‘मैं पल दो पल का शायर हूँ.. पल दो पल मेरी कहानी हैं!’ असं म्हणत धोनीनं समाजमाध्यमात एक दिवस अचानक आपण निवृत्त होत असल्याची घोषणा केली. अर्थात ती निवृत्ती अनपेक्षित नव्हतीच, विश्वचषकानंतर बराच कालावधी उलटून गेल्यावर त्यानं निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. पुढे झारखंडमध्ये सेंद्रिय शेती करत असल्याची त्याची छायाचित्रं झळकू लागली. क्रिकेटजगापासून लांब असल्यासारखा, तो ‘शांत’ होता. आता मात्र अचानक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - खुद्द जय शहांनीच घोषणा केली की, धोनी आता ‘मेण्टॉर’ म्हणून टी-ट्वेण्टी संघासोबत असेल; येत्या टी-ट्वेण्टी विश्वचषकात त्याच्या अनुभवाचा संघाला फायदा होईल! ‘तो’ परत येतोय म्हटल्यावर त्याच्या चाहत्यांना अर्थातच आनंद झाला, एकेकाळी पाकिस्तानला हरवत त्यानं जिंकलेल्या पहिल्या टी-ट्वेण्टी विश्वचषकाच्या आठवणी ताज्या झाल्या.
पण हे अजिबात विसरता कामा नये की, तेव्हा तो खेळाडू होता, कप्तान होता. मैदानात उतरून खेळत होता. प्रशिक्षक-मार्गदर्शक आजच्या भाषेत ‘मेण्टॉर’ कितीही अनुभवी असला तरी तो असतो मैदानाबाहेरच. मैदानात उतरतात ते खेळाडू, मेण्टॉर नव्हे. जिंकण्या-हरण्याची परीक्षाही त्यांचीच असते. आणि मुख्य प्रश्न असतो तो मेण्टॉर, प्रशिक्षक आणि कप्तान, संघातले खेळाडू यांचं नातं नेमकं कसं आहे? धोनी कप्तान असताना विराट कोहलीची ‘ॲण्टी धोनी’ प्रतिमा कधीही लपून राहिली नाही. पुढे विराट कोहली हा भारतीय क्रिकेट संघाचा सर्वच प्रकारातला निर्विवाद ‘कप्तान’ बनत गेला. कप्तानासमोर क्रिकेट मंडळ झुकू लागलं, मला प्रशिक्षक म्हणून अमुकच हवा, तमुक नको इतपत कप्तानाचं मत मान्य करण्यापर्यंत विराट कोहलीचं ‘वजन’ वाढलं. तो जितकी वर्षे क्रिकेट खेळतो आहे, त्याच्या निम्मी वर्षे तो कप्तान आहे.
कोहलीच्या कप्तानीच्या सुरुवातीच्या काळात कुंबळे प्रशिक्षक होता, कोहली-कुंबळे या जोडीचं कसोटी सामने जिंकण्याचं सातत्य आणि आकडेवारी उत्तम आहे. त्याचकाळात भारतीय संघ कसोटीत क्रमांक एकवर पोहोचला. पण कोहली - कुंबळेतल्या बेबनावापायी कुंबळेला प्रशिक्षकपद सोडावं लागलं. रवी शास्त्री आणि कोहली ही जोडी उत्तम जमली. त्यानंतर चित्र असं की, कोहली म्हणेल तीच पूर्व! गेल्या काही काळात विशेषत: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी कोहली पितृत्त्व रजेसाठी भारतात परतला, अजिंक्य राहणेच्या नेतृत्वात संघ जिंकला. तिथून कोहलीच्या नेतृत्वाविषयी आणि त्याच्या प्रचंड सत्तेविषयी उघड विरोधी चर्चा सुरू झाली. भारतीय क्रिकेटमध्ये ‘ऑल इज वेल’ आहे असं चित्र रंगवण्याचा पूर्ण प्रयत्न बीसीसीआयने केला, मात्र ते तसे नाही हे स्पष्ट दिसत होते.
कोहली आणि राेहित शर्मा यांच्यातली परस्पर स्पर्धा, शर्माची कप्तानीची इच्छा, त्याचं आयपीएलमध्ये कप्तान म्हणून उत्तम यश, आयपीएलमधलंच कोहलीचं अपयश, आटलेला धावांचा ओघ, कप्तानीतल्या उणिवा ते रोहित शर्माचं अलीकडे इंग्लंड दौऱ्यात उत्तम प्रदर्शन इथपर्यंतचा प्रवास पाहिला तरी कोहलीला आव्हान म्हणून रोहित शर्मा उभा राहिला असं दिसतं. अर्थात हे वरकरणी चित्र, संघांतर्गत स्पर्धेतलं. तिकडे जय शहा आणि सौरव गांगुली या बीसीसीआयच्या शीर्षनेतृत्वाला कोहली आणि शास्त्री या जोडीचे भारतीय क्रिकेटवरचं वर्चस्वही खुपायला लागलं की काय, अशीही दबकी चर्चा सुरू.
शास्त्री प्रशिक्षकपदावरून पायउतार होणार हे चित्र जसंजसं स्पष्ट होऊ लागलं तशी समीकरणं बदलू लागली. श्रीलंका दौऱ्यावर राहुल द्रविड प्रशिक्षक म्हणून रवाना झाला. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले जात असताना द्रविडची निवड प्रशिक्षक म्हणून व्हावी अशाही बातम्या फुटल्या. इकडे निवड समिती आणि कोहली यांच्यात खटके उडू लागल्याचीही कुजबुज सुरूच होती. चहूबाजूनं सत्तासंघर्ष सुरू झाला. कोहलीची कप्तानीच धोक्यात येईल असं चित्र आकार घेऊ लागलं; पण काेहलीनं एक पाऊल पुढे टाकत, स्वत:च समाजमाध्यमात जाहीर करून टाकले की ‘वर्कलोड‘ पाहता मी विश्वचषकानंतर टी-ट्वेण्टीची कप्तानी सोडतो आहे. म्हणजे ‘तोवर तरी मीच कप्तान आहे आणि एकदिवसीय आणि कसोटी कप्तानीही माझ्याचकडे आहे’, हे त्यानंच जाहीर करून टाकलं.
तिकडे बीसीसीआयने आपल्या निवेदनात ‘कोहली भारतीय संघात वरिष्ठ खेळाडू म्हणून खेळेल’ अशी शब्दरचना करत ‘पर्याय खुले’ असल्याचे बिटविन द लाइन्स सांगून टाकलं. एकीकडे कोहलीचं लक्ष्य २०२३ चा मायदेशातच खेळवला जाणारा एकदिवसीय विश्वचषक आहे हे उघड आहे, दुसरीकडे संघांतर्गत स्पर्धा, बीसीसीआयचं नेतृत्व, निवड समिती, नवीन प्रशिक्षक या साऱ्यांना कप्तान म्हणून कोण हवा, हा प्रश्न. टी-ट्वेण्टी विश्वचषकच बहुदा ठरवेल, नेमकी कोणाची ‘हस्ती पल दो पल की’?