- शरद कद्रेकरनऊ आठवड्यांच्या प्रदीर्घ ऑस्ट्रेलियन दौऱ्यात विराट कोहलीच्या संघाने टी२०, कसोटी तसेच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत अपराजित राहण्याचा पराक्रम केला. ७१ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत भारताने आॅस्ट्रेलियाला २-१ असे हरवून आॅस्ट्रेलियात प्रथमच मालिका जिंकताना बॉर्डर-गावसकर चषक आपल्याकडेच राखला. अमरनाथ, पतौडी, बेदी, गावसकर, कपिल, अझरुद्दीन, तेंडुलकर, गांगुली, धोनी या कर्णधारांना न जमलेली किमया विराट कोहली-रवी शास्त्री यांच्या संघाने करून दाखविली. याआधी ११ आॅस्ट्रेलियन दौºयांत भारताला मालिका विजय मिळविता आला नव्हता. परंतु कोहलीच्या संघाने आॅस्ट्रेलियन दौºयात मालिका २-१ अशी जिंकताना कसोटी क्रिकेटमधील भारताचा १५० वा विजयही दिमाखात साजरा केला.१२५८ चेंडूत ५२१ धावा करणारा ‘रॉक आॅफ जिब्राल्टर’ चेतेश्वर पुजारा, १७ च्या सरासरीने २१ मोहरे टिपणारा जसप्रीत बुमराह, यष्टीमागे तसेच यष्टीपुढेही (२० झेल आणि ३५० धावा) आपली छाप पाडणारा २१ वर्षीय रिषभ पंत या त्रिकूटाने भारतीय विजयात मोठी भूमिका बजावली. आधीच्या भारतीय संघातही तारे, सितारे होते. परंतु संघ सांघिक कामगिरीत कमी पडायचा. मालिका गमावल्यावरही ‘ताºयांच्या’ कामगिरीची चर्चा व्हायची, यात भारतीय संघ मात्र बेदखलच! कोहली-शास्त्री या जोडीला दक्षिण आफ्रिका, इंग्लंड दौºयात पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर मात्र कोहली-शास्त्री जोडीला यश लाभले. आॅस्ट्रेलियातील कुकाबुरा चेंडू भारताच्या पथ्यावर पडला. ‘ड्यूक’प्रमाणे कुकाबुरा चेंडू फारसा स्विंग होत नाही. बुमराह, शमी, इशांत शर्मा या त्रिकूटाने स्टार्क, हेझलवुड, कमिन्स या आॅस्ट्रेलियन त्रिकूटावर कुरघोडी करत सरस कामगिरी बजावली.कोहलीच्या नेतृत्वाची खासियत म्हणजे संघातील बदल. बुमराह (द. आफ्रिका), हनुमा विहारी, रिषभ पंत (इंग्लंड), मयांक अगरवाल (आॅस्ट्रेलिया) या चौघांना कसोटीत पदार्पणाची संधी लाभली. त्यापैकी बुमराहने लक्षवेधी कामगिरी केली. पंतनेही कसोटीत आपली छाप पाडली. विहारी, अगरवालकडूनही उमेद बाळगता येईल.विश्वचषक (१९८३), चॅम्पियन आॅफ चॅम्पियन (१९८५), वर्ल्ड टी२० (२००७), चॅम्पियन्स ट्रॉफी (२०१३) या झटपट क्रिकेटच्या स्पर्धेत जेतेपद पटकाविण्याची किमया कपिल, गावसकर, धोनीच्या भारतीय संघाने केली. परंतु कसोटी क्रिकेटच्या छोट्याशा दुनियेत (१२ देश) भारतीय संघांना परदेशतील कसोटी मालिका जिंकताना खडतर प्रयत्न करावे लागतात. द. आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, आॅस्ट्रेलिया या देशात भारताचे कसोटी विजय माफकच. द. आफ्रिकेत तर भारताला अजूनही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.कोहलीच्या संघाने आॅस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेत २-१ अशी सरशी साधून आॅस्ट्रेलियन दौºयाची यशस्वी सांगता केली. भारताच्या या मालिकेचा ‘सरदार’ ठरला महेंद्रसिंग धोनी. विश्वचषक स्पर्धा ४ महिन्यांवर आली असताना ‘धोनी हटाव’ची नारेबाजी सुरू होती. झारखंडच्या या भूमिपुत्राने आॅस्ट्रेलियातील मालिकेत सलग ३ अर्धशतके झळकावून ‘मालिकावीराचा’ किताब पटकाविला. धोनीच्या या कामगिरीवर प्रशिक्षक रवी शास्त्री अत्यंत खूश झाले. धोनीसारखा खेळाडू ३०-४० वर्षात एखादाच घडतो. त्याची जागा भरून काढणे मुश्कीलच. रवी शास्त्रीच्या या उद्गारामुळे तूर्तास तरी धोनीचे भारतीय संघातील स्थान अढळ वाटते.
( ज्येष्ठ क्रीडा पत्रकार)