नरेंद्र मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी सर्व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गाड्यांवरील लाल, पिवळे, निळे दिवे काढण्याचा निर्णय अंमलात आणला. त्यावेळी देशातील ‘व्हीआयपी कल्चर’ मोडीत काढण्याचा सरकारचा मानस असल्याचे आणि गाड्यांवरील दिवे काढून घेणे हा त्याचाच एक भाग असल्याचे मोठ्या अभिमानाने सांगण्यात आले होते. त्यामागचा सरकारचा हेतू प्रामाणिक असेलही; पण राजकीय नेत्यांच्या डोक्यात मात्र ‘व्हीआयपी कल्चर’ ठासून भरले असल्याचे नित्य सिद्ध होत आहे. त्याच मालिकेतील दोन प्रकार नुकतेच समोर आले. त्यामध्ये सामील असलेल्या नेत्यांपैकी एक तर मोदींच्या भारतीय जनता पक्षाचेच आहेत आणि दुसरे तेलुगू देसम या भाजपाच्या मित्र पक्षाचे आहेत. गुजरात विधानसभेचे सभापती आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रमणलाल व्होरा यांनी केवळ त्यांना काका संबोधले म्हणून एका सुरक्षा रक्षकाच्या नोकरीवर गदा आणली. व्होरा तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या एजन्सीचे कंत्राटही संपुष्टात आणले. दुसऱ्या प्रकरणात विमानतळावर उशिरा पोहचले म्हणून बोर्डिंग पास नाकारण्यात आलेले तेलुगू देसमचे खासदार दिवाकर रेड्डी यांनी विमानतळ डोक्यावर घेतले. व्होरांनी ज्याचा रोजगार हिरावून घेतला त्या सुरक्षा रक्षकाची चूक एवढीच होती की, त्याने इस्पितळाच्या प्रवेशद्वारासमोर वाहन उभे केल्याबद्दल हटकले आणि तसे करताना व्होरा यांना काका संबोधले! जगातल्या सर्व भाषांप्रमाणे गुजराती भाषेतही काका हा शब्द आदरार्थीच आहे. बरे, व्होरा यांचे वयही काका संबोधल्यामुळे राग येण्याएवढे कमी नाही. याचाच अर्थ त्यांचा पारा काका संबोधल्यामुळे नव्हे, तर प्रवेशद्वारासमोर वाहन उभे न करू दिल्याने चढला असावा, हे स्पष्ट आहे. कदाचित व्होरा यांच्या वाहनावर लाल दिवा नसल्याने ते ‘व्हीआयपी’ असल्याचे सुरक्षा रक्षकाच्या ध्यानातच आले नसावे. तिकडे रेड्डी यांचे डोके फिरण्याचे कारण म्हणजे ते खासदार असूनही उशीर झाल्यामुळे त्यांना बोर्डिंग पास नाकारण्याचे पातक, रेड्डींच्या लेखी क्षुद्र असलेल्या एका कर्मचाऱ्याने केले! दोन्ही प्रकरणांमध्ये अहं दुखावल्यामुळेच पुढचे रामायण घडले हे उघड आहे. आपल्या देशात स्वातंत्र्यापासून रुजलेल्या ‘व्हीआयपी कल्चर’ने राजकीय नेत्यांचा अहं गोंजारण्याचेच काम केले. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवतो, किंवा रतन टाटा पुस्तक खरेदी करण्यासाठी रांगेत उभे राहतात, तेव्हा आपल्या देशातील सर्वसामान्यांना त्याचे कौतुक वाटते; पण आमच्या नेते मंडळीला बहुधा ते मूृर्ख वाटत असावेत. आम्ही कुणी तरी वेगळे आहोत, आम्हाला मानमरातब मिळायलाच हवा, इतरांनी आमच्या दबदब्याखाली दबायलाच हवे, ही मानसिकताच अशा प्रकरणांच्या मुळाशी असते. जोपर्यंत ही मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत केवळ वाहनांवरील दिवे काढल्याने काहीही होणार नाही!
व्हीआयपी कल्चर
By admin | Published: June 20, 2017 12:40 AM