एकीकडे प्रत्येक गाव हगणदारीमुक्त व्हावे आणि गावोगावी शौचालये बांधली जावीत यासाठी राज्य सरकारकडून अनुदान दिले जात असताना दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेतीलच एक घटक असलेल्या ग्रामपंचायतीचे पदाधिकारी हगणदारीमुक्तीच्या कामात बाधा आणत असतील, तर ही बाब निश्चितच अशोभनीय म्हणायला हवी. वडाळी बुद्रुक हे नांदगाव तालुक्यातील नऊ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचे गाव! या ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज भरताना नऊ सदस्यांनी त्यांच्याकडे शौचालये वापरात असल्याचे प्रमाणपत्र जोडलेले नव्हते; मात्र शंभर रुपयांच्या हमीपत्रावर शौचालये बांधू असे लिहून दिले होते. परंतु ठरावीक मुदतीच्या आत तसेच ग्रामस्थांनी दोन ग्रामसभा घेऊन सूचित केल्यानंतरही संबंधित ग्रामपंचायत सदस्यांनी शौचालये बांधण्याकडे कानाडोळा केला. अखेरीस जिल्हाधिकाºयांकडे दाद मागण्यात आल्यानंतर त्यांनी सरपंच, उपसरपंचासह नऊ सदस्यांना अपात्र ठरवीत ग्रामपंचायत बरखास्त केली. केवळ शौचालयाअभावी एखादी ग्रामपंचायत बरखास्त होण्याचा हा बहुधा राज्यातील पहिलाच प्रकार असावा.जिल्हाधिकाºयांच्या या निर्णयाचे स्वागत होत असले तरी तो निर्णय इतर ग्रामपंचायत पदाधिकाºयांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आणि सावधानतेचा इशारा देणाराही म्हणावा लागेल. या निर्णयामुळे प्रत्येकाच्या मनात शौचालये आणि हगणदारीमुक्तीचे महत्त्व अधोरेखित झाल्यावाचून राहणार नाही. शासनाच्या बहुतांशी योजना जनसामान्यांसाठी हिताच्या असतात, परंतु त्यांचा योग्य प्रचार-प्रसार होत नाही आणि त्यांच्या अंमलबजावणीबाबत पुरेशी आस्थाही दाखविली जात नसल्यानेच कित्येकदा त्या योजना फसल्याचे निदर्शनास आले आहे. लोकप्रतिनिधी किंवा शासनाच्या प्रतिनिधींनी गांभीर्य बाळगून शासन उद्देशाला बळकटी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्यास समाजाकडूनही सकारात्मक प्रतिसाद लाभू शकेल. महाराष्टÑ हगणदारीमुक्त व्हावे यासाठी शासनस्तरावरून लाखो रुपये खर्चून या योजनेचा प्रचार, प्रसार केला जात आहे. या योजनेला प्रोत्साहन मिळावे यासाठी ग्रामपंचायतींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविलेही जात आहे. तसेच प्रत्येक कुटुंबाला शौचालयांच्या बांधकामासाठी अनुदानदेखील दिले जात आहे. असे असताना ग्रामपंचायतींनी स्वत:च्या नावलौकिकासाठी याकामी पुढाकार घेणे अपेक्षित आहे.ज्यांचा आदर्श गावकºयांनी घ्यायला हवा त्या ग्रामपंचायतीचे कारभारीच जर का योजनेला अनास्थेची पाने पुसत असतील तर जिल्हाधिकाºयांनी उगारलेला बरखास्तीचा बडगा उचितच म्हणायला हवा. वडाळी बुद्रुक हे महाराष्टÑातील इतर सर्वसामान्य गावांसारखेच एक खेडेवजा गाव आहे. त्या गावात जर का शौचालयांअभावी पदाधिकारी अपात्र ठरविण्यासोबतच ग्रामपंचायत बरखास्त होण्याची वेळ येत असेल तर राज्यातील अन्य ग्रामपंचायतींसाठी हा सूचक इशाराच म्हणावा लागेल. ही नामुष्की टाळायची असेल तर वडाळी बुद्रुकच्या प्रकारापासून धडा घ्यायला हवा.
वडाळी बुद्रुकचा धडा घ्यावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:51 PM