माझ्या मते यावेळची लोकसभा निवडणूक ही नरेंद्र मोदी ही एक व्यक्ती व तिच्याविरुद्ध एकवटलेले सर्व विरोधक यांच्यातील लढाई होती. मला वाटते की, उमेदवार कोण आहे हे न पाहता, मतदारांनी मोदींना भरभरून मते दिली आहेत. मोदींवर संपूर्ण देशाने व्यक्त केलेला हा दृढविश्वास ही विकासाभिमुख राजकारणास दिलेली पसंतीची थाप आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत प्रबळ होईल व जगात ताठ मानेने उभा राहील, याविषयी त्यांनी व्यक्त केलेली खात्रीही यातून दिसते. जनतेने दहशतवाद व भ्रष्टाचार यांच्या विरोधात दिलेला हा कौल आहे. संपूर्ण देशात ‘जीएसटी’सारखा एकच कर व नोटाबंदीवर जनतेने केलेले हे शिक्कामोर्तब आहे. मोदींच्या या दोन्ही निर्णयांविरुद्ध विरोधकांनी केलेला विरोध सपशेल फोेल ठरला.
भारताच्या युवा पिढीने मोदींमध्ये एक खंबीर नेतृत्व पाहिले व आपल्या आकांक्षा तेच पूर्ण करतील, या खात्रीने त्यांनी हे मतदान केले आहे. स्वच्छ भारतसारखे कार्यक्रम व गरिबांना आधार देणाºया योजनांना मिळालेली ही पसंती आहे. अनुच्छेद ३७० रद्द करण्याची ठाम भूमिका घेतल्याने काश्मीरच्या संदर्भात मोदी काही तरी नवे करतील, याचीही मोठी अपेक्षा मतदारांनी बाळगलेली दिसते.गेली ७० वर्षे नेहमी दुर्लक्षित राहिलेल्या ईशान्येकडील राज्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी मोदी सरकारने केलेल्या प्रयत्नांनाही मतदारांनी या निकालाने पाठिंबा दिला आहे. नेहमीच शत्रुत्व बाळगणाºया पाकिस्तानसारख्या शेजारी देशाची व दहशतवाद्यांची यापुढे जराही गय केली जाणार नाही, हे बालाकोट येथील हवाई हल्ल्यांतून ठणकावून सांगण्याचे हे यश आहे. चीन या दुसºया शेजाºयाने कुरापती काढल्या, तेव्हा मोदींनी आपल्या ५६ इंची छातीने दमदार मुकाबला केला, हे डोकलाम तिढ्याच्या वेळी पाहणाºया लोकांनी या मतदानातून त्याबद्दल दमदार समर्थन दिले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मोदींच्या स्वच्छ व निष्कलंक चारित्र्यावर देशवासी लुब्ध झाल्याचे हे प्रतीक आहे.
विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये मतदार पूर्णपणे वेगळी गणिते मांडून मतदान करतात, हेही या निकालांचे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणावे लागेल. ओडिशामध्ये हे स्पष्ट दिसले. विधानसभेसाठी तेथील मतदारांनी नवीन पटनाईक यांना पसंती दिली, पण लोकसभेसाठी मात्र त्यांच्या बिजू जनता दलाला तेवढी मते दिली नाहीत. मोदींनी ज्याला ‘महामिलावट’ म्हटले, त्या विरोधी पक्षांच्या तत्त्वशून्य युतीला या निवडणुकांनी जोरदार थप्पड दिली आहे. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत संपूर्ण निवडणूक जिंकण्याची जबाबदारी एकट्याच्या खांद्यावर घेऊन ती यशस्वीपणे पार पाडणारे मोदी हे या देशाने पूर्वी कधीही न पाहिलेले नवे, अनोखे नेतृत्व आहे. विरोधकांनी धोरणे व कार्यक्रम सोडून व्यक्तिश: मोदींचा दुस्वास केला. विरोधाचे राजकारण कसे करू नये, याचाही धडा या निवडणुकीने दिला आहे.
भविष्यात अनेक वर्षे देशाचे अशाच एकनिष्ठेने नेतृत्व करण्यासाठी मोदींना दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.- मुकुल रोहटगी(माजी अॅटर्नी जनरल )