>> राजू नायक
कंड्या पिकविण्यात भाजपाचा हात कोणी धरू शकत नाही. समाज माध्यमांमधून कॉँग्रेस नेत्यांना खजील व्हावे लागेल असे बनावट, धादांत खोटे संदेश व ट्रॉलिंग भाजपाच्या प्रचार ब्रिगेडने सतत चालविले. गेली काही वर्षे अशा पद्धतीची बदनामीकारक मोहीम चालविल्यानंतर आता खजील होण्याची पाळी भाजपावर आली आहे. बुधवारी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची व्हायरल झालेली ध्वनिफित अशाच पद्धतीची आहे आणि तिने भाजपाची झोप उडविली. भाजपा मंत्री नीलेश काब्राल यांना संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन तसा जाहीर कबुलीजबाब द्यावा लागला. वास्तविक अशा ध्वनिफिती बनाव असतात की राणे प्रत्यक्षात बोलले होते याच्या खोलात सामान्य माणसे जात नसतात. विश्वजित राणे यांनी आपण तसे बोलल्याचा इन्कार केलेला असला तरी ज्यांनी राणे यांचा आवाज ऐकला आहे, ते गृहीतच धरून चालले आहेत की राणे तसे बेछूट बोलले आहेत. राणेंची एकूण राजनीती पाहाता ते स्वाभाविकही आहे. कारण, विश्वजित राणे यांना राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपद हवे आहे आणि सध्याच्या परिस्थितीत त्यांना तेथपर्यंत जायला अडथळे आहेत, हे माहीत असल्याने ते बेचैन आहेत. अस्वस्थ आहेत आणि वैफल्यग्रस्तही बनले आहेत.
ज्या माणसांशी ते हे बोलले ते एका इंग्रजी वृत्तपत्राचे संपादक असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. आता राणे जर त्या पत्रकाराशी विश्वासाने बोलले असतील तर त्याने आपल्या वृत्तपत्रात तसा गौप्यस्फोट न करता काँग्रेस पक्षश्रेष्ठींपर्यंत ते कसे पोहोचले, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण, येथे नैतिकतेचा मुद्दा उपस्थित होतो. नेतेमंडळी विश्वासाने काहीवेळा समाजहिताच्या गोष्टी पत्रकारांबरोबर शेअर करतात. पत्रकाराने त्यातील काही भाग नेत्याचे नाव गुप्त राखून वापरावा असा संकेत आहे. काहीवेळा पत्रकार या संकेताचा पडदा दूर सारून आता 'स्टिंग ऑपरेशनट करू लागले असून नेत्यांची दांभिकता किंवा खोटारडेपणा उघडा पाडणे, त्यांचा उद्देश असतो. पत्रकार किंवा प्रसिद्धी माध्यमांचे अंतिम ध्येय सत्य आणि परखड मत हेच असेल तर भल्याबुऱ्या मार्गाने सत्य शोधून काढणे हे पत्रकाराचे कामच आहे, असे मानले जाऊ लागले असून पत्रकार काहीवेळा अनैतिकच नव्हे तर बेकायदेशीरतेचाही मार्ग चोखाळू लागले आहेत. त्यामुळे पत्रकार आणि राजकीय नेत्यांमधील संबंधात वितुष्ट येऊ लागले आहे.
विश्वजित राणे यांच्या वक्तव्याचा विचार करता ते तसे बोलले असतील तर ते निर्विवादपणे पक्षविरोधी कृत्य ठरते. मनोहर पर्रीकर मंत्रिमंडळ बैठकीत तसे बोलले होते का, याबाबत पुरावा मिळणे कठीण असले तरी विरोधकांच्या हातात मोदी ज्याचे सारथ्य करतात त्या सरकारविरोधातील दारूगोळा पोहोचविणे हे भाजपासाठी निश्चितच भयंकर असे पक्षविरोधी कृत्य ठरणार आहे. विश्वजित राणे कधीकधी बोलताना बहकतात. उदाहरण द्यायचे झाल्यास यापूर्वी त्यांच्या तोंडून अचानकपणे पर्रीकरांना कर्करोग झाल्याचे जाहीर झाले होते. त्या वेळी पक्षाने त्यांना सांभाळून घेतले आणि त्या प्रकरणाचा फारसा बाऊही कोणी केला नाही. परंतु, विश्वजित राणे यांची कथित ध्वनिफित व्हायरल झाल्यानंतर ज्या प्रकारचे वातावरण पक्षात निर्माण झाले, ते नेत्यांमध्ये प्रचंड खळबळ माजविणारे आणि ज्येष्ठ नेत्यांचीही तारांबळ उडविणारेच होते. स्वत: पर्रीकर यांना खुलासा करावा लागला आणि कदाचित त्यांना केंद्रीय नेत्यांशी बोलून त्यांची समजूतही काढावी लागणे शक्य आहे. पर्रीकरांसारख्या राष्ट्रव्यापी प्रतिमा असलेल्या नेत्यासाठी अशा पद्धतीने खजील व्हायला लागणे आणि तेही एका कनिष्ठ मंत्र्याच्या बेलगाम वक्तव्यामुळे निश्चितच अशोभनीय आहे. वास्तविक भाजपा नेत्यांना अशा प्रकारच्या बेमुर्वतखोर, फटकळ बोलण्याची सवय नाही. दुर्दैवाने भाजपाने सत्तेवर येण्यासाठी ज्या प्रकारचे राजकारण चालविले आहे, त्याचीच ही फळे आहेत. लक्षात घेतले पाहिजे की सत्तेवर येण्यासाठी कोणालाही दरवाजे खुले केल्यानंतर अनेक महत्त्वाकांक्षी नेत्यांना या 'इतरांहून वेगळ्या' पक्षात प्रवेश मिळाला. या नेत्यांना संयम नाही आणि पक्षाच्या विचारधारेशीही संबंध नाही. पर्रीकरांनीही एकेकाळी अडवाणींसारख्या बुजुर्ग नेत्याला 'बुरशी आलेले लोणचे' म्हटले व नरेंद्र मोदी हे नुकतेच मुख्यमंत्री झाल्याने त्यांना गोध्रा प्रकरण हाताळणे जमले नाही, असे उद्गार काढून राष्ट्रीय वाद ओढवून घेतला होता. पर्रीकर आपल्या बोलण्यातूनही अनेकदा आक्रमक होतात व भावनेच्या भरात काहीबाही बोलून जातात; परंतु पर्रीकरांचा साधेपणा आणि कार्यक्षमता यापुढे अशा अघळपघळ विधानांना फारसे महत्त्व लाभत नाही. दुर्दैवाने राफेलसंदर्भात विश्वजित राणे यांनी पर्रीकरांचा हवाला देऊन जी विधाने केली त्यामुळे काँग्रेसच्या आरोपांना पुष्टी मिळाली आणि मोदी सरकार आणखीनच अडचणीत आले. हे वर्ष निवडणुकीचे असल्याने मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनीही जबाबदारीने आणि संयतपणे वागणे पक्षश्रेष्ठींनी गृहीत धरले तर त्यांची चूक नाही. कारण, या गदारोळात नकारात्मक गोष्टी सहज खपून जात असतात व आधीच जेरीस आलेली भाजपा आणखी गोत्यात येऊ शकते!