दृष्टिकोन: मतभेद हे तर लोकशाहीत जिवंतपणाचे खरे लक्षण!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 06:00 AM2020-03-14T06:00:25+5:302020-03-14T06:01:06+5:30

सरकारच्या विविध मंत्र्यांनी अधूनमधून वेगवेगळी वक्तव्ये केल्याने या सरकारमध्ये विसंवाद आहे, असे चित्र काही काळ उभे राहिले, पण सरकारमधील प्रमुख नेत्यांनी ते खोटे ठरविले.

Viewpoint: Disagreement is the true sign of living in democracy! | दृष्टिकोन: मतभेद हे तर लोकशाहीत जिवंतपणाचे खरे लक्षण!

दृष्टिकोन: मतभेद हे तर लोकशाहीत जिवंतपणाचे खरे लक्षण!

Next

डॉ. रविनंद होवाळ, प्रवर्तक, शोषणमुक्त भारत अभियान

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या तीनपक्षीय महाराष्ट्र सरकारने नुकतेच आपले शंभर दिवस पूर्ण केले. तीन पक्षांचे सरकार किती दिवस टिकणार, या शंकेला पहिल्या टप्प्यात तरी त्यांनी एक कणखर उत्तर दिले. महाराष्ट्र सरकारचे याबद्दल सर्वांनी मन:पूर्वक अभिनंदन केले पाहिजे. परस्परविरोधी विचारांच्या पक्षांचे सरकार किंवा विसंवादी सरकार अशी काही लोकांनी या सरकारची संभावना केली होती. या संभावनेला एक जोरदार उत्तर या शंभर दिवसांनी दिलेले आहे.

सरकारच्या विविध मंत्र्यांनी अधूनमधून वेगवेगळी वक्तव्ये केल्याने या सरकारमध्ये विसंवाद आहे, असे चित्र काही काळ उभे राहिले, पण सरकारमधील प्रमुख नेत्यांनी ते खोटे ठरविले. खरे तर आपण सर्व माणसे आहोत व आपले प्रत्येकाचे शरीर, मन, त्याला आलेले अनुभव इ. मुळे प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतातच. कुटुंब असो, एखादी संस्था संघटना असो किंवा मग सरकार असो, या विविधतेचे दर्शन तेथे घडतेच! विचार वेगळे असण्यात अनैसर्गिक असे काहीच नसते. विचार वेगवेगळे असूनही काही प्रमाणात स्वत:च्या काही विचार किंवा अपेक्षांना मुरड घालून सामूहिक हित किंवा लोककल्याणासाठी एकत्र येणे, ही तर खरी गौरवाची बाब आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे कल्याण साधण्यासाठी किमान समान कार्यक्रमाच्या आधारे कोणी एकत्र येत असेल, तर त्यांचे आपण अभिनंदनच केले पाहिजे!

सध्याचे मुख्यमंत्री माणुसकीने वागतात, दररोज मंत्रालयात गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारख्या लोककल्याणासाठी आयुष्य वेचलेल्या महामानवांना अभिवादन करतात, साध्या शिपायाकडे पाहूनही स्मित करतात, यांसारख्या लहान-लहान गोष्टी जनतेपर्यंत पोहोचतात, तेव्हा जनता एका परीने आपोआपच आश्वस्त होते. सरकार काहीतरी भले करेल, निदान काही नुकसान तरी करणार नाही, याची जनतेला यातून खात्री पटते व यातूनच सरकारची विश्वासार्हता वाढते. त्यामुळे जाहिरातबाजी न करताही जनता सोबत राहू शकते.

भारतात काय किंवा महाराष्ट्रात काय दोनपेक्षा अधिक पक्ष एकत्र आले की, अनेक जणांच्या भुवया उंचावतात, ही खरे तर मोठी गमतीची बाब आहे. भारताने आपल्या संविधानातून बहुपक्षपद्धती स्वीकारलेली आहे, हे माहीत असणाऱ्या कोणाच्याही भुवया अशा प्रसंगाने उंचावण्याचे खरे तर काहीही कारण नसते! असो. महाराष्ट्रात सध्या तीन पक्षांचे सरकार आहे. उद्या तीस पक्षांची सरकारे चालविण्याची वेळ आली, तरी त्याची कोणी चिंता करण्याचे काहीही कारण नाही. सामूहिक हिताचे मुद्दे आधी पुढे रेटून मग आपापले इतर मुद्दे पुढे रेटण्याची कला आपण अवगत केली की, सर्व प्रश्न समाधानकारकपणे सुटू शकतात. देश किंवा राज्यापेक्षा पक्ष किंवा त्याची विचारसरणी मोठी नाही, ही बाब एकदा आपण स्वीकारली की, इतर अडचणी आपोआपच नाहीशा होऊ शकतील!

अधिक पक्ष एकत्र आले की, एका दिशेने वेगाने जाणे अशक्य होते, असा काही जणांचा नेहमी आक्षेप असतो. परस्परांशी कमी-अधिक मतभेद असलेले पक्ष एकत्र आले, तर सामूहिक हिताच्या दृष्टीने सर्वसमावेशक धोरण स्वीकारले जाण्याची शक्यता वाढते, याकडे हे लोक दुर्लक्ष करतात. चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेने हळूहळू का होईना चालणे हेच सर्वांच्या हिताचे असते, हे या निमित्ताने आपण लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्राला स्थिर सरकार देणे, एवढेच महत्त्वाचे काम सध्याच्या सरकारसमोर नाही. त्याहूनही अधिक महत्त्वाची अनेक कामे त्यांच्यासमोर आहेत व ती पार पाडण्यासाठी सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांनीही आता आपले योगदान देणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच सरकारी कर्मचाºयांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केलेला आहे, पण तो करताना कामाचे तास का वाढविले हे समजत नाही. मूठभर लोकांकडून ढीगभर काम करून घेण्याचा आजवर जगभर पडलेला पायंडा आता महाराष्ट्रानेच मोडला पाहिजे. मूठभर लोकांना जास्तीतजास्त राबविण्याऐवजी ढीगभर लोकांना थोडे-थोडे राबविले, तर अधिक मोठ्या प्रमाणात काम होईल व बेरोजगारीसारखे प्रश्नही आपोआप नष्ट होतील. गांधी किंवा लोहियांनी सुचविल्याप्रमाणे प्रत्येक माणसाला ठरावीक मर्यादेबाहेर मेहनताना न देण्याचा उपाय यासाठी कामाला येईल. देशात नाही, तर निदान राज्यात तरी आरपार परिवर्तन घडविण्याची ही संधी महाराष्ट्राने घ्यावी आणि संविधानाच्या अडतिसाव्या कलमाने सुचविल्याप्रमाणे सामाजिक, आर्थिक व राजकीयदृष्ट्या न्यायपूर्ण समाजाची निर्मिती करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलावे, हीच प्रबोधनकारांच्या वारसदाराकडून व त्यांच्या सर्व सहकारी-मार्गदर्शकांकडून आजच्या महाराष्ट्राची अत्यंत साधी अपेक्षा आहे.

Web Title: Viewpoint: Disagreement is the true sign of living in democracy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.