मरियम नवाज यांनी सोमवारी भल्या पहाटे हे ट्विट केलं.. Police broke my room door at the hotel I was staying at in Karachi and arrested Capt. Safdar ..आणि पाकिस्तानात एकदम भूकंप झाला. समाजमाध्यमात तर दंगलच झाली. हॉटेलच्या दाराच्या तुटलेल्या कडी कोयंड्याचे फोटोही समाजमाध्यमात व्हायरल झाले.
समाजमाध्यमात आणि राजकीय वर्तुळात एक बाजू म्हणत होती की, कॅप्टन सफदर अवान माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे जावई असतील, राजकीय नेतृत्वाची तयारी करणाऱ्या मरियम नवाज यांचे पती असतील; पण ते कायद्यापेक्षा मोठे नाहीत. त्यांनी बॅरिस्टर जिना यांच्या स्मृतिस्थळी जाऊन नारेबाजी केली, बेअदबी केली, हुल्लड केली हा कायद्याने गुन्हा आहे, त्यांना अटक व्हायलाच हवी होती.
दुसरी बाजू म्हणते की, आर्मीने ‘निवडलेले’ पंतप्रधान इमरान खान आणि त्यांच्या सरकारला, सैन्यदलातील उच्चपदस्थांना कराचीत झालेल्या अकरा पक्षांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक मुव्हमेण्टच्या भव्य शक्तिप्रदर्शनाचा ‘त्रास’ झाला. मरियम आणि बिलावल भुत्तो झरदारी एकत्र आल्यानं, त्यांना मिळणाºया विलक्षण पाठिंब्यानं कापरं भरलं आहे. म्हणून पाकिस्तानला सरावाचं असलेलं सरकारी दमनतंत्र पुन्हा सुरू झालं आहे. लोकशाही प्रक्रियाच सुरूहोऊ नये म्हणून हा प्रयत्न आहे. पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात येत्या काही दिवसात मोठा गहजब अपेक्षित आहे.
त्याची सुरुवात बरीच आधी झाली, मात्र झरदारी-भुत्तो एकत्र येणं, मरियम नवाज यांनी इमरान खान यांना ‘डरपोक’ म्हणणं हे सारं असंतोषाला पुरेसं होतं, त्यात रविवारी कराचीत मोठी विशाल सभा झाली. त्यात ‘व्होट को इज्जत दो’ हा नारा बुलंद करण्यात आला. त्याचवेळी मरियम नवाज पतीसह बॅरिस्टर जिना यांच्या स्मृतिस्थळाला भेट द्यायला गेल्या. सोबत दोनशे कार्यकर्तेही होते. तिथं कॅप्टन सफदर यांनी ‘व्होट को इज्जत दो’ म्हणत जोरदार नारेबाजी केली, त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनीही नारे लगावले.
त्यानंतर मरियम, सफदर यांच्यासह २०० जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला की, जिना यांच्या स्मृतिस्थळाचं पावित्र्य त्यांनी भंग केलं. त्यांना अटकाव करणाºया लोकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं. डॉन वृत्तपत्रानं त्या एफआयआरची प्रत प्रसिद्ध केली आहे. जिना स्मृतिस्थळाची देखभाल आणि संरक्षण कायदा -१९७१ नुसार त्या परिसरात सभा घेता येत नाहीत, आंदोलनं करता येत नाहीत, कुठलीही राजकीय कृती करता येत नाही. या स्मृतिस्थळाचं पावित्र्य भंग होईल असं काहीही करणं दखलपात्र गुन्हा असेल. तीन वर्षे किंवा अधिक शिक्षाही होऊ शकते.
सफदर नारेबाजी करत असल्याच्या व्हिडिओवर कालच पाकिस्तानात अनेकांनी असंतोष व्यक्त केला होता की राजकारणात जरा तरी बूज राखा. मात्र त्यानंतर सोमवारी त्यांना अटक झाल्यावरही अशाच प्रतिक्रिया आल्या की, ती नारेबाजी जितकी चुकीची तितकंच हॉटेलचा दरवाजा तोडून भल्या सकाळी अटक करणं आणि नियमांचा राजकीय वापर करणंही चूक.
आता मरियम नवाज यांनी इमरान खान यांच्यावर थेट हल्ला अधिक धारदार केला आहे. कराचीतल्या शक्तिप्रदर्शनात तर त्या उघड म्हणाल्या की, ‘इमरान खान स्वत:चं अपयश लपवण्यासाठी सैन्याच्या पाठीमागे लपताहेत. कालच तर तुम्ही पाकिस्तानी जनतेला सांगत होतात ना की, ‘घबराना नहीं है!’ आणि आज एक सभा पाहून तुम्हाला घाम फुटला?’
रविवारी पाच तास चाललेल्या सभेत मरियम नवाज यांचं भाषण खूप गाजलं, आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही या भाषणाच्या बातम्या केल्या.
आणि उजाडताच त्यांच्या पतीला अटक झाली..पण सोमवारी सायंकाळी त्यांना जामीन ही मिळाला. गुन्हे, अटक, खटले आणि राजकीय सूडसत्र पाकिस्तानला काही नवीन नाही आणि तिथला कुठलाच राजकीय पक्ष आणि सत्ता त्याला अपवाद नाही.. सत्ताकांक्षाचं हे आणखी एक नवं वळण आहे, इतकंच !