- प्रल्हाद जाधव
मी अविवेकाची काजळी फेडुनि विवेकदीप उजळीतै योगिया पाहे दिवाळी निरंतर...अविवेकाची काजळी दूर करून विवेकाचे दीप उजळते ती खरी दिवाळी, आणि हे ज्याला समजते तो खरा योगी. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी दिवाळीची किती सुंदर व्याख्या केलीय पाहा! नुसतीच दिवाळी नव्हे, तिच्यासोबत त्यांनी सुखी जीवनाचे रहस्यही केवळ एका चिमुकल्या ओवीद्वारे उघड करून दाखवले आहे. अशी कामगिरी फक्त ज्ञानेश्वरांसारखा अलौकिक प्रतिभेचा द्रष्टाच करू शकतो.ज्ञानेश्वरांचा कोणताही शब्द घ्यावा आणि त्यावर तासंतास बोलत राहावे. त्या शब्दाच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न करावा आणि अनपेक्षित आनंदाचा खजिना हाती लागावा, हे ठरलेलेच. ज्याला ज्याला त्यांच्या शब्दांची गोडी लागली तो तो या अनुभवाचा आणि आनंदाचा धनी झाला हे नक्की. आता हेच बघा, आपण वर्षातून एकदा दिवाळी साजरी करतो पण ज्ञानेश्वर आपल्याला निरंतर, म्हणजेच कधीही न संपणारी, अक्षय स्वरूपाची दिवाळी साजरी करण्याचा मार्ग दाखवत आहेत. कोणता आहे तो मार्ग? तो आहे अर्थातच, अविवेकाची काजळी फेडून पुढे जाण्याचा...माणसाच्या मनातील विवेक कायम जागा असतो. पण त्यावर काजळी धरल्याने त्याला नीट दिसत नाही. काजळीमुळे त्याचे निर्णय चुकू लागतात व पुढील गोंधळ निर्माण होऊ लागतो. अशा परिस्थितीत एखादे भांडे घासणीने घासून पुसून लख्ख करावे त्याप्रमाणे आपला विवेक आत्मपरीक्षणाच्या घासणीने लखलखीत करायचा. विवेक हा लखलखीत, तर्काधिष्ठित असतो. महत्वाचे म्हणजे तो विज्ञानाच्या मार्गावर चालणारा असतो. अविवेक म्हणजे काय हे मात्र आपले आपणच ठरवायचे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात कसे वागतो, कसे जगतो, काय भूमिका घेतो, आपला खरा चेहरा कोणता, आपण चढवलेले मुखवटे किती, आपण खरे किती बोलतो, खोटे किती बोलतो, आपण दुसऱ्याला मदत किती करतो, कोणत्या भावनेने करतो, जातपात पाळतो का, पैशाची गुर्मी- बुद्धीचा अहंकार-सत्तेचा माज दाखवतो का, या सारख्या छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार मनापासून करू लागलो की ती अविवेकाची काजळी आपोआप दूर होऊन मन स्वच्छ व्हायला सुरु वात होते. णि एकदा का मन स्वच्छ झाले की असा माणूस स्वत:च योगी होतो आणि त्याची रोजची दिवाळी सुरू होते.