्व पाहात थांबलो होतो. त्या युवकांशी मी बोललो. जखमीला मदत करणे हे आपले सामाजिक कर्तव्य असल्याचे त्यांचे म्हणणे होते. भारतात परत येताना मनात विचार करत होतो की, असे सामाजिक भान आपल्याकडे कधी पाहायला मिळेल?
महासत्तेला नमविणारी व्हिएतनामची शौर्यगाथा
By विजय दर्डा | Published: January 29, 2018 12:49 AM