- प्रशांत दीक्षितसंसदेत मंजूर झालेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची छाप स्पष्टपणे दिसते. भारतात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या परदेशी नागरिकांपैकी पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेश या देशांतून आलेल्या घुसखोरांना नागरिकत्व देताना त्यातून मुस्लिमांना वगळण्याची तरतूद नव्या कायद्यात करण्यात आली आहे. धर्माच्या आधारावर करण्यात आलेला हा भेदभाव राज्यघटनेला अनुसरून नाही आणि ‘आयडिया ऑफ इंडिया’ किंवा भारताचे जे कल्पनाचित्र स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी तसेच राज्यघटनाकारांनी रेखाटले होते, त्याच्याशी विसंगत असा हा निर्णय आहे, हा विरोधी पक्षांचा मुख्य आक्षेप. मुस्लिमांना दुय्यम नागरिकत्व देण्याची ही सुरुवात आहे, अशी शंका व्यक्त होत असून त्यामुळे मुस्लिम समाज चिंताग्रस्त आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याला असे स्वरूप देण्यामागची प्रेरणा स्वातंत्र्यवीर सावरकरांची असावी, अशी शंका येते. भारत हा हिंदूंचा देश आहे आणि तीच त्याची ओळख असली पाहिजे, याबद्दल सावरकरांसहित बहुसंख्यांच्या मनात त्या वेळी शंका नव्हती. तेव्हा भारताचा उल्लेख हिंदुस्थान असाच होत असे. या हिंदुस्थानात हिंदू कोणाला म्हणावे, या देशात राष्ट्रीय कोण, याची व्याख्या सावरकरांनी केली होती. ‘ज्याची पितृभू आणि पुण्यभू सप्तसिंधूंच्या प्रदेशात आहे तो हिंदू,’ असे सावरकरांनी म्हटले होते. पितृभू म्हणजे पूर्वज राहत होते ती भूमी आणि पुण्यभू म्हणजे व्यक्तीचे धर्म, धर्मसंस्थापक, अवतार, प्रेषित यांची भूमी. लोकमान्य टिळकांनी केलेल्या व्याख्येत वेदांना प्रमाण मानणे ही मुख्य अट घातली होती; मात्र सावरकरांनी ती नाकारून पितृभू व पुण्यभू अशा शब्दांनी ती अधिक व्यापक करून त्यामध्ये भारतातील अन्य धर्म व पंथांनाही जागा करून दिली. पुण्यभूचा निकष लावला तर वैदिकांबरोबरच बौद्ध, जैन, शीख, आर्यसमाजी, ब्राह्मोसमाजी, प्रार्थनासमाजी, सर्व आदिवासी इतकेच नव्हे तर नास्तिक समजले जाणारे चार्वाकवादी हे सर्व हिंदू होतात.
स्वत: सावरकर नास्तिक किंवा अज्ञेयवादी होते. या व्याख्येने भारतातील बौद्ध हे हिंदू ठरतात; पण चीन वा श्रीलंकेतील बौद्ध हे अहिंदू ठरतात. कारण चीन वा श्रीलंकेतील बौद्धांची पितृभू भारत नाही. त्यांची पुण्यभू भारत आहे, कारण भारतात बौद्ध धर्म जन्माला आला. सावरकरांच्या व्याख्येतून वगळले जातात ते मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू व पारशी. कारण त्यांचे प्रेषित भारतात जन्मलेले नाहीत वा त्यांचे धर्मग्रंथ भारतात लिहिले गेले नाहीत. तथापि, सावरकरांनी पुढे ख्रिश्चन, ज्यू, पारशी यांच्यासाठी पुण्यभूची अट बरीच सैल केली. या धार्मिक गटांपासून भारतातील हिंदूंना फार धोका नसल्याने पितृभूच्या निकषावर त्यांना राष्ट्रीयत्व देता येईल, हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले होते. मात्र, मुस्लिमांबद्दल सावरकरांचे मत वेगळे होते. त्या धर्माची प्रेरणाच