आज सकाळपासूनच ‘विजूअण्णा’ची सटकली होती. आता तुम्ही विचाराल, ‘हा विजूअण्णा कोण?’ अहोऽऽ हा तर लंडनमधला आपला मल्ल्या. स्विमिंग पुलाजवळ ‘सनबाथ’ घेत आॅनलाईन पेपर वाचताना त्याला ‘मातोश्री’वाल्यांनी टाकलेली ‘ब्रे्रकिंग न्यूज’ दिसली. ‘मल्ल्या हा कमळवाल्यांचा बँ्रड अॅम्बेसिडर!’ हे वाचताच ‘विजूअण्णा’ दचकला. इवलीशी बोकड दाढी खाजवत त्यानं थेट आपल्या वकिलाला मोबाईल लावला. ‘कमळ’वाल्यांना तत्काळ कायदेशीर नोटीस पाठविण्याची आॅर्डर सोडली.मग काय...नागपूरच्या मुख्य शाखेत ‘अण्णा’ची नोटीस थडकली. कार्यालयात मोहनजी ‘फूल पॅन्टीचं जागतिकीकरण’ या गहन विषयाचा सखोल अभ्यास करीत बसलेले. ‘प्रणवदानंतर आता कुणाला शाखेत बोलवावं?’ असा प्रश्न त्यांच्या नजरेसमोर तरळलेला. एवढ्यात त्यांचं लक्ष नोटिशीकडं गेलं. नोटिशीत म्हटलं होतं की, ‘तुमच्या पक्षाचं अन् सरकारचं ब्रँडिंग करण्यासाठी म्हणे तुम्ही माझ्या नावाचा वापर करताय. व्हय...मी लाभार्थीवाले शेतकरी गप्प बसले असले तरी मी मात्र शांत राहणार नाही. मला याची रॉयल्टी हवीच. तेव्हा नोटीस मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत व्याजासहित ही रक्कम माझ्या खात्यात जमा करावी. टीप : ‘सरकारी बँकांऐवजी स्वीस बँकेचा वापर करावा,’...पत्र वाचताना झुपकेदार मिशांआडचं स्मित हास्य लोपलं.त्यांनी अस्सल शाखेच्या भाषेत प्रत्युत्तर पाठविलं, ‘आपला नेमका बँ्रड कुठला, हे आम्हाला ठाऊक नाही... अन् आम्ही तर आयुष्यात कधी अॅम्बेसिडर कारही वापरली नाही. केवळ लंडनच्या बीचवर आपण बर्म्युडा वापरता म्हणून आमच्या पुरातन हाफ चड्डीशी बादरायणी संबंध जोडण्याचा उगाचंच प्रयत्न करू नये. राहता राहिला विषय रॉयल्टीचा. आमची लॉयल्टी केवळ ध्वजासोबत असल्यानं आम्ही आपणास फक्त दंड देऊ शकतो. हवा असल्यास कळविणे.’नोटीस वाचून ‘विजूअण्णा’नं डोळ्यावरचा नखरेल गॉगल डोक्यावर सरकवला, ‘मी आयुष्यात कधी कर्जाचं साधं मुद्दलही भरलं नाही, तिथं दंड व्याज कुठनं आलं?’ असं म्हणत त्यानं दुसरी नोटीस थेट देवेंद्रपंतांना पाठविली. ‘वर्षा’वर बिगर दुधाचा कोरा चहा पित देवेंद्रपंतानी नोटिशीला उत्तर पाठविलं, ‘अध्यक्ष महोदय.. तुम्ही एका नामवंत बुडीत कंपनीचे पे्रसिडेंट म्हणून मी तुम्हाला अध्यक्ष म्हणतोय. यात सवयीचा काहीही भाग नाही. तुमच्या पळून जाण्यामुळं आमच्या सरकारची ३५ पूर्णांक ००२ टक्के इतकी बदनामी झालीय. त्यामुळं उलट तुम्हीच १२ कोटी ८९ लाख ४३ हजार ३७४ रुपये ५२ पैसे इतकी रक्कम नुकसानभरपाईपोटी द्यावी. तुमच्या नोटिशीच्या या असल्या कागदी वाघाला आम्ही भीत नाही. ही पहिली नोटीस आहे म्हणून तुमची चूक ‘माईल्ड’पणे घेतलीय, जर भविष्यातही अशीच मग्रुरी करणार असाल तर आम्हाला ‘स्ट्राँग’ भूमिका वठवावी लागेल.’नोटीस वाचून ‘विजूअणा’चा भेजा पार हडबडला. त्याला पत्रातली पूर्णांकाची आकडेवारी काही समजली नाही. आता विरोधकांनाच आजपावेतो कळाली नाही, तिथं हा अण्णा म्हणजे किस झाड की पत्ती. मात्र या पत्रातले दोन शब्द बरोबर समजले. ते म्हणजे ‘माईल्ड’ अन् ‘स्ट्राँग’.. कारण अण्णाचा तो व्यवसायच तो होता नां!- सचिन जवळकोटे
‘विजूअण्णा’चा स्ट्राँग ब्रँड !
By सचिन जवळकोटे | Published: July 18, 2018 11:34 PM