कसोटी मालिकेत इंग्लंडला एकतर्फी धूळ चारल्यानंतर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही भारताने क्रिकेटच्या या जन्मदात्याला नमवून निर्विवाद वर्चस्व मिळवले. मुळात ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ४-० अशी बाजी मारल्यानंतर एकदिवसीय मालिकेत २-० अशा आघाडीनंतर भारताला इंग्लंडला क्लीन स्वीप देण्याची संधी मिळाली होती. मात्र अखेरच्या थरारक सामन्यात मोक्याच्या वेळी चुका झाल्याने इंग्लंडला यंदाच्या भारत दौऱ्यात पहिला विजय मिळवण्यात यश आले. सध्या या मालिकेत भारताची युवा नेतृत्वाखाली ‘विराट’ घोडदौड सुरू आहे. आपल्या अनपेक्षित निर्णयाने क्रि केटविश्वाला नेहमी चकीत करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का दिला. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या काही दिवसआधीच त्याने मर्यादित षटकांच्या भारतीय संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली. यामुळे कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या गळ्यात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील संघाचे कर्णधारपदाची माळ पडली. कर्णधार जेव्हा आपल्या खेळाडूंवर विश्वास दाखवतो तेव्हा निश्चित त्या संघाची कामगिरी वरचढ होते. विशेष म्हणजे, हेच गुण धोनी आणि कोहली यांच्यामध्ये आहेत. कोहलीच्या आक्रमक नेतृत्वामुळे संघातील खेळाडूंमध्येही आत्मविश्वास मिळाला आणि हेच केदार जाधव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा यांसारख्या खेळाडूंच्या कामगिरीतून दिसून येते. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत भारतीय संघाची आक्र मकता इंग्लंडवर जबरदस्त भारी पडली. अंतिम सामन्यातही भारताने बेडरपणे खेळ करताना इंग्लंडला जेरीस आणले. परंतु, डेथ ओव्हरमधील माफक चुका भारतीयांना महागात पडली. नाहीतर, एकदिवसीय मालिकेत साहेबांचा क्लीन स्वीप निश्चित होता. आता, हीच चूक सुधारण्याचा प्रयत्न करताना भारताची ‘विराट सेना’ सज्ज झाली आहे. २६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी इंग्लंड संघ टी-२० स्पेशालिस्ट असल्याने पुन्हा एकदा काटे की टक्कर पाहायला मिळेल, हे नक्की.
‘विराट’ नेतृत्व
By admin | Published: January 25, 2017 1:07 AM