त्या व्यक्तीला इस्लामी नसलेल्या कोणत्याही प्रदेशावर निष्ठा ठेवू देत नाही, असे सावरकरांचे म्हणणे होते. म्हणून ‘भारताचा राष्ट्रीय समाज’ यामध्ये ते मुसलमानांचा समावेश करीत नाहीत. कर्णावतीच्या अधिवेशनात (१९३७) एकदाच त्यांनी द्विराष्ट्रवादाचा उल्लेख केला. तेथे सावरकर म्हणाले, की स्थिती अशी आहे, की भारतात एकमेकांच्या विरोधात असलेली दोन राष्ट्रे एकमेकांच्या शेजारी राहत आहेत. आजचा भारत हे एकात्म (युनिटेरियन) आणि एकसंध (होमोजिनिअस) राष्ट्र नाही; उलट भारतात हिंदू व मुसलमान अशी दोन राष्ट्रे आहेत. कर्णावतीच्या अधिवेशनानंतर त्यांनी पुन्हा कधीही द्विराष्ट्रवादाचा उल्लेख केला नाही. त्यांचा युक्तिवाद नंतर बदलला. नागपूरच्या अधिवेशनात ते म्हणाले, की जर्मनीत जर्मन लोक हे एक राष्ट्र आहे व ज्यू हा लोकसमूह (कम्युनिटी) आहे. तुर्कस्तानात तुर्क हे राष्ट्र आहेत आणि अरब वा आर्मेनिअन हे लोकसमूह. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात हिंदू हे राष्ट्र आहेत (कारण हिंदूंची पितृभू व पुण्यभू एकच आहे) आणि मुस्लिम अल्पसंख्य हा एक लोकसमूह आहे.
मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू, पारशी हे जरी अल्पसंख्य असले तरी सावरकरांच्या मनातील हिंदुराष्ट्रात त्यांना हिंदूंना मिळणारे सर्व अधिकार व हक्क होते, हे लक्षात घेतले पाहिजे. हिंदूंसमवेत मुसलमान व अन्य अहिंदू यांच्या एकत्रित राज्याला सावरकरांनी ‘संयुक्त हिंदी राज्य’ असे म्हटले होते. हे राज्य ‘हिंदू राज्य’ नसून, ‘हिंदी राज्य’ असेल. ते लोकशाही पद्धतीने काम करील आणि हिंदू हा प्रमुख राष्ट्रीय लोकसमूह असला, तरी त्याला कोणतेही विशेष अधिकार नसतील. बहुसंख्यांच्या हक्कांवर आक्रमण होणार नसल्याच्या अटीवर अल्पसंख्यांचे धर्म, संस्कृती आणि भाषा याबाबतचे न्याय्य हक्क संरक्षिले जातील. अल्पसंख्यांच्या वेगळ्या शैक्षणिक वा धार्मिक संस्थांना सरकारी मदत मिळेल. बहुसंख्यांचे हक्क हिरावले जाणार नसतील तर लोकसंख्येच्या प्रमाणात अल्पसंख्यांना राखीव जागा बहाल करण्यात येतील व दरडोई एक मत असेल, असे सावरकरांनी कलकत्ता (१९३९) येथील भाषणात स्पष्ट केले होते. म्हणजे सावरकर मुसलमानांना दुय्यम नागरिक समजत नव्हते. मुसलमानांना मित्र म्हणण्याचीही त्यांची तयारी होती. मात्र, ‘संशयास्पद मित्र’ असा त्यांचा उल्लेख ते करीत. शिया व खोजा यांचा त्यांनी गौरवाने उल्लेख केला आहे. लखनौमध्ये गोवधबंदी व मशिदीवरून वाद्य वाजविण्यास संमती या हिंदूंच्या मागण्या शिया पंथीयांनी मान्य केल्यानंतर (१९३९) खऱ्या राष्ट्रीय वृत्तीबद्दल सावरकरांनी त्यांचे अभिनंदन केले आणि अहिंदूंना खिजविण्यासाठी मुद्दाम मशिदीपुढे उभे राहून वाद्ये वाजविली जाणार नाहीत, असे आश्वासनही दिले. शियांचे कौतुक केले असले आणि हिंदुस्थान ही शियांची पितृभू असली, तरी पुण्यभू नसल्यामुळे हिंदू महासभेत शियांना प्रवेश देण्यास सावरकरांनी नकार दिला, हे उल्लेखनीय. शियांनी स्वतंत्र काम करावे व मतैक्य असेल तेथे एकत्र येऊन काम करावे, असे सावरकरांनी सुचविले.
