एका बाजूने मतदान केंद्रापर्यंत जाऊन सामान्य मतदार लोकशाहीतील महत्त्वपूर्ण भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत असताना राजकीय वैचारिक लढाई न करता नेत्यांनी गैरमार्ग हाताळावेत, ही बाब खूपच गंभीर आहे. दक्षिण महाराष्ट्राने अनेक वेळा राज्याचे, पक्षांचे नेतृत्व केले आहे. या पार्श्वभूमीवर घडलेल्या हिंसाचाराच्या घटना गंभीर आहेत.
दक्षिण महाराष्ट्राला असंख्य निवडणुकांची सवयच आहे. वर्षाला डझनभर मोठ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका अत्यंत चुरशीने होतात. शिवाय लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदा, नगरपालिका, ग्रामपंचायती आदि लोकप्रतिनिधी सभागृहासाठी निवडणुका चुरशीने होतात. सामान्य शेतकरी पुरुष आणि महिलाही मतदानास भरभरून प्रतिसाद देतात. विशेषत: साखर कारखान्याच्या निवडणुकांसाठी दोन डझनभर संचालक निवडायचे असतात. त्यात उत्पादक शेतकरी गटाचे सतरा, अनुत्पादक गटातून दोन, सहकारी संस्था गटातून एक, महिला गटातून दोन-तीन, मागासवर्गीय आणि भटक्या विमुक्त गटातून प्रत्येकी एक, अशी विविध गटांत मते द्यावी लागतात. तरीही सभासद एकाच गटाच्या चोवीस जणांना मतदान करून ठरावीक गटास निवडून देतात. जिल्हा बँक, अर्बन बँक, शिक्षक बँक, पतसंस्था, सूतगिरण्या, दूध संघ, साखर कारखाने, अशा असंख्य संस्थांच्या निवडणुका जोरदार होतात. दक्षिण महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबातील एकजण तरी वर्षाला मतदानास सामोरे जातो. अशा या दक्षिण महाराष्ट्रात (कोल्हापूर, सांगली आणि सातारा) जिल्हा परिषदा, तसेच तालुका पंचायत समित्यांसाठी मंगळवारी मतदान झाले. या तिन्ही जिल्ह्यांतील मतदान ७१ ते ७७ टक्क्यांपर्यंत झाले आहे. राज्यातील दहा महापालिकांचे मतदान ५५ टक्क्यांपेक्षा पुढे जात नसताना जवळपास २० ते २५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. ग्रामीण भागातील जनता अधिकच मतदान करते. कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांत ऐंशी टक्क्यांपेक्षाही अधिक मतदान झाले आहे. मुंबई महापालिकेसाठी गेल्या अनेक निवडणुकीत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होत नव्हते. यावेळी त्यात वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षिण महाराष्ट्र खूपच आघाडीवर आहे. मतदार याद्यांची दुरुस्ती किंवा याद्या अद्ययावत केल्या, तर दक्षिण महाराष्ट्रातील टक्का नव्वदीपेक्षा पुढे जाऊ शकतो. जगभरात इतके मतदान कोठेही होत नाही. दक्षिण महाराष्ट्राची ही सर्व जमेची बाजू असली तरी अलीकडच्या काळात या निवडणुकांना हिंसाचाराचे गालबोट लागत आहे. पैशाचा वारेमाप वापर करण्यात येऊ लागला आहे. सांगली जिल्ह्यात एका पोलीस कर्मचाऱ्यासच मारहाण करण्यात आली. इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना पैसे वाटण्याच्या आरोपावरून कोंडून ठेवण्याचा प्रयत्न झाला. साताऱ्यात खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे या दोन चुलत भावांच्या कार्यकर्त्यांची रस्त्या-रस्त्यावर हाणामारी झाली. याप्रकरणात खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे गटाचे वसंत मानकुमरे यांच्यासह ८० जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे हे दोघे राजे एकाच पक्षात आहेत. एकाच शहरात राहतात. पण, त्यांचे राजकीय वैर आता हिंसेचे स्वरूप धारण करीत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एका सरपंचांकडून पोलिसास मारहाण करण्यात आली. अशा या मारामारीच्या घटना गंभीर आहेत. गोळीबाराचे प्रकारही घडले आहेत. निवडणूक आयोगाने अनेक बंधने घालूनही पैशाच्या वापराचे नियंत्रण होत नाही. एका गटात पैसे वाटप करताना कार्यकर्ते सापडले. नगराध्यक्षांवरच पैसे वाटल्याचा आरोप होतो आहे. खासदार आणि आमदारांविरुद्ध मारामारीच्या तक्रारी होत आहेत. ही धोक्याची घंटा आहे. एका बाजूने सामान्य मतदार मतदान केंद्रापर्यंत जाऊन लोकशाही प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत असताना राजकीय वैचारिक लढाई न करता नेत्यांनी गैरमार्ग हाताळावेत, ही बाब गंभीर आहे. दक्षिण महाराष्ट्राने अनेक वेळा राज्याचे, पक्षांचे नेतृत्व केले आहे. या पार्श्वभूमीवर घडलेल्या हिंसाचाराच्या घटना गंभीर आहेत. - वसंत भोसले