सावरकरांचे संयुक्त हिंदी राष्ट्र हे उदारमतवादी असले, त्यामध्ये अहिंदूना किंवा न-राष्ट्रीयांना सर्व नागरिकी हक्क व अधिकार असले, तरी धोरण सावध आहे आणि भारताच्या राजकीय व सामाजिक व्यवहारावर हिंदू संस्कृतीची छाप राहावी यासाठी आग्रही आहे, असे म्हणता येते. हिंदुत्व व हिंदी राष्ट्र यांमध्ये सावरकरांनी फरक केला आहे. ‘काँग्रेस ही राष्ट्रीय सभाच राहावी, ती हिंदू महासभा होऊ नये’ असेही त्यांनी म्हटले होते. विस्कळीत हिंदू समाजाला बलवान व संघटित करण्यासाठी त्यांचे हिंदुत्व होते. मात्र, देशाचा कारभार हा बहुसंख्य व अल्पसंख्य यांना सारखाच अधिकार देऊन हिंदी राष्ट्र म्हणून चालावा, अशी मांडणी ते करीत होते. याचे तपशीलवार वर्णन सावरकरांच्या लेखनात मिळते. दुर्दैवाने ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या लोकसभा व राज्यसभेतील भाषणावर सावरकरांच्या हिंदू व्याख्येचा प्रभाव आढळतो. नागरिकत्व कायद्यातील तरतुदी या ‘पितृभू व पुण्यभू’ याच निकषावर करण्यात आल्या आहेत; मात्र भाषा अल्पसंख्य व बहुसंख्यांची वापरण्यात आली आहे. मुस्लिमेतर अल्पसंख्यांची आघाडी करावी, अशी सावरकरांची एक सूचना होती. तोच प्रयत्न यापुढे भाजपाकडून झाला, तर आश्चर्य वाटू नये.
अमित शाह यांच्यावर सावरकरांचा प्रभाव आहे, हे जगजाहीर आहे. मात्र, सावरकरांच्या हिंदुत्वाचा, मुसलमानांना संशयित मित्र ठरविण्यापुरताच शहा स्वीकार करणार की सावरकरांनी प्रतिपादन केलेले विज्ञाननिष्ठ, समताधिष्ठित हिंदुत्व प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकार म्हणून प्रयत्न करणार, हा कळीचा मुद्दा आहे. कारण सध्याच्या सरकारवर जीर्णमतवादी, परंपराप्रिय, सनातन हिंदूंचा प्रभाव ठायीठायी दिसतो आहे. जीर्णमतवादी अनुयायांनीच सावरकरांचा पराभव केला. सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ हिंदुत्वाऐवजी वर्णवर्चस्ववादी, जातींची उतरंड मानणाऱ्या, खुळचट रूढी-परंपरांना चिकटून राहणाऱ्या हिंदुत्वाची या अनुयायांनी पाठराखण केली. आजही तसे होताना दिसते. मुसलमानांना कक्षेबाहेर ठेवून शहा त्याच मार्गाने जाणार का? अशी धास्ती समंजस लोकांना वाटते. तिचे निरसन होणे आवश्यक आहे.
* (स. ह. देशपांडे यांच्या सावरकर ते भाजप आणि हिंदुत्वविचारांची फेरमांडणी (राजहंस प्रकाशन) या दोन पुस्तकांचा मुख्य आधार या लेखासाठी घेतला आहे. जिज्ञासूंना या पुस्तकांत बरीच अधिक माहिती मिळेल.).................